Tuesday, 18 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 18 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या आठ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरु होणार आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना काल जारी करण्यात आली.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आता येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल ही माहिती दिली. लाडकी बहीण योजनेतल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आजपर्यंतची मुदत होती; मात्र काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल १० श्रेणींतील ४६ विजेत्यांना सर्वोत्कृष्ट राज्य, जिल्हा, उद्योग ते वैयक्तिक श्रेणीपर्यंत यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

****

ब्राझिलमध्ये बेलेम इथं आयोजित COP30 हवामान परिषदेत भारताने जागतिक पातळीवर आपली ठाम भूमिका मांडली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी राष्ट्रीय निवेदन सादर केलं. COP30 ही फक्त चर्चा नव्हे, तर अंमलबजावणी आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारी परिषद ठरली पाहिजे, असं ते म्हणाले. हवामान बदलावरील वचनबद्धतांचा विकसित देशांनी सन्मान करावा, शून्य उत्सर्जनाची उद्दिष्टे निश्चित मुदतीपूर्वी साध्य करावीत, असंही त्यांनी सांगितलं.

****

गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी केंद्र सरकार आणि विविध नियामक यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना केल्या असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सचिव अनुराधा ठाकूर यांनी सांगितलं. सीआयआय तर्फे मुंबईत आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात त्या बोलत होत्या. अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रारंभिक समभाग विक्रीचा आधार घेतला जात असल्याबद्दल मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंतनागेश्वरन यांनी चिंता व्यक्त केली. गुंतवणुकीच्या आकड्यांना प्रत्यक्ष कामगिरीचं पाठबळ मिळालं नाही तर वैयक्तिक बचत उत्पादक गुंतवणुकीपासून फारकत घेऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

****

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आयोजित महिला सक्षमीकरण आणि युवक-युवती संमेलनाचा काल केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांच्या उपस्थितीत समारोप झाला. केंद्र सरकार आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, प्रत्येक पाडा विकासाच्या प्रवाहात आणला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

विद्यापीठांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुणांकन पातळी सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि व्हिजन महाराष्ट्र २०४७ या विषयावर मुंबईत राजभवन इथं आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी केवळ योजना तयार करणं पुरेसं नसून, त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी झाली पाहिजे, असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तसंच राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

****

राज्यात कालपासून कुष्ठरुग्‍ण शोध अभियानाची सुरुवात झाली. या अभियानात एक कोटीपेक्षा जास्त घरं सर्वेक्षणासाठी निवडली असून, त्‍यातील आठ कोटी ६६ लाख लोकसंख्येची तपासणी करण्‍याचं उद्दिष्ट आहे. ही मोहीम दोन डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सर्व सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

****

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर आणि जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात, अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी काल दिल्या. मानव-बिबट संघर्ष उपाययोजनांबाबत पुण्यात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. बिबट नसबंदी करण्याबाबत केंद्राची मान्यता मिळाली असून, त्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. सध्या बिबट्या पकडण्यासाठी असलेले दोनशे पिंजरे आता वाढवून एक हजार करण्यात येणार आहेत. याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं काही ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार आहेत असं नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांनी काल तिरुवनंतपुरम इथं विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट दिली. या विद्यार्थ्यानी रॉकेट प्रक्षेपण पाहिलं, तसंच पूर्वी प्रक्षेपण झालेल्या रॉकेटच्या प्रतिकृतींसह, चंद्रयान तीनची प्रतिकृती पाहिली. केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी गगनयान मोहिमबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली. केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या अभ्यास सहलीचं कौतुक केलं.

****

लातूर इथं राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेत १२ दिवस दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचं सादरीकरण होणार असल्याचं, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सांगितलं.

****

No comments: