Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 18
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं
वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. जलसंवर्धन
आणि व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल १० श्रेणींतील ४६ विजेत्यांना सर्वोत्कृष्ट
राज्य, जिल्हा, उद्योग ते वैयक्तिक श्रेणीपर्यंत यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य श्रेणीमध्ये
महाराष्ट्राला प्रथम क्रमांकानं गौरवण्यात येणार आहे.
****
दिल्ली कार स्फोटप्रकरणी सक्तवसुली
संचालनालय – ईडीने दिल्ली आणि एनसीआर मध्ये, अल् फलाह विद्यापीठाशी संबंधीत
ठिकाणी पंचवीसहून जास्त परिसरांमध्ये शोध मोहीम राबवली. आर्थिक गैरव्यवहार, बनावट कंपन्यांचा
उपयोग, निवासी संस्था आणि आणि मनी लाँड्रिंगसंदर्भात सुरू असलेल्या तपासाचा हा भाग होता.
एकाच पत्त्यावर नोंदणी असलेल्या नऊ बनावट कंपन्यांबाबत तपास सुरू असून, अल फलाह ट्रस्ट
आणि संबंधित संस्थांच्या भूमिकांचाही तपास सुरू असल्याचं ईडीनं सांगितलं आहे. याशिवाय
विद्यापीठ अनुदान आयोग आणि नॅक मूल्यांकनाबाबतच्या या संस्थेच्या दाव्यामध्ये प्रथमदृष्ट्या
विसंगती आढळून आल्यानं याबाबतही तपास सुरू आहे. या महिन्याच्या दहा तारखेला दिल्लीत
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटासंदर्भात अनेक डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर
अल फलाह विद्यापीठाची तपासणी सुरू आहे.
****
बिहारमध्ये पाटणा इथं राष्ट्रीय
लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीतून रालोआ
विधिमंडळाचा नेता निवडला जाणार आहे. रालोआचे पाच घटक पक्ष – भारतीय जनता पक्ष, संयुक्त जनता
दल, लोकजनशक्ति पक्ष, हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे २०२
आमदार या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री नीतिशकुमार यांचीच पुन्हा विधिमंडळाच्या
नेतेपदी निवड होण्याची शक्यता असून, नेता निवडीनंतर रालोआ सत्तास्थापनेचा दावा करेल.
****
बनावट मतदार ओळखण्यासाठी निवडणूक
आयोग आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार असून, पश्चिम बंगालमध्ये
याची सुरुवात होणार आहे. बनावट आणि मृत मतदारांची ओळख पटवण्यासाठी एआयच्या फेस-मॅचिंग
तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. एआयची अशी मदत घेतली तरी, सत्यापन प्रक्रियेच्या
केंद्रस्थानी बूथ-स्तरीय अधिकारीच राहतील, असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट
केलं आहे.
****
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात
एराबोर पोलिस स्टेशन हद्दीतील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या
चकमकीत कमांडर हिडमा ठार झाला. या परिसरात अद्यापही चकमक सुरू असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण
होण्यासाठी केंद्र सरकारनं आखलेल्या ‘स्वच्छ ऊर्जा-सक्षम राष्ट्र’ धोरणामध्ये, अणुऊर्जेतून
वीज निर्मिती करण्यासाठी राज्यांचा सहभाग वाढवला जाणार असून, अणुऊर्जेपासून
वीज निर्मिती, या उपक्रमामध्ये सहभागी होणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड
-महाजनको आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात यासंदर्भात सामंजस्य
करार झाला. स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेनं महाराष्ट्रानं उचललेलं हे महत्त्वपूर्ण
पाऊल असून, महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी
यावेळी व्यक्त केला.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीत अपक्ष उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी आपले अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा, मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी व्यक्त केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. एका जागेवर
फक्त एकाच व्यक्तीला एबी फॉर्म देता येत असल्यामुळे, उर्वरित कार्यकर्त्यांनी निराश
न होता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी काम करावं, असं त्यांनी
सांगितलं. मुंबई महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार असून, सरकार स्थापनेसाठी
आवश्यक दोन तृतीयांश जागा आणि ५१ टक्के मतं मिळवणं हे ध्येय असल्याचं बावनकुळे यांनी
सांगितलं.
****
नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी
दाखल अर्जांची छाननी आज होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी
एकूण एक हजार ३१० अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सुधारित पत्रकात
ही माहिती देण्यात आली. जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी ८९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
राज्यात अनेक भागांमध्ये किमान
तापमानात लक्षणीय घट झाली आहे. आज सर्वात कमी सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान
धुळे इथं नोंदवलं गेलं. निफाडमध्ये सहा पूर्णांक नऊ, तर नाशिकमध्ये नऊ पूर्णांक
दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट वाढण्याची
शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment