Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 21
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
सीमा सुरक्षा दल – बी एस एफ
मुळे देशाच्या सीमा सुरक्षित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं
आहे. गुजरातमधल्या भूज इथं आज सीमा सुरक्षा दलाच्या ६१ व्या
कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. जोपर्यंत बीएसएफ देशाच्या सीमेवर उपस्थित आहे
तोपर्यंत कोणीही आपल्या देशात प्रवेश करण्याचं धाडस करू शकत नाही, हा दल सर्व उंची गाठण्यात यशस्वी झाल्याचं शहा यांनी नमूद केलं.
तत्पूर्वी शहा यांनी परेड संचलनाची पाहणी करून मानवंदना
स्वीकारली. या विशेष परेडमध्ये १२ राज्यांतल्या बी एस एफ च्या तुकड्यांनी सहभाग
नोंदवला.
****
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण
गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा
स्मृतिदिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अभिमन्यू पवार
यांच्यास इतर मान्यवर उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात १०७ वीर
हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही
सामाजिक माध्यमावरच्या संदेशात, वीरांना अभिवादन केलं.
मराठी अस्मितेसाठी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या
निर्मितीसाठी दिलेलं हे बलिदानच भविष्यातल्या गौरवशाली महाराष्ट्राचा पाया
ठरल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
****
जी – २० शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. ग्लोबल साऊथमध्ये होणारी ही
सलग चौथी जी-20 शिखर परिषद आहे. दक्षिण आफ्रिकेनं आयोजित केलेल्या भारत-ब्राझील-दक्षिण
आफ्रिका संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीतही मोदी सहभागी होणार आहेत.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी जारी
केलेल्या निवेदनात ही शिखर परिषद प्रमुख जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी
असेल,
असं नमूद केलं.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र
सरकारनं ३० नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय
बैठक बोलावली आहे. संसदीय कार्य मंत्रालयानं सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना
याबाबत पत्र पाठवलं आहे. एक डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या या अधिवेशनात घेण्यात
येणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि रणनिती आखण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा
होण्याची अपेक्षा आहे.
****
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान
यांनी आज नवी दिल्लीत २०२४–२५ च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला.
अन्नधान्य उत्पादन २०१५–१६ मधल्या २५१ दशलक्ष टनांपासून १०६ दशलक्ष टनांनी वाढून
आता ३५७ दशलक्ष टन झालं आहे. विक्रमी अन्नधान्य उत्पादनाबद्दल कृषीमंत्र्यांनी
देशातल्या शेतकऱ्यांचे आभार मानले.
****
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बेकायदेशीर कोळसा खाणकाम
प्रकरणी सक्तवसुली संचालनालय – ईडीने आज झारखंड आणि पश्चिम बंगालमधल्या ४० हून
अधिक ठिकाणी छापे टाकले. कारवाई कोळसा चोरी आणि तस्करीच्या प्रकरणांशी संबंधित
आहे.
****
गोव्यात सुरु असलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सव – ईफ्फीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी, माहिती
आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव
संजय जाजू यांनी पणजीत कला अकादमीमध्ये मास्टरक्लासचं उद्घाटन केलं. प्रसिद्ध
चित्रपट निर्माते मुझफ्फर अली यांनीही उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली. अली
पहिल्या मास्टरक्लासमध्ये देखील सहभागी होणार असून, त्यांचे
गमन आणि उमराव जान हे चित्रपट देखील महोत्सवात दाखवले जाणार आहेत.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा ४१ वा
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह येत्या २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान साजरा होणार
आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. या तीन दिवसीय महोत्सवात
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाच्या
समारोप सोहळ्यात यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.
****
जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या
मार्गदर्शक सूचनांनुसार जालना जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत जिल्हा
परिषदेची 'हमारा शौचालय, हमारा भविष्य' ही
विशेष मोहिम,
आजपासून मानवाधिकार दिनापर्यंत म्हणजे १० डिसेंबरपर्यंत
राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्याचं आवाहन जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी केलं आहे.
या उपक्रमात बीड जिल्यातल्या सर्व एक हजार ३५६ गावात
वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयं दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून वापरात आणण्यात येणार
आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं, असं
आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केलं आहे.
****
ऑस्ट्रेलियान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत
भारताच्या लक्ष्य सेननं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या
उपान्त्यपूर्व फेरीत लक्ष्यने भारताच्याच आयुष शेट्टीचा २३-२१, २१-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग
शेट्टी या जोडीचा सामना, इंडोनेशियन जोडीशी होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment