Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 16 November 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
नगर पंचायत तसंच नगर परिषद निवडणुका या स्थानिक
निवडणुका असल्यानं या संदर्भातला निर्णय स्थानिक पदाधिकारी घेत असतात, असं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमुद केलं आहे. ते आज दुपारी छत्रपती संभाजीनगर
दौऱ्यासाठी शहरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या
निवडणुकीबाबतचा निर्णय देखील योग्य वेळी घेण्यात येईल, अशी
माहिती त्यांनी यावेळी दिली. सिडको चौकात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती
पुतळ्याचं तसंच हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या क्रांती
चौक परिसरातल्या अर्धपुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे. कमल
तलावाच्या पुनर्जिवन प्रकल्पाचं लोकार्पणही ते दूरस्थपद्धतीनं करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते सातारा परिसरातल्या श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच संशधोन
केंद्राच्या नव्या इमारतीचं उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमांच्या वेळेत या रस्त्यांवरची
वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये
आगमनानंतर प्रारंभी चिकलठाणा इथं भाजपच्या कार्यालायचं उदघाटन केलं.
***
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छूक
उमेदवारांचे उमेदवारी अर्जऑनलाईन तसचं ऑफलाईन पद्धतीनं आज रविवारीही स्वीकारली जात
आहेत. आज सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश राज्य
निवडणूक आयोगानं दिले आहेत. अर्ज आणि शपथपत्रं दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या दुपारी
तीन वाजेपर्यंत आहे. तरी अधिकाधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज आज दाखल केल्यास उद्या अखेरच्या
दिवशी होणारी धावपळ टळू शकेल, असंही राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे
****
अमृत फार्मसी या केंद्र सरकाच्या आरोग्य
आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या उपक्रमाच्या देशव्यापी विस्ताराची घोषणा केंद्रीय आरोग्य
मंत्री जे.पी. नड्डा यांनी केली आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं अमृतच्या दहाव्या
वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन करतांना काल ते बोलत होते.अमृत फार्मसीद्वारे सर्वसामान्यांना परवडणा-या दरात वैद्यकीय उपचारांसाठीच्या
औषधांसह प्रत्यारोपणासाठीचं साहित्य उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. भारताच्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयासह प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अमृत फार्मसी असली पाहिजे, हे
भविष्यातलं आव्हान असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले. जनऔषधी आणि अमृत फार्मसीद्वारे गेल्या
दहा वर्षात गरीब गरजु विशेषत: कनिष्ट उत्पन्न गटातील जवळपास साडेसहा कोटींहून जास्त
रुग्णांना जिवन रक्षक वैद्यकीय मदत प्राप्त झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
ब्रिटीशांविरुध्दच्या स्वातंत्र्यलढ्यातील
थोर तरुण क्रांतीकारक स्वातंत्र्यसैनिक कर्तारसिंग सराभा यांचा आज स्मृतीदिन.मुळ पंजाबमधील
सराभा यांनी अमेरीकेत गदर पार्टीचे प्रमुख म्हणून
परदेशातील भारतीयांमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरणा जागृत केली.ब्रिटीधांविरुध्द
भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या एका योजनेतील सहभगासाठी कर्तारसिंग सराभा यांना वयाच्या
अवघ्या एकोणीसाव्या वर्षी आजच्या दिवशी फाशी देण्यात आली.क्रांतीकारक भगतसिंग त्यांना
आपले आदर्श मानत. दरम्यान,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात, कर्तारसिंग
सराभा यांनी देशाचं स्वातंत्र्य हेच आपल्या जिवनाचं ध्येय बनवलं.त्यांचं कार्य भारतीयांना मातृभूमीसाठी
समर्पणाची सदैव प्रेरणा देत राहील शब्दात अभिवादन केलं आहे.
****
कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये सुरू असलेल्या
पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग
करताना, भारतानं दुसऱ्या डावात,
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, तीन बाद ३८ धावा केल्या
आहेत. यापूर्वी,
दक्षिण आफ्रिकेनं आज आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात सात बाद
९३ धावांवरून केली आणि संपूर्ण संघ १५३ धावांवर
बाद झाला. पाहुण्या संघाकडून कर्णधार टेंबा बावुमा यानं सर्वाधिक नाबाद ५५ धावा केल्या.
दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात
ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिल
याला मानेला दुखापत झाल्यामुळं कालच्या खेळानंतर तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात
आलं असून तो या सामन्यात खेळू शकणार नाही. गिलच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ऋषभ पंत संघाचं
नेतृत्व करत आहे. भारतानं आपल्या पहिल्या डावात १८९ धावा केल्या असून दक्षिण आफ्रिकेनं
पहिल्या डावात १५९ धावा केल्या आहेत.
****
आजचा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणूनही
साजरा केला जातो.१९६६ साली स्थापन् झालेल्या भारतीय पत्रकार परिषदेच्या स्थापनेचा वर्धापन
दिन म्हणून याची ओळख आहे. राष्ट्रीय पत्रकार दिवस हा फक्त पत्रकारितेच्या यशाचा उत्सव
नसून माहितीपूर्ण,
पारदर्शक आणि जबाबदार समाज निर्माण करण्याची पत्रकारांची मूलभूत
जबाबदारी अधोरेखित करणारी आठवण देखील आहे.
****
ग्रेटर नोएडा इथं आयोजित जगतिक मुष्टीयुध्द
चषक अंतिम स्पर्धेला आज प्रारंभ होत आहे.ही स्पर्धा जागतिक मुष्टीयुध्द चषक मालिकेचा
एक भाग आहे.
***
No comments:
Post a Comment