Sunday, 23 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या जी- ट्वेंटी परिषदेचा आज समारोप होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात संबोधित करणार आहेत. ‘सर्वांसाठी एक नि:पक्ष आणि न्यायपूर्ण भविष्य - महत्वपूर्ण खनिजं, सभ्य कार्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ असा या सत्राचा विषय असणार आहे. यानंतर आज सायंकाळी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष, जपान-कॅनडा आणि इटलीच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. त्यानंतर आज सायंकाळी ते मायदेशी परतणार आहेत.

****

दरम्यान, जोहान्सबर्गमधील जी-२० शिखर परिषदेतील कालच्या जागतिक नेत्यांसोबतच्या बैठका फलदायी झाल्या असून प्रमुख मुद्द्यांवर विचारविनिमय झाल्याचं  मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूतपणा आणि रेल्वेची वाढती परिचालन क्षमता यातून दिसून येत आहे. रेल्वद्वारे अवजड मालाच्या वाहतुकीत होत असलेल्या वाढीमुळे आर्थिक प्रगतीसह इतरही अनेक लाभ होत आहेत. रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या, उद्योग आणि, पर्यावरणाला अनुकूल दळणवळणाचे पर्याय तसंच कार्बन उत्सर्जन थांबवण्याच्या लक्ष्यानुरूप शाश्वत विकासाला यामुळे चालना मिळत आहे, असं रेल्वेनं म्हटलं आहे.

****

देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा सुमारे ३५७ दशलक्ष टन झालं असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ते आठ टक्क्यांहून अधिक आहे, असं कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव - भारतीय कृषी अनुसंधान परिषद महासंचालक डॉ. एम. एल. जट यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. कृषी शास्त्राच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे शेतातील पिकांचं धसकट जाळण्याच्या प्रकरणात ९५ टक्क्यांनी घट झाल्याचं सांगत जट यांनी यासाठी शेतकरी आणि संशोधकांचं अभिनंदन केलं.

भारतात कडधान्ये, तेलबिया आणि बाजरीसह विविध प्रकारच्या भरड धान्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी निर्यातीतही लक्षणीय वाढ झाल्यामुळे देशाच्या आर्थिक वृद्धीस चालना मिळत असल्याच जट यांनी नमूद केलं आहे.

****

वायु दलातील शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांचा पार्थिव देह, आज तामुळनाडूच्या कोईंबतूर विमानतळ इथं आणण्यात आला. वायु दलातर्फे ‘लष्करी इतमामात’ त्यांना मानवंदना देण्यात आली. काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या दुबईत आयोजित हवाई प्रात्यक्षिकांच्या प्रदर्शनाप्रसंगी तेजस विमान कोसळल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता.

****

तेलंगणाच्या हैदराबाद इथं ३७ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत ते मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. नक्षलींच्या राज्य समितीच्या तीन वरिष्ठ  सदस्यांसह २५ महिलांचा यात समावेश आहे. या सर्वांनी हैदराबाद इथं पोलिसांकडे आपल्याकडील शस्त्र सुपूर्द केली. समर्पणानंतर राज्य समिती सदस्यांना प्रत्येकी वीस लाख रुपये दिले गेले. या सगळ्यांना यापुढही सहाय्य दिलं जाईल, असं तेलंगणाचे पोलिस महासंचालक बी. शिवाधर रेड्डी यांनी सांगितलं.

****

अयोध्या इथं परवा मंगळवारी २५ नोव्हेंबरला श्री राम मंदिरात ध्वजारोहण समारंभ होणार आहे. नवीन भारताची जागृत चेतना, सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक मूल्यांचं पुनरुज्जीवन याद्वारे होत असून हे जगभरातील बंधुत्वाच्या भावनेला बळकटी देणारं आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेड इथं श्री सचखंड गुरुद्वारा संस्थानतर्फे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागम निमित्त आजपासून परवा २५ नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादर साहिब यांनी मानवता- धर्म रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये तख्त साहिबमध्ये विशेष किर्तन दरबारचं आयोजन करण्यात आले आहे. जनजागृतीसह युवा पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी बलिदान स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांची सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. श्री गुरु तेग बहादर यांच्या जीवनावर आधारीत चर्चासत्र, आणि सर्व धर्म संमेलन होणार आहे. नागरिकांच्या वैद्यकिय सुविधेसाठी रक्तदान आणि निःशुल्क तपासणी  शिबीरही घेण्यात येत आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या पावडेवाडी इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पावडे यांचं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. निजाम राजवटीविरुद्ध हैदराबाद मुक्तीसंग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता.

****

केंद्रासह राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त अकोला जिल्हा परिषदेतर्फे २१ नोव्हेंबरपासून हमारा शौचालय, हमारा भविष्य ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील सर्व गावात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये दुरुस्ती करून वापरात आणण्यात येणार आहेत. येत्या दहा  डिसेंबरला मानवी हक्क दिनापर्यंत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं सिडनी इथं झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आज सकाळी, न्यु साउथ वेल्स इथं झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्यनं जपानच्या युशी तनाका याचा २१-१५, २१-११ असा सरळ सेटमध्ये पराभव करत निर्विवाद वर्चस्व दाखवत यश मिळवलं.

****

No comments: