आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंजाब नॅशनल बँकेचं तेरा हजार कोटी रुपयांचं कर्ज
बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना - इंटरपोलनं रेड कॉर्नर
नोटिस जारी केली आहे. एखाद्या गुन्हेगाराला जगभरातून शोधून अटक करण्यासाठी आणि संबंधित
देशात प्रत्यार्पण करण्यासाठी इंटरपोलकडून रेड नोटीस बजावली जाते.
****
सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज चव्वेचाळीस दिवसांच्या
उन्हाळी सुटीनंतर आज पुन्हा सुरू होत आहे. आधार संबंधी एका खटल्याची तसंच अन्य महत्त्वाच्या
खटल्यांची सुनावणी आता होईल अशी अपेक्षा आहे. अयोध्या विवादासंबंधी अलाहाबाद उच्च न्यायालयानं
आठ वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयाविरुद्धची तसंच मुस्लिमांमधल्या बहुपत्नित्वाच्या
प्रथेला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी आता सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
****
शेतकऱ्यांना खताचा पुरवठा होण्यासाठी होत असलेला
विलंब लक्षात घेत, सरकारनं परदेशी जहाजांना खतांची वाहतूक करण्याचे परवाने देण्याचा
निर्णय घेतला आहे. केंद्रसरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत केलेल्या संशोधनानुसार,
सागरी मार्गानं दरवर्षी साठ ते सत्तर लाख टन खताची वाहतूक केल्यास आठशे ते नऊशे कोटी
रुपयांची बचतही होणार आहे.
****
मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यात
जमावानं केलेल्या मारहाणीत पाच जणांची हत्या झाल्या प्रकरणी पोलिसांनी तेवीस संशयितांना
ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सामाजिक संपर्क माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर
विश्वास ठेवू नये, असं आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.
जालना जिल्हा पोलिस दलानंही एक पत्रक प्रसिद्ध करत,
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊन अनोळखी व्यक्तींना मारहाण करू नये, असं आवाहन केलं
आहे. एखाद्या व्यक्तीचा संशय आल्यास, तिला पोलिसांच्या स्वाधीन करावं, पोलिस त्या बाबत
शहानिशा करतील. जमावाने केलेल्या मारहाणीत संबंधित व्यक्ती ठार झाल्यास किंवा जखमी
झाल्यास, गंभीर गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर इथले पत्रकार सुभाष यशवंतकर
यांचं आज पहाटे नांदेड इथं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ४९ वर्षाचे
होते.
*****
***
No comments:
Post a Comment