Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
उत्तराखंड दौऱ्यावर असून थोड्यावेळापुर्वीच त्यांचं देहरादून इथं आगमन झालं. उत्तराखंड
राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष समारंभात ते जनतेशी संवाद साधत
आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते स्मारक टपाल तिकिटाचं प्रकाशनही होत आहे, यानंतर ते
जाहीर सभेला संबोधित करतील. ८ हजार १४० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं
ते यावेळी उद्घघाटन आणि पायाभरणी करतील तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २८
हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ६२ कोटी रुपये हस्तांतरित करतील.
****
सामाजिक अथवा आर्थिक पार्श्वभूमीचा
विचार न होता प्रत्येकाला न्याय मिळेल, तेव्हाच सामाजिक न्यायाची
हमी देता येईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. न्यायदान प्रक्रिया
बळकट करण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्राचं काल नवी दिल्लीत उद्घाटन करताना ते बोलत होते.
दरम्यान,वंदे भारत, नमो भारत, अमृत भारत
यासारख्या रेल्वेगाड्या भारतीय रेल्वेच्या भविष्याचा पाया रचत आहेत, असं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वाराणसी इथून काल चार नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांचा
प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते निशाण दाखवून करण्यात आला, त्यानंतर ते बोलत होते.
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या
दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. परवा ११ नोव्हेंबर
रोजी २० जिल्ह्यांमधील १२२ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. ३ कोटी ७० लाखांहून
अधिक मतदार १३६ महिला उमेदवारांसह १ हजार ३०२ उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवतील.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सासाराम आणि अरवल इथं, भाजप नेते
तथा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह औरंगाबाद आणि कैमूर इथं जाहीर सभा घेतील. जनता दल
(संयुक्त) अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार औरंगाबाद, गया आणि कैमूर इथं सभा घेतील.
काँग्रेस नेते राहुल गांधी महाआघाडीसाठी पूर्णिया आणि किशनगंज इथं जाहीर सभांना संबोधित
करतील.
****
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, अद्ययावत संगणकीकरणासाठी
महत्वपुर्ण ठरणाऱ्या, क्वांटम संगणक प्रणालीसाठी आवश्यक ‘क्यू-बीट्स’ विकसित
करण्यात पुणे इथल्या आयसर- भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांना
यश आलं आहे. औषधनिर्माण, संरक्षण, हवामान, वित्तीय प्रणाली, अवकाश आदी
क्षेत्रातील अत्यंत जटिल आणि प्रगत संशोधनासाठी सुरक्षित आणि सक्षम पर्याय म्हणून
‘क्वांटम कॉम्प्युटिंग’कडे पाहिलं जातं.जगात सध्या अमेरिका, युरोप, रशिया आणि
चीनमध्ये यावर संशोधन सुरु असताना भारतानं या क्षेत्रात ही महत्वपूर्ण कामगिरी केली
ही विशेष बाब असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.
****
विदर्भातील ग्रामीण संस्कृती, लोककला आणि
आनंदाचा संगम तसंच झाडीपट्टीची संस्कृती जपणारा मंडई उत्सव भंडारा जिल्हात उत्साहपुर्ण
वातावरणात साजरा होत आहे. दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवसापासून मंडई उत्सवाला सुरुवात
होते. मंडईच्या ठिकाणी विविध वस्तू, शेतीसाहित्य, कपडे, खेळणी, पाळणे आणि
विविध दुकानांनी परिसर गजबजलेला असल्याचं चित्र आहे. संध्याकाळच्या सत्रात सादर होणारा
तमाशा, दंडार आणि नाट्य सादरीकरण यांसारख्या पारंपरिक लोककलांमधून मनोरंजनासह समाजप्रबोधनाचा
संदेश देण्यात येत आहे. भंडारा जिल्हातील ही मंडई आजही गावाच्या ओळखीचा, परंपरेचा आणि
एकतेचा सजीव प्रतीक ठरत आहे.
****
लातूर- नांदेड मार्गावर लातूरजवळ
आज सकाळी गॅस टँकरला गळती लागली. यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, अग्निशमन दलासह
पोलिसांच्या तत्परतेमुळं मोठी दुर्घटना टळली. टँकरमधील गॅसचा दाब कमी झाल्यानंतर परिस्थिती
नियंत्रणात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात झाली.
****
लातूर इथं मध्यवर्ती जिल्हा
क्रीडा संकुलात तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राची उद्यापासून सुरुवात होत आहे. ऑलम्पिक
दर्जाच्या खेळ प्रकारातील केंद्र आणि राज्य सरकार मान्यताप्राप्त तायक्वांदो या खेळाच्या
प्रचार-प्रसारासाठी लातूर जिल्ह्यात याद्वारे चालना मिळणार आहे. शासन स्तरावरही खेळांद्वारे
परीक्षेत अतिरिक्त गुण, शिष्यवृत्तींसह बक्षीसं, पुरस्कार आणि नोकरीतील संधीची
व्यवस्था असल्यानं या क्रीडा प्रकाराचं प्रशिक्षण घेण्याचं आवाहन याबाबतच्या वृत्तात
करण्यात आलं आहे.
****
भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या
हॉकीला शंभर वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त यवतमाळ इथं आज सकाळी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात
आलं होतं. विद्यार्थांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग नोंदवला.
****
नशा मुक्त भारताचा संदेश समाजात
पोहोचवण्यासाठी गोंदिया इथं आज ‘रन फॉर हेल्थ’ मेरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.
“नशा मुक्त भारत - स्वस्थ भारत” असा नारा देत आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याचा
संदेश यातून देण्यात आला.
****
राज्यात बहुतांश भागात आता
थंडी जाणवू लागली आहे. नाशिक, जळगांव शहरांत किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत
खाली आलं आहे. तर अन्य काही शहरांमध्येही किमान तापमान २० अंशांच्या खाली आलं आहे.
आज सर्वत्र हवामान कोरडं असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर भारतात, पर्वतरांगावरील
बर्फवृष्टीनंतर आता मैदानी प्रदेशातही थंडीची लाट पसरत आहे.
****
No comments:
Post a Comment