Tuesday, 7 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.11.2017 11.00AM

आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०७ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यभरात आज विद्यार्थी दिवस साजरा केला जात आहे. एकशे सतरा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १९०० साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत सर्वप्रथम प्रवेश केला होता, त्यांचा शाळा प्रवेश हा शैक्षणिक क्रांतीचं पहिलं पाऊल ठरला, त्यामुळे हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम डॉ. आंबेडकरांनी प्रथम प्रवेश घेतलेल्या सातारा जिल्ह्यातल्या राजवाडा चौक इथल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये होणार आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण आलं. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले, तर एक स्थानिक नागरिक जखमी झाला. कंडी क्षेत्रात शोधमोहीम करणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला, त्यानंतर ही चकमक झाली.
****
कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये देशात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे. मुंबई इथं ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. नवी दिल्ली इथं झालेल्या “वर्ल्ड फूड इंडिया” परिषदेच्या माध्यमातून जगभरातल्या अनेक गुंतवणूकदारांनी राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असल्याचं फुंडकर यांनी सांगितलं. या गुंतवणुकीमुळे कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल तसंच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
राज्यातल्या ग्रामीण गृहनिर्माणामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमधली अपूर्ण घरकुलं, वेळेत पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणार असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत ग्रामीण गृहनिर्माणाच्या कामकाजासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. ही कामं व्यवस्थितपणे होत आहेत की नाही याचा प्रत्येक तीन महिन्याला आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
*******

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...