Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 November
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०९ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
उत्तराखंड राज्याच्या स्थापनेचा हे रौप्य महोत्सवी वर्ष
असून स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत डेहराडून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते याप्रसंगी, विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधील आठ हजार कोटी रुपयांच्या
विकास कामांचं कोनशीला तसंच उद्घघाटन आणि
प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून २८ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६२
हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्याचाही कार्यक्रम आणि जाहीर सभा होणार आहे.
****
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी उत्तराखंडच्या २५व्या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या आध्यात्मिक-सांस्कृतिक प्रवासात उत्तराखंडचं अतुलनीय योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी
समाजमाध्यमावरील आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेली उत्तराखंडची
दिव्य भूमी आज पर्यटन आणि प्रत्येक क्षेत्रात नवी गती प्राप्त करत असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तराखंडमधील नागरिकांना आनंद, समृद्धी, सौभाग्य आणि चांगले आरोग्य लाभो, अशा शब्दात पंतप्रधानांनी सामाज माध्यमावर आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील
प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. परवा ११ नोव्हेंबर रोजी २० जिल्ह्यांमधील १२२ विधानसभा
मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. ३ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार १३६ महिला उमेदवारांसह
१ हजार ३०२ उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवतील.
****
देशभरात भटक्या श्वानांचा उपद्रव
वाढत असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना अशा श्वानांची
तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आठ आठवड्यांची
मुदतही दिली आहे. भटके कुत्रे लोकांना चावण्याच्या घटनांत चिंताजनक वाढ झाल्यानं त्यांच्या
निर्बीजीकरण-लसीकरणानंतर कुत्र्यांना मूळ
ठिकाणी आणून न सोडता निवारागृहांमध्ये
ठेवावं, असंही न्यायालयानं निर्देशित केलं आहे. नगरपालिकांनी
दर तीन महिन्यांनी भटके श्वान कुठेही शहरांमध्ये मोकाट राहणार नाहीत, याची खात्री करावी लागणार आहे.
महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरुन भटक्या श्वानांसोबतच
अन्य जनावरांना देखील दूर करुन त्यांचं निवारागृहांमध्ये पुनर्वसन करण्याचे निर्देश
राजस्थान उच्च न्यायालयानं यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले होते, त्यालाही सर्वोच्च न्यायालयानं मान्यता
दिली. श्वानदंशांचे वाढत्या घटना म्हणजे प्रशासकीय उदासीनताच म्हणावी लागेल, नागरिक, विशेषतः लहान मुलं, रुग्ण, वयोवृद्ध यांचं जीवन आणि सुरक्षिततेचे
मूलभूत अधिकार जपण्यासाठी न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक असल्याचंही न्यायालयाच्या खंडपीठानं
स्पष्ट केलं.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
यांनी जागतिक कायदेशीर सेवा दिनानिमित्त नागरिकांना न्याय, समानता आणि कायदेशीर सक्षमीकरणाचा
उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. कायद्याची उपलब्धता हा एक अधिकार आहे, तो विशेषाधिकार नाही, असं सांगत तसंच एकत्रितपणे, समाजाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात
सर्वांसाठी न्याय, कायदेशीर मदत आणि निष्पक्षता
पोहोचावी, यासाठी प्रयत्नांना बळकटी
देणं आवश्यक असल्याचं हा दिवस आपल्याला आठवण करून देतो असं गडकरी यांनी आपल्या सामाजिक
माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
पुणे इथल्या
जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणात अनियमितता झाल्याचंही स्पष्ट
झालं असून अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
प्रकरणाची व्याप्ती आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री
म्हणाले.
****
हिंगोली ते नांदेड या महामार्गावर काल सायंकाळी मोठ्या
कंटेनरनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहाणी झाली नाही.
या घटनेमुळं महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
विदर्भातील ग्रामीण संस्कृती, लोककला आणि आनंदाचा संगम तसंच झाडीपट्टीची
संस्कृती जपणारा मंडई उत्सव भंडारा जिल्हात उत्साहपुर्ण वातावरणात साजरा होत असल्याचं
आमच्या वर्ताहरं कळवलं आहे. दिवाळी सणाच्या
दुसऱ्या दिवसापासून मंडई उत्सवाला सुरुवात होते.
****
भारताच्या चार बुद्धीबळपटूंनी फिडे विश्वचषक बुद्धीबळ
स्पर्धेत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर भारताचाच दिग्गज बुद्धीबळपटू डी. गुकेश आणि
दिप्तायन घोष हे तिसऱ्या फेरीत स्पर्धेतून बाहेर पडले.
काल गुकेशला जर्मन ग्रँडमास्टर फ्रेडरिक श्वानकडून पराभव
पत्करावा लागला. आर प्रज्ञानंदाने आपला सामना जिंकून चौथ्या फेरीत प्रवेश केला. अर्जुन
एरिगाईसीनेही उझबेकिस्तानच्या शमसद्दीन वोखिदोवसोबत बरोबरी साधून चौथ्या फेरीत प्रवेश
केला.
****
No comments:
Post a Comment