Monday, 2 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जुलै २०१ सकाळी .५० मि.

****



v राज्यात ई वे बिलाची मर्यादा ५० हजार रुपयांवरून एक लाख रुपये

v तेरा कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी मोहिमेला कालपासून प्रारंभ

v साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची यापुढे सर्वसहमतीने निवड होणार

v मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यात पाच जणांचा मारहाणीत मृत्यू

 आणि

v औरंगाबाद इथं, विश्व संवाद केंद्राचे देवर्षि नारद पुरस्कार प्रदान 

****



 राज्यात ई वे बिलाची मर्यादा ५० हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात आली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीएसटी कर महसूलात ३९ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

 औरंगाबाद इथं केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयात जी.एस.टी.वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला, विभागीय सहआयुक्त अशोक कुमार यांनी यावेळी केलेल्या भाषणात, या करप्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात करवसूली झाल्याची माहिती दिली.

****



 नागपूर इथं परवापासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या, पावसाळी अधिवेशनात प्लास्टिकबंदी, नाणार प्रकल्प, शेतकरी कर्ज माफी, आदी मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याची शक्यता असल्याचं, पी.टी.आय. या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणं अपेक्षित असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, महामार्गांसाठी भूसंपादन जलद व्हावं, यासाठी नियमांमध्ये आवश्यक सुधारणा होण्याची  शक्यता आहे. हे अधिवेशन सुरळीतपणे पार पडेल अशी आशा व्यक्त करत, विरोधी पक्षांशी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

 दरम्यान, विधीमंडळ अधिवेशन काळातच, विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या अकरा जागांसाठीची निवडणूक, येत्या सोळा जुलैला होणार आहे. निवृत्त होणाऱ्या या  अकरा सदस्यांमध्ये काँग्रेसचे तीन सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, भाजपचे दोन तर शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे.

****

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक न घेता, सर्वसहमतीने अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. नागपूर इथं महामंडळाच्या बैठकीत, या निर्णयासाठी घटनादुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. पुढच्या वर्षी त्र्याण्णवाव्या साहित्य संमेलनापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, यंदा होणाऱ्या ब्याण्णवाव्या साहित्य संमेलनासाठी मात्र अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

****

 राज्यात टँकरच्या संख्येत घट झाली असून जलयुक्त शिवार योजनेमुळे हे साध्य झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या यशाचं श्रेय मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाला दिलं आहे.



दरम्यान, विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मात्र ही योजना पूर्णपणे फसली असून त्यात भ्रष्टाचार झाल्याची टीका केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 तेरा कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत, ठाणे जिल्ह्यात कल्याणजवळ वरप गाव इथं वृक्षारोपण करुन या मोहिमेला सुरुवात झाली.

 औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं पोलिस ठाण्याच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. या मोहिमेद्वारे औरंगाबाद जिल्ह्यात ४४ लाख, ४४ हजार झाडं लावण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे.

 उस्मानाबाद, इथं जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यासाठी २८ लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे.

 हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमातंर्गत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.

 परभणी, जालना, लातूर, बीड, आदी जिल्ह्यांमध्येही वृक्षारोपण करून, या मोहिमेला सुरुवात झाली.

****

 मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यात पाच जणांना ग्रामस्थांनी मारहाण केली, त्यात या पाचही जणांचा मृत्यू झाला. सातारा आणि सांगलीचे सातजण, साक्री तालुक्यातल्या राईनपाडा इथं बाजारात भिक्षा मागण्यासाठी गेले असता, स्थानिकांच्या जमावानं त्यांना मारहाण केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 गडचिरोली जिल्ह्यात भरधाव कार आणि प्रवासी जीप यांच्यात झालेल्या भीषण धडकेत सात जण ठार तर पाच जण जखमी झाले. जिमलगट्टानजिक गोविंदगाव इथं काल सकाळी  ही दुर्घटना घडली.

****

 उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात काल एक खासगी बस दोनशे मीटर खोल दरीत कोसळून ४८ प्रवाशांचा मृत्यू झाला. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्यानं, हा अपघात झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

 माजी मुख्यमंत्री आणि राज्यातल्या हरित धवल क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केली. 

 औरंगाबाद, इथं वसंतराव नाईक यांना विविध पक्ष संघटनांच्यावतीनं अभिवादन करण्यात आलं. परभणी इथं महापौर मीना वरपूडकर यांनी तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

 मराठवाड्यातील पत्रकारितेचा इतिहास संकलित होणं आवश्यक असल्याचं, ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं, विश्व संवाद केंद्राचा देवर्षि नारद पुरस्कार काल आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये यांना कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पाच हजार रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

विश्व संवाद केंद्राच्या इतर पुरस्कारांपैकी युवा पत्रकार पुरस्कार, पुणे इथं कार्यरत मनोज कुलकर्णी यांना, ग्रामीण पत्रकार पुरस्कार नंदुरबारचे वेस्ता पाडवी यांना, महिला पत्रकार पुरस्कार औरंगाबादच्या पूनम मिश्रा यांना, तर पत्रलेखनासाठीचा पुरस्कार जळगावच्या संगीता जोशी यांना प्रदान करण्यात आला.

 पुरस्काराला उत्तर देताना जायभाये यांनी, आजची पत्रकारिता वृत्तपत्राच्या मालकाशी बांधील असून, कंत्राटी पद्धतीमुळे पत्रकारिता अस्थिर झाली आहे, ही समस्या सोडवण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं मत जायभाये यांनी व्यक्त केलं. पुरस्कारात मिळालेला पाच हजार रुपयांचा धनादेश, जायभाये यांनी विश्व संवाद केंद्राच्या विविध उपक्रमांसाठी केंद्राच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केला.

 आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे या पूर्वीचे वृत्त विभाग प्रमुख वसंतराव देशपांडे, पुरुषोत्तम कोर्डे, संजय आर्वीकर यांच्यासह आकाशवाणी चे लातूर प्रतिनिधी अरुण समुद्रे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे.

****



 चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं भारतावर विजय मिळवत अजिंक्यपद पटकावलं. निर्धारित वेळेत दोन्ही संघात १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने पेनल्टी शूट आऊटमध्ये भारतावर ३-१ ने मात केली.

****

 नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातल्या बाभळी बंधाऱ्याचे चौदा दरवाजे काल उघडून  १५ पूर्णांक ८१ दशलक्ष घनमीटर जलसाठ्याचा विसर्ग करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानूसार, त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत ही कार्यवाही झाली.

****

 पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पक्षीय नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल वार्ताहरांना दिली. पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या २५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे.

****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या तीसगाव इथले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक नायकवाडी यांचं काल पहाटे हृदयविकारानं निधन झालं.ते बासष्ट वर्षांचे होते. पाथर्डी तालुक्यातल्या मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त म्हणून ही त्यांनी काम पाहिलं होतं.

****

 डॉक्टर्स दिनानिमित्त काल उस्मानाबाद इथं वैद्यकीय विभागाच्या वतीनं ‘डॉक्टर संवाद’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांच्या समस्या जाणून घेऊन रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देणं हा या संवाद उपक्रमाचा उद्देश होता. वैद्यकीय कायद्यात होणाऱ्या जाचक अटी रद्द करणं, डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे करणं आदी मागण्याही यावेळी  करण्यात आल्या.

****



 हिंगोली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण अंतर्गत १०० कोटी इतकं अनुदान मिळालं असल्याची माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यापूर्वी हे अनुदान जवळपास ८० कोटी रुपये मिळत होतं.

****



 लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या युवकांना उद्योजक बनण्यासाठीचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या धर्तीवर लातूर स्टार्टअप वीकचं आयोजन केलं जाणार असल्याचं पालक मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी म्हटलं आहे. शहरानजिक औद्योगिक वसाहतीत आस्था कौशल्य विकास केंद्राचं  उद्घाटन पाटील यांच्या हस्ते काल झालं  त्यावेळी ते बोलत होते.

*****

***

No comments: