Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 24 November 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
जगभरात महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या
पद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज पंतप्रधानांनकडून व्यक्त
·
५३ व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती सूर्य कांत
यांचा आज शपथविधी
·
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक प्रचार शिगेला, सत्ताधारी-विरोधकांमध्ये
आरोप-प्रत्यारोप
·
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा आज ३५० व्या हौतात्म्य
दिन, नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
·
दृष्टीहीन महिलांच्या टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
भारताला जेतेपद; बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला
गवसणी
****
जगभरात
महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं जी - ट्वेंटी
नेत्यांच्या शिखर परिषदेत, ‘सर्वांसाठी समन्यायी भविष्य – अत्यावश्यक खनिजे, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या संकल्पनेवर आधारित तिसऱ्या सत्राला
ते काल संबोधित करत होते. तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित, जागतिक
आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं, असं पंतप्रधान म्हणाले.
शाश्वत विकास, विश्वासार्ह व्यापार, निष्पक्ष
वित्तपुरवठा आणि सर्वांना समृद्ध करणारी प्रगती आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
जी – ट्वेंटी शिखर परिषदेचा काल समारोप झाला.
****
देशाचे
५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत आज शपथ घेणार आहेत. विद्यमान
सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई काल सेवानिवृत्त झाले.
हरियाणात
हिसार जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या न्यायमूर्ती सूर्य कांत
यांनी २०११ मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली
होती. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायदानाची जबाबदारी सांभाळली होती,
तसंच ते काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
म्हणून कार्यरत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करणं,
तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणं,
बिहारमधल्या मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातल्या प्रकरणाच्या
सुनावणीत त्यांचा सहभाग होता. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह बार असोसिएशनमधल्या
एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यातही न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी योगदान दिलं होतं.
****
आगामी स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना
ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान, स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे. महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल वसमत, भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतल्या. लोक काँग्रेसनं ७५ वर्षात
काय दिले असा प्रश्न विचारतात, काँग्रेसनं रोजगार, शिक्षणासह असंख्य कामं केली असं त्यांनी सांगितलं. भाजपा हा पक्ष फोडणारी टोळी
बनली आहे अशी टीकाही सपकाळ यांनी केली.
उपमुख्यमंत्री
तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल अक्कलकोट, मोहोळ आणि
सांगोला इथं प्रचारसभा घेतल्या.
****
नवीन कामगार
संहितांनुसार समान कामासाठी समान वेतन सुनिश्चित करण्यात आलं असून, लिंगाधारित
भेदभावाला पूर्णतः बंदी आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे कामगार बाजारपेठेत अधिक समता
आणि समावेशनाला चालना मिळत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, मराठवाडा लघु आणि मध्यम उद्योग संघटना आणि कृषी – मासिआचे छत्रपती संभाजीनगर
जिल्हाध्यक्ष तथा उद्योजक अर्जुन गायकवाड,
बाईट – अर्जुन गायकवाड
****
गोव्यात
सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीमध्ये काल ‘अ ग्लोबल इंडिया
थ्रू इंडिपेंडंट सिनेमा: अ विमेन्स पॅनेल’ या विषयावर चर्चासत्र पार पडलं. अभिनेत्री-दिग्दर्शक
रजनी बसुमतारी, सिने छायाचित्रकार फौझिया फातिमा, अभिनेत्री-दिग्दर्शक
रॅचेल ग्रिफिथ्स आणि अभिनेत्री-दिग्दर्शक मीनाक्षी जयन यांनी यात सहभाग घेतला. महिलांचा
सर्जनशील आणि वैयक्तिक प्रवास स्वतंत्र सिनेमाचं भविष्य कसं घडवत आहे, यावर या चर्चेत उहापोह करण्यात आला.
तसंच काल
या महोत्सवात विविध कलाप्रकारही सादर झाले. केंद्रीय संचार कार्यालयाच्या पथकांचं प्रतिनिधित्व
करणाऱ्या देशभरातल्या कलाकारांनी आपली पारंपरिक लोकनृत्ये, प्रादेशिक
गाणी आणि उत्साही कथा सादर केल्या.
****
माहे ही
युद्धनौका आज मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. माहे श्रेणीतली ही पहिली
पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून, यात ८० टक्क्यापेक्षा
जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून
हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार, कलरीपयट्टू या युद्धकलेचा महत्त्वाचा भाग आहे.
****
शिखांचे
नववे गुरु, गुरु तेग बहादूर यांचा ३५०वा हौतात्म्य दिन आज पाळण्यात येत आहे.
१६७५ साली मुघल शासक औरंगजेब याच्या आदेशावरुन तेगबहादूर यांना ठार करण्यात आलं होतं.
या दिवसाला हुतात्मा दिन म्हणलं जातं. गुरु तेगबहादूर यांनी देशभरात गुरुनानक देव यांच्या
संदेशाचा प्रसार केला.
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी गुरु तेग बहादुर जी यांना अभिवादन केलं आहे. गुरु तेग बहादुर
जी यांनी धर्म, मानवता आणि सत्य यांचं रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण केले.
त्यांचं शौर्य, बलिदान आणि निःस्वार्थ सेवा या गोष्टी सर्वांसाठी
प्रेरणादायी आहेत. आपण त्यांच्या मूल्यांना आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करू आणि
आपल्या देशातलं ऐक्य आणि सौहार्द अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करु, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
**
नांदेड
इथं श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त अनेक धार्मिक
आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तख्त सचखंड साहिब इथं विशेष कीर्तन
दरबार, सद्भावना रॅली आणि सर्वधर्म संमेलन होणार आहे. तसंच नागरिकांसाठी
रक्तदान, वैद्यकीय तपासणी आणि मोफत डायलिसिस शिबिराचं आयोजन करण्यात
आल्याचं गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह यांनी सांगितलं.
छत्रपती
संभाजीनगर इथं काल भव्य वाहन फेरी काढून गुरु तेग बहादूर यांना अभिवादन करण्यात आलं.
यावेळी नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
संयुक्त
राष्ट्रांच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित ऐक्यम २०२५
या सांस्कृतिक महोत्सवाचा काल समारोप झाला. युनेस्को, राज्य पर्यटन
विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंठा आणि वेरुळ
लेणी परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय संस्कृती आणि जगाच्या सामायिक मूल्यांचा
सन्मान करण्यासाठी ३० हून अधिक देशांचे कलाकार, तज्ज्ञ आणि प्रतिनिधी
या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
****
हिंगोलीत
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि उगम ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित रानभाजी आणि रानफळे महोत्सवाचा काल समारोप झाला. नियमित आहारात रानभाज्यांचा
समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, वयोमान निरोगी राहतं तसंच औषधोपचारांवरील
खर्चातही घट होते, यासंदर्भात या महोत्सवात जनजागृती करण्यात
आली. विविध गावातल्या शेतकऱ्यांनी आणलेल्या रानभाज्या आणि रानफळांची माहिती घेण्यासाठी
विद्यार्थ्यांसह नागरीकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती.
****
भारतानं
पहिल्या दृष्टीहीन महिलांच्या टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं
आहे. काल श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा सात खेळाडू
राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळच्या संघाने दिलेलं ११५ धावांचं लक्ष्य
भारतीय संघाने तेराव्या षटकातच पूर्ण केलं.
****
भारत आणि
दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, आजच्या तिसऱ्या
दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात, बिनबाद नऊ धावांपासून पुढे
खेळ सुरु करेल. काल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४८९ धावांवर
संपुष्टात आला. कुलदीप यादवने चार, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारत ४८०
धावांनी पिछाडीवर आहे.
****
भारताचा
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली.
काल अंतिम फेरीत त्यानं जपानच्या युशी तानाका याच्यावर २१-१५, २१-११ अशी
सहज मात केली.
****
महिलांच्या
कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इराणला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला
आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इराणचा ३३-२१ अशा गुणफरकाने पराभव
केला.
****
No comments:
Post a Comment