Sunday, 1 July 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.07.2018 6.50

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.
****
·       दोनशे मिलिलिटरहून कमी क्षमतेच्या प्लास्टीक बाटल्या आणि ई-व्यापारात ऑनलाईन वस्तुंच्या आवेष्टनासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवरही बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·       मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट; मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीनं कार्यवाही करणार - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
·       दत्ता पडसलगिकर, राज्याचे नवे पोलीस महासंचालक तर सुबोध जैस्वाल मुंबईचे पोलीस आयुक्त
·       राज्यात आजपासून तेरा कोटी वृक्षलागवडीच्या महा वन महोत्सवाला प्रारंभ
आणि
·       चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक; तर मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून किदंबी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधूचं आव्हान संपुष्टात
****
राज्य शासन आता दोनशे मिलीलिटरहून कमी क्षमतेच्या प्लास्टीक बाटल्या आणि ई-व्यापारात ऑनलाईन वस्तुंच्या आवेष्टनासाठी लागणाऱ्या प्लास्टीकवरही बंदी घालणार असल्याचं पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबई इथं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत काल रात्री उच्चाधिकार समितीच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. दोनशे मिलीलिटरपेक्षा छोट्या बाटल्यांवर पूर्णत: बंदी असणार असून ई-कॉमर्स अंतर्गत वस्तुंवर आवरण म्हणून लागणारं प्लास्टीक अजून तीन महिने राज्यात वापरता येऊ शकेल, त्यानंतर त्याचं संकलन करुन त्याची विल्हेवाट लावणं संबंधीत आस्थापन्यांना बंधनकारक असणार आहे. मात्र, यास्वरुपातलं प्लास्टीक राज्याबाहेर विक्रीसाठी वापरता येऊ शकणार आहे.याचसोबत पन्नास मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टीक पिशव्या ज्यांचं वजन किमान दोन ग्रॅम असेल त्यांच्या वापरास मुभा देण्यात येणार आहे.
****
मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असून, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर राज्य शासन त्यावर तातडीनं कार्यवाही करणार असल्याचं, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजासाठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टी राज्य शासन करत असल्याचं पाटील म्हणाले. गेल्या नऊ महिन्यापासून मागास आयोगाचं काम वेगानं सुरू आहे, आयोगाचा अहवाल प्राप्त होताच, त्यावर मंत्रिमंडळात तातडीनं निर्णय घेऊन, तो न्यायालयाकडे पाठवला जाईल, असंही पाटील यांनी सांगितलं.
****
राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून दत्ता पडसलगिकर यांनी काल सूत्र स्वीकारली. सतीश माथूर सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेले सुबोध जैस्वाल यांना पडसलगिकर यांच्या जागेवर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं असून त्यांनीही काल आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकरकमी परतफेड योजनेला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. मुद्दल, आणि व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे, या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्याची मुदत काल ३० जूनला संपणार होती, ती आता ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 
****
यंदाच्या आषाढी वारीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छता अभियान राबवणार असल्याची माहिती, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. देहू आणि आळंदी इथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते आणि अन्न छत्र चालवणाऱ्यांसाठी हातमोजे, ॲप्रन, टोपी आदी साहित्यांचं मोफत वितरण करण्यात येणार आहे.  
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून सहा जुलै रोजी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचं देहू इथून पाच जुलै  रोजी प्रस्थान होणार आहे. यंदापासून अन्न छत्राच्या तपासण्या करुन वारकरी आणि भाविकांना सुरक्षित, स्वच्छ, आणि निर्भेळ अन्न उपलब्ध करुन दिलं जाणार असल्याचं, बापट यांनी सांगितलं.          
****
गेल्या वर्षी एक जुलै रोजी देशात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला होता, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आज देशभर वस्तू आणि सेवा कर दिन साजरा करत आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर काल अर्थमंत्री पियुष गोयल यांनी ग्राहकांनी विकत घेतलेल्या प्रत्येक वस्तूचं देयक दुकानदारांकडून मागून घ्यावं, असं आवाहन केलं आहे. यामुळे वस्तू आणि सेवा कर चुकवणाऱ्यांची संख्या घटून महसुलात वाढ होईल. परिणामी कराच्या दरात कपात होऊ शकेल, असं अर्थमंत्र्यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना सांगितले.
****
कायम खाते क्रमांक -पॅन कार्ड, आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठीची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवण्याचा निर्णय काल केंद्र सरकारनं घेतला. आतापर्यंत पाचव्यांदा ही मुदत वाढवण्यात आली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यात आजपासून तेरा कोटी वृक्षलागवडीच्या महा वन महोत्सवाला प्रारंभ होत आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आज सकाळी नऊ वाजता औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री पोलिस ठाण्याच्या प्रांगणात वृक्षारोपणानं या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
या मोहिमेंतर्गत मराठवाड्यात येत्या सात जुलैपर्यंत दोन कोटी ९२ लाख एवढी वृक्षलागवड करण्यात येणार असून त्यासाठी साडेचारशेच्या आसपास अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. वृक्षलागवड मोहिमेचा कालावधी ३१ जुलै पर्यंत असला, तरी त्याआधीच उद्दीष्टपूर्ती करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जाणार आहेत. मराठवाड्यात ‘तुती हब’ निर्माण करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात तुती लागवड केली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक हजार एक्याण्णव रोपं वन विभागामार्फत मोफत देण्यात आली असून त्यांची लागवड आजच होणं अपेक्षीत आहे. कन्या वन समृध्दी योजनेअंतर्गत, मुलगी जन्मलेल्या कुटुंबाला दहा रोपं शासनामार्फत मोफत देण्याची योजना आहे. या मोहिमेत सर्व घटकांनी सक्रीय सहभाग घेण्याचं आवाहन, विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी केलं आहे.
रम्यान, नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्याच्या आंबाळा इथं राखीव वन क्षेत्रात तर लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात वृक्षारोपण करून, या मोहिमेला शुभारंभ होणार आहे.
****
चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल नेदरलँडसोबत झालेला सामना एक - एक नं बरोबरीत सुटल्यानं, भारत अंतिम सामन्यात दाखल झाला. अंतिम फेरी, भारताची ऑस्ट्रेलियासोबत लढत होणार आहे.
तर दुसरीकडे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून किदंबी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटानं १३-२१, १३-२१ अशा सरळ दोन सेटमध्ये तर महिला एकेरीच्या रोमहर्षक सामन्यात तैवानच्या ताइ त्झू यिंगकडून सिंधूचा १५-२१, २१-१९, ११-२१ असा पराभव झाला
****
परभणी जिल्ह्यातल्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना समाविष्ट न करणं तसंच पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी भाग वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आमदार डॉक्टर राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कार्यालयास काल घेराव घालून आंदोलन करण्यात आलं. गोरगरीब जनतेला हक्काच्या घरापासून वंचित ठेवलं असून घरकुल योजनेचा ४५ कोटी रूपयांचा निधी पडून असल्याचा आरोप डॉक्टर पाटील यांनी यावेळी केला.
****
लातूर इथले खासगी शिकवणीचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी लातूर जिल्हा वडार समाज संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन काल प्रशासनाला सादर करण्यात आलं.
****
इयत्ता दहावीच्या जुलै-ऑगस्ट २०१८मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्जाची मुदत वाढवण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना येत्या बुधवारी चार जुलैपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.
****
कोल्हापूर इथं पुढारी वृत्तपत्रात कार्यरत असलेले पत्रकार केदार प्रभुणे यांचं काल सकाळी निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. औरंगाबाद इथं दैनिक मराठवाडा, देवगिरी तरुण-भारत आणि लोकमत या दैनिकांमध्ये प्रभुणे यांनी काम केलं होतं. काल सायंकाळी कोल्हापूरमध्ये त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
परभणी इथल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालायातले क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर याला काल दहा हजार रुपयांची लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सेवाभावी संस्थेच्या व्यायाम शाळेसाठी मंजूर झालेलं साहित्य देण्यासाठी त्यांनं ही लाच मागितली होती.
****
जळगाव जिल्ह्यातल्या वाकडी इथल्या घटनेच्या निषेधासाठी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड आणि सेलू तहसील कार्यालयावर काल मातंग समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. आपल्या विविध मागण्याचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं.
****
शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये रूजू होताना मूलभूत सांख्यिकी शास्त्राचं प्रशिक्षण आवश्यक असल्याचं मत, मराठवाडा विकास मंडळाचे अपर आयुक्त डी.एम.मुगळीकर यांनी व्यक्त केलं आहे. अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयातर्फे १२व्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त काल औरंगाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “कार्यालयीन सांख्यिकीची गुणवत्ता हमी” या मध्यवर्ती संकल्पनेवर यंदाचा सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला.
//**********//



No comments: