Thursday, 1 January 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.01.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 January 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जानेवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासरथ म्हणून उदयास येत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिला टप्प्याचं १५ ऑगस्ट २०२७ रोजी लोकार्पण

·      नव्व्याणवाव्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाला साताऱ्यात प्रारंभ

·      कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर

आणि

·      दोन लाखांपर्यंतच्या पीककर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ- राज्यसरकारचा निर्णय

****

भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता एआय ही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासरथ म्हणून उदयास येत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज राष्ट्रपती भवनात, कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी कौशल्यांवरील एका विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता हे फक्त तंत्रज्ञान नसून, सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंजिनिअरिंग आणि डेटा विश्लेषण यासारखी कौशल्यं देशातील एआय टॅलेंट पूल विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या -

बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

डिसेंबर २०२५ मध्ये वस्तू और सेवा कर-जी एस टी चं एकूण संकलन एक लाख ७५ हजार कोटी रुपये इतकं झालं आहे. डिसेंबर २०२४ च्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्क्यांनी अधिक आहे.

दरम्यान, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआय व्यवहारात २०२५ च्या डिसेंबरपर्यंत मोठी वाढ झाली असून, २१ पूर्णांक ६३ अब्ज रुपयांचे व्यवहार झाले असल्याचं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने म्हटलं आहे. २०२४ च्या तुलनेत ही वाढ २० टक्के अधिक आहे.

****

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिला टप्प्याचं १५ ऑगस्ट २०२७ रोजी लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबई ते अहमदाबाद पर्यंतच्या या रेल्वेसेवेला टप्प्याटप्प्याने प्रारंभ होणार असून, सर्वप्रथम सुरत ते बिलिमोरा हा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

देशातली पहिली वंदे भारत शयनयान सेवा असलेली रेल्वे लवकरच गुवाहाटी ते कोलकाता दरम्यान सुरु होणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत एका चर्चासत्रात ते आज बोलत होते. येत्या १५ ते २० दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

****

गावाच्या विकासाचे निर्णय आता दिल्ली किंवा मुंबईतून न होता, थेट ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनीच घ्यायचे असल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यात लोणी बुद्रुक इथं ‘विकसित भारत जी-राम जी’ अभियानांतर्गत विशेष ग्रामसभेत कृषीमंत्री बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, योजनेचे राज्य सचिव गणेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मनरेगा योजनेतल्या त्रुटींच्या तुलनेत नव्या योजनेतल्या तरतुदींचा चौहान यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला.

****

पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं आज शौर्यदिन साजरा होत आहे. या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. ऐतिहासिक विजयस्तंभावर केलेली फुलांची आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शौर्यस्तंभाला अभिवादन केलं. या परिसरात सुरक्षेसाठी पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विजय स्तंभाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनानं सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘बार्टी’ नं ३१० बुक स्टॉल उभारले आहेत. पुणे परिवहन मंडळानं मोफत बस सुविधा उपलब्ध केली आहे.

****

नव्व्याणवाव्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाला आजपासून सातारा इथं प्रारंभ झाला. साहित्‍य महामंडळाचे अध्‍यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, तसंच मावळत्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण झालं. भवाळकर यांच्‍या हस्‍ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्‍घाटन झालं. त्यानंतर प्रकाशन कट्टा, कवी कट्टा, गझल कट्टा याचंही उद्घाटन करण्यात आलं. यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीत मान्यवर साहित्यिकांसह साहित्यप्रेमी नागरिक सहभागी झाले. चार दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन उद्या होणार आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्‍‍वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

****

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हिंगोलीत ही घोषणा केली. ते म्हणाले -

बाईट – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

हिंगोलीतील जलेश्वर तलावाच्या गाळामुक्त धरण, गाळयुक्त शिवारयोजनेअंतर्गत काम केलेल्या शेतकऱ्यांना बावनकुळे यांच्या हस्ते अनुदानाचं वाटप करण्यात आलं. तलावातला गाळ काढून खोली वाढवणं आणि तोच गाळ शेतामध्ये टाकून शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी राबवलेला हा उपक्रम हिंगोली पॅटर्न म्हणून नावारुपाला येईल, संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवण्यात बाबत सूचना देण्यात येतील असंही बावनकुळे यांनी जाहीर केलं.

 

आगामी महापालिका निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, यातून नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले -

बाईट – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

****

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बीड शहरातल्या सहकार संकुल भूमिपूजनासह ५७५ कोटी रुपयांच्या एक हजार २१६ विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कुलच्या नऊशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी आज सामुहिक सूर्यनमस्काराद्वारे नवीन वर्षाचं स्वागत केलं. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अशा पद्धतीनं नववर्ष स्वागताचं या शाळेचं हे विसावं वर्ष आहे.

****

धुळे महानगरपालिकेत दोन अपक्ष महिला उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सुरेखा चंद्रकांत उगले या आणखी एक महिला उमेदवाराचा बिनविरोध विजय निश्चित झाला.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेतील छाननीच्या वेळी प्रभाग ६ मध्ये अन्य स्पर्धक पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने इस्लाम पार्टीच्या मुनीरा शेख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राज्यातल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी मदत म्हणून आपलं एक दिवसाचं वेतन दिलं आहे. विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीत १६ लाख ५९ हजार रुपये जमा करण्यात आले. कुलगुरुंसह सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी अशा एकूण ४३५ जणांनी हे योगदान दिलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात गौण खनिजांचं अनधिकृत उत्खनन थांबवण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी वाहनांचा परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दोषींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी परिवहन विभागाने संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

****

बीड इथं आयोजित इज्तेमाचा आज समारोप होत आहे. आज या ठिकाणी तीन प्रमुख धर्मगुरुंनी मार्गदर्शन केलं, तीन तालुक्यांसाठी झालेल्या या इज्तेमामध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले.

****

राज्यात आज सर्वात कमी साडे आठ अंश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल जळगाव इथं नऊ पूर्णांक दोन तर अहिल्यानगर इथं नऊ पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

मराठवाड्यात बीड इथं ११, परभणी इथं १३ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर इथं १३ पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments: