Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 November 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
मुंबई अहमदाबाद बुलेट
ट्रेनच्या सुरत स्थानकाची पंतप्रधानांकडून पाहणी
·
आदिवासी संस्कृती
जपण्यासाठी अनेक योजना आखत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
·
गझलनवाझ भीमराव पांचाळे
यांना ‘मृदगंध पुरस्कार’ जाहीर
आणि
·
कोलकाता कसोटीत दक्षिण
आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सात बाद ९३ धावा
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात दौऱ्यात मुंबई
अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरत स्थानकाची पाहणी केली. अंत्रोली इथं उभारल्या जात
असलेल्या या स्थानकाचा दौरा करून पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत, कामकाजाचा
आढावा घेतला. देशात महत्त्वकांक्षी पायाभूत सुविधांपैकी एक असलेल्या या योजनेबाबत
हा संक्षिप्त वृत्तांत –
सुमारे ५०८ किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी ४६५ किलोमीटर उन्नत मार्ग हा पुलांवर उभारला जाणार आहे.
यापैकी ३२६ किलोमीटर अंतरांच्या पुलांचं काम पूर्ण झालं आहे. मार्गातल्या नद्यांवर २५ पूल उभारले जात असून,
यापैकी १७ पुलांचं काम पूर्ण झालं आहे. बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होऊ शकणार आहे.
****
स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला
अभिवादन करण्यासाठी देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस
आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्व अधोरेखित करतो. या निमित्तानं
देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि शैक्षणिक
उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदा बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी
राधाकृष्णन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भगवान
बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बिरसा मुंडा यांना
जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी
आणि नागरिक उपस्थित होते.
****
आदिवासी संस्कृती जपण्यासाठी राज्य सरकार अनेक नव्या योजना
आखत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली.
स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय
आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्धाटन समारंभात ते बोलत होते.
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात एक कोटी २५ लाख आदिवासी असून १६ जिल्ह्यात
त्यांच्या ४५ जमाती आहेत,
अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींना जल, जमीन
आणि जंगलापासून न तोडता त्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते
म्हणाले. आदिवासी नायकांना शोधून त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठीही सरकारनं
प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते, परिवहन आणि
राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. त्यांनी सरकार
आदिवासींच्या प्रगतीसाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘श्रीमती
अनसूयाबाई काळे स्मृती सदना’चं आणि पूर्व विदर्भ महिला
परिषदेच्या ‘नोकरी करणाऱ्या महिला आणि मुलींच्या वसतीगृहा’चं उद्घाटन केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्या छत्रपती
संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. सिडको चौकात वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती
पुतळ्याचं तसंच क्रांतीचौकात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण
उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचं, महापालिकेकडून
सांगण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजी नगर इथल्या भाजप कार्यालयाचं उद्घाटनही
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार आहे
****
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छूक
उमेदवारांची नामनिर्देशनपत्रं ऑनलाईन तसचं ऑफलाईन पद्धतीनं उद्या म्हणजेचं
रविवारीदेखील स्वीकारली जातील, असं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं
आहे. उद्या सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्रं स्वीकारण्याचे आदेश
सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत.
नामनिर्देशनपत्रं आणि शपथपत्रं दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर म्हणजेच परवा
३ वाजेपर्यंत आहे. तरी अधिकाधिक इच्छूक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रं उद्या दाखल
केल्यास अखेरच्या दिवशी होणारी धावपळ टळू शकेल, असंही राज्य निवडणूक
आयोगानं म्हटलं आहे
****
जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात काल रात्री झालेल्या
स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. गृह मंत्रालयाच्या जम्मू आणि काश्मीर विभागाचे
सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या स्फोटात २७ पोलीस, दोन
महसूल अधिकारी आणि तीन नागरिक जखमी झाले स्फोटामुळे पोलीस ठाणं आणि आसपासच्या काही
इमारतींचंही नुकसान झालं. स्फोटाच्या कारणाचा शोध सुरू असल्याचं लोखंडे यांनी
सांगितलं. हरियाणाच्या फरीदाबाद इथून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी सुरू असताना
काल रात्री उशीरा हा स्फोट झाला.
****
नवी मुंबईत तळोजा तसंच कळंबोली या परिसरातून अंमली पदार्थ
विरोधी पथकाने काल एक कोटी सतरा लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. या
प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी इतरांचा शोध सुरू असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
पुणे इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात सरकार दिशाभूल करत
असल्याची टीका काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते
आज नागपूर इथं बोलत होते. पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहाराची
निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, असं
वडेट्टीवार यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा व्यवहार झाल्याचा आरोप
करत, वडेट्टीवार यांनी,
संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.
****
लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ गझलनवाझ
भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. २६ नोव्हेंबरला उमप यांच्या १५व्या
स्मृतिदिनानिमित्त १५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारंभ मुंबईत होत आहे.
त्यात पांचाळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र आणि लोकशाहीर
विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेलं मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला महाराष्ट्र
राज्य युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२५’ मध्ये
तृतीय क्रमांकाची दोन पारितोषिकं मिळाली आहेत. जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई
चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इथे हा युवक महोत्सव पार पडला. त्यात ललित कला
प्रकारातील माती कला स्पर्धेत नांदेडच्या वैभव विष्णू गिराम या विद्यार्थ्यांने
तृतीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठाच्या ‘प्रतिबिंब’ या
लघुपटालाही तृतीय पारितोषिक जाहीर झालं आहे.
****
बालरंगभूमी परिषदेच्या बीड शाखेच्या वतीनं जल्लोष लोककलेचा
हा लोककला महोत्सव आज बीड इथं पार पडला. केएसके महाविद्यालयात झालेल्या या
महोत्सवात जवळपास चारशे बालकलावंत आणि संघ सहभागी झाले.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा
माथूर यांनी जलजीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांची आज
पाहणी केली. जिल्ह्यातील गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा सुरळीतपणे
होण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. जिंतूर तालुक्यातील ग्रामपंचायत
यसेगाव, निवळी खुर्द,
कोक आणि मालेगाव तांडा या ग्रामपंचायतींना त्यांनी
प्रत्यक्ष भेटी दिल्या.
****
आज कैरो इथं झालेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत
भारतीय नेमबाज ईशा सिंगनं महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक जिंकलं.
तिचं हे पहिलचं वैयक्तिक जागतिक पदक आहे. भारतानं चालू असलेल्या १० ऑलिंपिक
स्पर्धांमध्ये एक सुवर्ण,
चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांची ऐतिहासिक कमाई केली. एकूणच, भारत
तीन सुवर्ण,
पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चीन
१० सुवर्णांसह आघाडीवर तर कोरिया सहा सुवर्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
****
भारत आणि दक्षिण अफ्रिका संघादरम्यान कोलकाता इथं सुरू
असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आज दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. आज
दिवसभरात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी एकूण १६ बळी घेतले. आज सकाळी भारताने आपला
पहिला डाव कालच्या एक बाद ३७ धावांवरून पुढे सुरू केला. आणि पहिल्या डावात
नाममात्र ३० धावांची आघाडी घेत, १८९ धावांत यजमान संघ सर्वबाद झाला. के
एल राहुलनं सर्वाधिक ३९ धावा केल्या तर अफ्रिकेचा गोलंदाज सायमन हार्मरनं चार गडी
बाद केले. दुसऱ्या डावात पाहुण्या संघाचे सात फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.
रविंद्र जडेजानं चार बळी घेतले. आज दिवसअखेर दक्षिण अफ्रिकेच्या सात बाद ९३ धावा
झाल्या असून कर्णधार टेंबा बावुमा २९ धावांवर खेळत आहे.
****
No comments:
Post a Comment