Sunday, 23 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ नोव्हेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या जी- ट्वेंटी परिषदेचा आज समारोप होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात संबोधित करणार आहेत. ‘सर्वांसाठी एक नि:पक्ष आणि न्यायपूर्ण भविष्य - महत्वपूर्ण खनिजं, सभ्य कार्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ असा या सत्राचा विषय असणार आहे. या सत्रामध्ये पंतप्रधानांचं भाषणही होणार आहे.

****

भारताच्या संस्कृतीत रुजलेला एकात्मिक मानवतावाद हा संपूर्ण जगाला एकत्रितपणे प्रगती करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेत ते काल बोलत होते. जी-ट्वेंटी अंतर्गत जागतिक पारंपरिक ज्ञान भांडाराची स्थापना, जी -ट्वेटी आफ्रिका-कौशल्यवाढ उपक्रमाची सुरुवात, जी-ट्वेंटी जागतिक आरोग्य प्रतिसाद पथकाची निर्मिती, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपक्रम असे महत्त्वपूर्ण प्रस्ताव मोदी यांनी आपल्या भाषणातून मांडले. विविध देशांच्या प्रमुख नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही मोदी यांनी काल केली. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांसोबत त्यांनी चर्चा केली.

****

भारतानं अन्नधान्य उत्पादनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आठ टक्क्यांनी वाढ करुन, ३५७ मेट्रिक टन इतकी विक्रमी पातळी गाठल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद-आय.सी.ए.आर.च्या मते भारतानं याद्वारे  कृषी क्षेत्रात एक नवीन मापदंड स्थापित केला आहे.

****

कामगारविषयक नव्या संहितांना केंद्र सरकारनं लागू केल्याबद्दल समाजातून सकारात्मक प्रतिक्रीया येत आहेत. याद्वारे औपचारिक रोजगार निर्मिती, सामाजिक सुरक्षिततेचं जाळं यांच्यात वाढ होईल आणि कायदेपालन सुलभ होईल असं औद्योगिक संस्था आणि सल्लागार कंपन्यांनी म्हटलं आहे तसंच तंत्रज्ञान, कर्मचारी, सल्लागार आणि कायदे क्षेत्रातील उद्योग प्रमुखांनी संबंधीत सुधारणा या समायोजि, कामगार-केंद्रित आणि आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचं म्हटलं.

स्वातंत्र्यानंतर कामगारांच्या बाजूनं करण्यात आलेली ही सर्वात मोठी सुधारणा असल्याचं  भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव गिरीश आर्य नमूद केलं आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांनीही चार कामगार संहिता अंमलात आणण्याच्या सरकारच्या घोषणेचं स्वागत केलं आहे.

****

भारतीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरीक्षण अर्थात एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मोहिमेअंतर्गत १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५० कोटी ४५ लाखांहून अधिक म्हणजेच या टप्प्यात समाविष्ट असलेल्या ९९ टक्के मतदारांना गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. मतदार यादीची अचूकता आणि शुद्धता वाढवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे. वितरित केलेल्या अर्जांपैकी १७ कोटींहून अधिक अर्ज आतापर्यंत डिजिटायझेशन केलेले आहेत. याद्वारे मतदारांच्या तपशीलांची नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया अधिक जलद करण्यास मदत होत आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि पात्र मतदारांची १०० टक्के नोंदणी निश्चित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करत आहे.

****

रोगमुक्त रोपांच्या निर्मितीतून शेती उत्पादनांची शाश्वती- शुद्धतेसाठी केंद्र सरकारनं  उपक्रम सुरु केला आहे. राज्यात द्राक्षं, डाळिंबं आणि संत्र्याची रोगमुक्त रोपं मान्यवर संशोधन संस्थांच्या सहकार्यानं तयार करुन अधिकृत रोपवाटिकांद्वारे ती शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार आहेत, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पिकाचं उत्पादन आणि त्याची गुणवत्ता या दृष्टीनं भारतीय शेतमाल जगाच्या तुलनेत सुधारण्याला भरपूर वाव आहे. त्या दृष्टिनं रोगमुक्त रोपे हा या उपक्रमाचा एक भाग आहे.

****

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, महाराष्ट्र सरकार आणि झिरो माईल युथ फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पहिल्या नागपूर पुस्तक महोत्सवाचं काल उद्घघाटन केलं. ३० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या नऊ दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन पूर्व नागपुरातील रेशीमबाग मैदानावर करण्यात आलं आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहटी इथं खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या सहा गडी बाद ३०८ धावा झाल्या.. भारताकडून कुलदीप यादवने तीन बळी घेतले तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी काल प्रत्येकी एक बळी घेतला. कोलकाता इथं झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला.

****

इंदूर इथं झालेल्या भारतीय खुल्या स्पर्धेत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंगने भारताच्या जोश्ना चिनप्पाचा पराभव करून महिलांचे विजेतेपद पटकावले. अव्वल मानांकित आणि भारताची आघाडीची महिला स्क्वॅशपटू अनाहतने जोश्नाला ५४ मिनिटांत ३-२ ने हरवून अंतिम सामना जिंकला.

****

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन,ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या युशी तनाकासोबत अंतिम फेरीत लढत आहे. थोड्या वेळापूर्वी सुरु झालेला हा सामना जिंकून लक्ष्य सेनला अभिनव कामगिरी करण्याची संधी आहे.

****

३१व्या सुल्तान अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेत आज भारत-दक्षिण कोरीया पुरुष संघांत, मलेशियाच्या इपोह इथं दुपारी अडीच वाजता सामना होणार आहे.

****

No comments: