Wednesday, 19 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचं वितरण करतील. तमिळनाडूत कोईंबतूर इथं होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, एकूण १८ हजार कोटी रुपये जमा केले जातील.

दरम्यान, तत्पूर्वी पंतप्रधान आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर असून, पुट्टपार्थी इथं नागरीकांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारं टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.

****

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी – एनडीएचे नवनिर्वाचित आमदार आज पाटणा इथं आपला नेता निवडण्यासाठी बैठक घेणार आहेत. भाजप, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पार्टी, हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या पाच एनडीए घटक पक्षांचे सर्व २०२ नवनिर्वाचित आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

****

आंध्र प्रदेशात अल्लुरी सिताराम राजू जिल्ह्यात रम्पचोडवरम वन क्षेत्रात आज सकाळी सुरक्षा बल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. याठिकाणच्या उर्वरित नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याचं आवाहन गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक महेशचंद्र लड्डा यांनी केलं.

****

राज्यशासन आणि ग्लोबल अलायन्स फॉर मास आंत्रप्रुनरशिप म्हणजे जी ए एम ई यांच्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार्य करार झाला. राज्यातल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षमता वाढवण्याला यामुळे मोठा वेग मिळणार आहे. या करारामुळे सूक्ष्म उद्योगांना लघु आणि मध्यम पातळीवर नेण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार असल्यानं प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा आहे.

****

बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा असून, पुढील कालावधीमध्ये प्रो बैलगाडा लीग सुरू करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते काल बोलत होते. शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचं संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणं हेच सरकारचं ध्येय असल्याचं शिंदे म्हणाले.

****

तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागानं निश्चित केली आहे. त्यानुसार, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार; हा सातबाऱ्यावरचा शेरा काढून टाकला जाईल, सातबाऱ्यावर नाव लागेल, यापूर्वी खरेदीचा फेरफार रद्द झाला असेल, तर तो पुन्हा तपासून मंजूर केला जाईल आणि खरेदीदाराचं नाव कब्जेदार म्हणून लावलं जाईल. इतर हक्कात नाव असेल तर ते आता मुख्य कब्जेदार; सदरात घेतलं जाईल. या निर्णयाचा फायदा राज्यातल्या ६० लाख कुटुंबांना होणार आहे.

****

आरोग्याला घातक असलेल्या प्रतिबंधित पदार्थांचा वापर आणि अशा पदार्थांची विक्री रोखण्यासाठी सावध राहण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहे. विभागाच्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली. नागरिकांना स्वच्छ आणि सकस आहार मिळावा तसंच उपहारगृह आणि हॉटेलच्या ठिकाणी अधिक चांगलं वातावरण राहावं, यादृष्टीने लवकरच राज्यात अभियान राबवण्यात येणार असून यामध्ये चांगलं काम करणाऱ्यांना गौरवण्यात येईल, असंही झिरवाळ यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात वाढती लोकसंख्या आणि महत्वाच्या ठिकाणी शौचालयांची कमतरता लक्षात घेता, शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ सार्वजनिक शौचालयं उभारण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या शौचालयांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होईल. असं सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भूवन शिक्षण संस्थेतर्फे संविधान जागर अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आयोजित स.भु. करंडक मराठवाडा विभागीय वक्तृत्व स्पर्धेचा समारोप काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेणं महत्त्वाचं असतं, कारण यश किंवा अपयश यापेक्षाही स्पर्धेतला अनुभव जीवनासाठी महत्त्वाचा असतो असं मत जिल्हाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

टोकियोमध्ये सुरु असलेल्या २५व्या मूकबधीरांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी काल १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकून दुहेरी कामगिरी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...