आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ जानेवारी २०१८ सकाळी ११.००
****
औरंगाबाद इथं सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
प्राध्यापक दिनकर बोरीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सकाळपासून संस्थेच्या
प्रांगणात नागरिकांनी गर्दी केली आहे. बोरीकर यांचं काल सायंकाळी निधन झालं, ते ८३
वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आता थोड्यावेळानंतर औरंगाबाद इथल्या पुष्पनगरी
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
विद्यार्थी, वाहन चालक तसंच इंधनाचा वापर करणाऱ्या
प्रत्येकाला इंधन बचतीचं प्रशिक्षण देऊन इंधन बचतीसाठी जागृत करणं, देशाच्या प्रगतीसाठी
आवश्यक असल्याचं, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. मुंबई
इथं संरक्षण क्षमता महोत्सव - सक्षम या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत
होते. इंधन बचतीचं कार्य हे लोकसहभागातूनच यशस्वी होऊ शकेल, असं ते म्हणाले.
****
प्रायोगिक कलेच्या क्षेत्रात
मानाचे समजले जाणारे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या
हस्ते प्रदान केले जाणार आहेत. राष्ट्रपती भवनात नामवंत कलावंत आणि विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना
शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात
येईल तर अन्य कलावंतांना अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात येईल. यावर्षी
ही अकादमीरत्न शिष्यवृत्ती अरविंद पारीख, आर.वेदवल्ली, रामगोपाल
बजाज आणि सुनील कोठारी यांना देण्यात येणार आहे.
****
मराठवाड्यातल्या उद्योग तसंच उद्योजकांची माहिती
देणाऱ्या द्वैवार्षिक सूची पुस्तिकेचं काल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते
मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. मराठवाडा परिसरातल्या सुमारे सातशे उद्योजकांची माहिती यात संग्रहित करण्यात आलेली
आहे.
****
उद्यापासून सुरु होणाऱ्या पाचव्या
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं अभिनेते शशी कपूर यांच्या
जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या प्रोझोन मॉल इथं
हे प्रदर्शन २१ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment