Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 17 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जुलै २०१८ सायंकाळी ६.००
****
राज्य
सरकार दूध उत्पादक आंदोलनकर्त्यांशी चर्चेला तयार असून, या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या
दृष्टीनं संबंधित नेत्यांनी चर्चेला यावं असं आवाहन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर
यांनी आज विधानपरिषदेत केलं. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर,
विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यातले साठ टक्के
दूध संघ खाजगी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दुधाचं थेट अनुदान देणं शक्य नाही,
असं सांगत जानकर यांनी दूध भुकटीला प्रतिकिलो पन्नास रुपयांचं अनुदान दोन महिन्यांऐवजी
पाच महिन्यांपर्यंत देण्यात येईल अशी घोषणा केली.
****
दरम्यान,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही आज अनेक ठिकाणी
आंदोलन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातल्या दापचरी इथं गुजरातहून मुंबईकडे दूध वाहतूक
करणारे टँकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अडवले. सरकारकडून चर्चेसाठी कोणतही आमंत्रण
आलं नसल्याची माहिती खासदार राजु शेट्टी यांनी यावेळी दिली.
जालना
जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातून विदर्भात जाणारे पाच हजार लीटर दूध स्वाभिमानी
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी मराठवाडा विदर्भ सीमेवर सिंधी इथं रस्त्यावर
ओतून दिलं.
****
प्रत्येक
जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणं ही सरकारची भूमिका असून पुढच्या वर्षापासून
उस्मानाबाद जिल्ह्यात आणि कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, अशी घोषणा वैद्यकीय
शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत केली. त्यापूर्वी राज्यात वैद्यकीय
प्रवेशासाठी जात आणि प्रवर्ग आरक्षण असतानाही प्रादेशिक आरक्षण लादल्यामुळे मराठवाडा
आणि विदर्भातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातले
सदस्य आक्रमक झाले. प्रादेशिक आरक्षण रद्द करावं, तसंच मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालयांची
संख्या वाढवून जागा वाढवाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी
केली. त्याला उत्तर देताना महाजन यांनी, हे आरक्षण १९८५ पासून लागू असून, तत्कालीन
सरकारनं मराठवाड्यात एकही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं नाही, असं सांगितलं.
यावर विरोधकांनी आक्षेप घेत आणि उत्तरावर असमाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी उत्तर
द्यावं अशी मागणी केली.
****
शेतकऱ्यांच्या
पीक विम्याची रक्कम तसंच बोंडअळी, तुडतुडा रोग नुकसान भरपाई आदींबाबतचे सर्व पैसे शासन
देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. नुकसान
भरपाईपोटी ४४ लाख शेतकऱ्यांपैकी ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली
असल्याचं ते म्हणाले.
मुंबई
इथल्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या
पुतळ्याची उंची कमी केली नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
विकास
हक्क हस्तांतरण - टीडीआर संदर्भातली प्रक्रिया पारदर्शी आणि सुटसुटीत करण्याच्या सूचना
महानगरपालिकांना देण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. औरंगाबाद महानगरपालिकेच्या
यासंदर्भातल्या तक्रारीबाबत तीन महिन्यात कार्यवाही केली जाईल, असं ते म्हणाले.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सिल्लोड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही दुरुस्तीबाबत जिल्हा
शल्य चिकित्सक यांच्यामार्फत कारवाई सुरु असून, तिथल्या सुरक्षेबाबत संबंधितांस सूचना
देण्यात आल्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या रुग्णालयातून नवजात बालिका
पळवल्या संदर्भात पोलीस तपास करत असल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद
इथं सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन ॲग्रिकल्चर अँड अग्रोबेस्ड इंडस्ट्रिज - सीटाच्या
वतीनं शेतकरी कंपन्यांच्या सक्षमीकरण या विषयावर आज एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आलं.
शेतकऱ्यांना ई-साक्षर करणं गरजेचं असल्याचं मत सीटाचे कार्यकारी संचालक फिरोज मसानी
यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
पश्चिम
रेल्वेच्या राजकोट-ओखा सेक्शनमधल्या कानालूस रेल्वे स्थानकाजवळ पावसामुळे रेल्वे पटरी
वाहून गेल्यानं ओखा - रामेश्वरम एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. परिणामी ही गाडी
उद्या मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे जाणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
राज्यात
अनेक भागात आजही मुसळधार पाऊस सुरु असल्यानं अनेक धरणांच्या साठ्यात वाढ होत आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात सात हजार ७५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु
असून धरणातला पाणीसाठा १९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण परिसरात पावसाचा जोर
कायम असून आज दुपारी धरणाच्या सहा वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment