Tuesday, 19 September 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 19.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१९ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं आर्थिक वाढीला गती देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर चर्चा करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि अधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहेत. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उप्तन्न गेल्या तीन वर्षांपेक्षा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****

आदर्श गृह निर्माण घोटाळ्याप्रकरणी, खटला भरण्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय पक्षपाती असून, तो राजकीय हेतूनं घेण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. या निर्णयाला अशोक चव्हाण यांनी, मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. काल या यासंबधीच्या याचिकेची सुनावणी सुरू झाली असून, पुढील सुनावणी आज होणार आहे.

****

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणी मागितल्याप्रकरणी काल ठाणे पोलिसांनी अटक केली. इक्बाल याच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्वांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडून इक्बाल यानं खंडणीपोटी चार सदनिका घेतल्या असून, अधिक सदनिकांची मागणी केल्यावर संबंधित व्यावसायिकानं केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

****

जालना जिल्ह्यात २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकांचा खर्च सादर न करणाऱ्या, ५४ उमेदवारांना तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. जालना नगरपालिका प्रशासनानं काल हे आदेश जारी केले. अपात्र उमेदवारांमध्ये जालना, अंबड, भोकरदन आणि परतूर इथल्या उमेदवारांचा समावेश आहे.

****

जालना-बुलडाणा मार्गावर आनंदगड घाटात, भरधाव बसनं दोन दुचाकींना धड़क दिल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक दाम्पत्य गंभीर जखमी झालं. काल रात्री नऊ वाजता ही दुर्घटना घडली.

****

ग्रामविकास विभागाच्या वतीनं १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ग्रामसमृद्धी आणि स्वच्छता पंधरवाडा साजरा होणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसंच ग्रामपंचायतींनी झीरो पेंडन्सी आणि कार्यालयांची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...