Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 2 July 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जुलै २०१८ दुपारी
१.०० वा.
****
संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशना दरम्यान होणार
असलेल्या राज्यसभा उपसभापतींच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री
विजय गोयल, विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. या निवडणुकीची तारीख विरोधी
पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून ठरवली जाईल, तसंच ही निवडणूक लवकरात लवकर घेण्याची
सरकारची इच्छा आहे, असं त्यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे. राज्यसभेचे याआधीचे
उपसभापती पी.जे.कुरियन हे काल निवृत्त झाले. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या अठरा तारखेला
सुरू होऊन येत्या दहा ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
****
दरम्यान, राज्यसभेच्या पुढच्या उपसभापतींची निवड,
सरकार पक्ष आणि विरोधी पक्षांनी सर्वसहमतीनं करावी,असं आवाहन राज्यसभेचे सभापती एम.
व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. मावळत्या उपसभापतींसाठी काल झालेल्या निरोप समारंभात
ते बोलत होते. मावळते उपसभापती पी.जे.कुरियन यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना,
सदनात, मतभेदाच्या कोणत्याही मुद्द्यावर सरकार आणि विरोधी पक्षांनी सामंजस्यानं चर्चा
करून मार्ग काढावा, गोंधळ करून सदनाच्या कामाचा वेळ वाया घालवू नये, असं आवाहन केलं.
****
चव्वेचाळीस दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सर्वोच्च
न्यायालयाचं कामकाज आज पुन्हा सुरू झालं. मुस्लिम धर्मियांमधल्या बहुपत्नीत्व तसंच
निकाह हलाला या प्रथांना आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी घेण्यास न्यायालयानं होकार
दिला असून, या याचिकांच्या संदर्भातलं म्हणणं मांडण्याची परवानगी न्यायालयानं केंद्रसरकारला
दिली आहे. यासंदर्भातल्या याचिकांची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या पीठापुढे व्हावी,
ही, वरिष्ठ वकील व्ही.शेखर यांनी केलेली मागणीही न्यायालयानं मान्य केली आहे.
****
काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी, राज्यसभा सदस्यपदी
झालेल्या आपल्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल करून न घेण्याचे आदेश गुजरात उच्च
न्यायालयाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय येत्या नऊ तारखेला सुनावणी घेणार असल्याचं पीटीआयच्या
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकपालांची नियुक्ती करण्यासाठी किती कालावधी लागेल,
याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकारला
दिले. न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि आर.भानुमती यांच्या पीठासमोर आज यासंदर्भातल्या एका
जनहित याचिकेची सुनावणी झाली, त्यावेळी हे निर्देश न्यायालयानं दिले. लोकपाल नियुक्तीची
प्रक्रिया कशी असेल, याबद्दल केंद्रसरकारनं दहा दिवसात माहिती द्यावी, असंही न्यायालयानं
म्हटलं आहे. याप्रकरणी येत्या सतरा जुलैला पुढची सुनावणी होणार आहे.
****
श्रीअमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पाचवी तुकडी आज
जम्मूहून रवाना झाली. चार हजार सत्तेचाळीस यात्रेकरूंची ही तुकडी चोख पोलिस बंदोबस्तात
आज पहाटे निघाली. २७ जूनपासून सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत जम्मूहून वीस हजार
दोनशे एकोणतीस यात्रेकरू रवाना झाले आहेत.
****
मोसमी पावसानं जून महिन्यातली सरासरी ओलांडल्यामुळे
राज्यातल्या धरणांमधल्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. प्रमुख धरणांत कालपर्यंत सरासरी वीस पूर्णांक त्र्याऐंशी
टक्के पाणीसाठा जमा झाला असल्याचं वृत्त आहे. नागपूर, नाशिक, मराठवाडा आणि पुणे विभागात
हा साठा, गेल्या वर्षीच्या या कालावधीतल्या साठ्याच्या तुलनेत जास्त असून, अमरावती
आणि कोकण विभागात मात्र या साठ्यात घट झाली आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा ग्रामीण रुग्णालयानं
‘एड्समुक्त गाव‘ ही मोहीम सुरू केली आहे. २०१८-१९ या वर्षात, एड्स या आजाराविषयी समाजातल्या
तळागाळापर्यंतच्या लोकांना जागरूक करण्याच्या दृष्टीनं या रुग्णालयानं ही मोहीम हाती
घेतली आहे. या मोहिमेत, या आजाराविषयीची संपूर्ण माहिती देणारे फलक गावोगावी लावले जाणार असून, प्रत्येकाला व्यक्तीश: या आजाराची
माहिती देण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment