Tuesday, 17 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.07.2018 13.00


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७  जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 जमावा कडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहे. गोवंश तस्करीच्या संशयातून जमावा कडून झालेल्या मारहाणींसंदर्भात दाखल याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाहीत, असं स्पष्ट केलं आहे.  अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारनं उपाय योजना कराव्यात, तसंच केंद्र आणि राज्य सरकारांनी या संदर्भात काय पावलं उचललीत, यावर चार आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करावा, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. 

****



 मदर तेसेसा मिशनरीजद्वारे राज्यांमध्ये चालवण्यात येणाऱ्या बाल देखभाल गृहांचं निरीक्षण करण्याचे निर्देश केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी राज्य सरकारांना दिले आहेत. सर्व बाल देखभाल गृह अधिकृत आहेत की नाही, तसंच केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणाशी संलग्न असल्याची खात्री करावी, असंही गांधी यांनी सांगितल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.

****



 संसदेच्या उद्या पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालू देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन या बैठकीत करण्यात आलं. लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी देखील आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. या अधिवेशनात सरकारची विविध मुद्यांवर कोंडी करण्याची रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची काल दिल्लीत बैठक झाली. हे पावसाळी अधिवेशन १० ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.

****



 सार्वत्रिक निवडणुकांत उमेदवारांना एका पेक्षा अधिक मतदार संघांतून निवडणूक लढवायला मनाई करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेचा केंद्र सरकारनं विरोध केला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विधी आणि न्याय मंत्रालयाचे उपसचिव के के सक्सेना यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून सरकारचं म्हणणं मांडलं. अशी मनाई घालायची असेल तर, नागरिक प्रतिनिधीत्त्व कायद्यात सुधारणा करायला हवी, असं सरकारच्या वतीनं दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

****



 मराठवाड्यामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी कमी जागा असल्याच्या कारणा वरुन विधान परिषदेत आज विरोधकांनी गदारोळ केला. या संदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडत मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या उत्तराचं समाधान न झाल्यानं विरोधकांनी घोषणा बाजी सुरु केली. या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी येऊन सविस्तर उत्तर द्यावं, अशी मागणी मुंडे यांनी केली. 

****



 आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातल्या नातेपुतेकडे रवाना झाली. तर देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटी इथं मुक्कामी असेल. पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज सकाळी परांडा इथून निघाली असून, पालखीचा मुक्काम आज बिटरगाव इथं असेल.

  

 दरम्यान, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत चालणाऱ्या एका दिंडीतल्या एका वारकऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

****



 जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातून विदर्भात जाणारे पाच हजार लीटर दूध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी मराठवाड़ा विदर्भ सीमेवर सिंधी इथं रस्त्यावर ओतून दिलं. आज सकाळी जाफराबाद तालुक्यातून हे दूध संकलित करण्यात आलं होतं.

****



 राज्यात अनेक जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

 ठाणे जिल्ह्यातलं तानसा धरण आज सकाळ पासून ओसंडून वाहत आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडून, विसर्ग सुरू करण्यात आला आहे.



 भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द प्रकल्पातून तीन हजार ३९५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे.



 पुणे जिल्ह्यातल्या कळमोडी धरणामधून ४ हजार ७३९, वडज धरणातून २ हजार ३६६, वडीवळे धरणातून ३ हजार ९८२, तर खडक वासला धरणातून १० हजार, असा एकूण २१ हजार ८७ घनफूट प्रतिसेकंद, वेगानं विसर्ग सुरू आहे. यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.



 सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाची पाणी पातळी 651 पूर्णांक 230 मीटरपर्यंत पोहोचली असून, धरण पायथा वीजगृहातून दोन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगानं, पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आज दुपार पासून धरणाचे वक्र दरवाजे उचलून पाच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग केला जाणार आहे.



 नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून 9 हजार 302, दारणा धरणातून 10 हजार 600 आणि नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 29 हजार 594 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे.

*****

***

No comments: