Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 October 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयचे सक्तीच्या रजेवर पाठवलेले संचालक आलोक वर्मा यांच्या विरोधातली
चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय दक्षता आयोगाला
दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. के. पटनायक यांच्या देखरेखीखाली
ही चौकशी होईल, असंही न्यायालयानं सांगितलं. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सीबीआय संचालक
वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी
न्यायालयात आव्हान दिलं आहे. सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव हे कोणतेही धोरणात्मक
निर्णय घेऊ शकत नाहीत, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. यावरची पुढची सुनावणी १२
नोव्हेंबरला होणार आहे.
****
खरीप
हंगामात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन होईल, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
व्यक्त केली आहे. लखनऊ इथं आज कृषी कुंभ २०१८ चं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी
सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पेरणीपासून विक्रीपर्यंत सर्व स्तरावर
सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं ते म्हणाले. कृषी कुंभ सारख्या कार्यक्रमांमुळे
शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्रोचा ‘चांद्रयान – दोन’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुढच्या
वर्षी पूर्ण होईल, त्यानंतर २०२२ पर्यंत अंतराळात मनुष्य पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.
इस्रोचे अध्यक्ष कैलासाव दिवू सिवन यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. २०२१ च्या अखेरीला,
किंवा २०२२ च्या सुरवातीला अंतराळात मनुष्य पाठवण्याचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘चांद्रयान – दोन’ येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीत चंद्रावर पाठवलं जाईल. येत्या
सहा महिन्यात इस्रो तीन ते सहा मोहिमा हाती घेईल, अशी माहिती त्यांनी दिली.
****
मुंबई-अहमदाबाद
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भू-संपादनाचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असं रेल्वे
मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत द इकॉनॉमिस्ट इंडिया समीट या परिषदेत
बोलत होते. भूसंपादनाला काहीसा उशीर झाला असला तरी हा प्रकल्प निर्धारित वेळेआधी पूर्ण
होऊ शकेल, असं ते म्हणाले. या प्रकल्पात, समुद्राखालून जाणारा २७ किलोमीटर लांब बोगदा
बांधण्यासाठी आराखडा आणि यंत्रजुळमीचं काम प्रगतीपथावर आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
लघु
आणि सूक्ष्म उद्योजकांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचा
उद्योग विभाग आणि ॲमेझॉन ही ऑनलाईन विक्री करणारी कंपनी यांच्यात काल एक सामंजस्य करार
झाला. पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या लघु उद्योजकांना नवीन तंत्रज्ञानाची सांगड
घालून देणारा हा एक स्तुत्य उपक्रम असून, या करारामुळे लघु उद्योजकांना उभारी मिळेल,
असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
****
शिल्प
कलेच्या माध्यमातून दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी धुळ्याचे ज्येष्ठ शिल्पकार पद्मविभूषण
राम सुतार यांना वर्ष २०१६ साठी प्रतिष्ठेचा टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार जाहीर
झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन
गोगोई आणि न्यायमूर्ती एन. गोपाल स्वामी, भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय
सहस्त्रबुध्दे यांच्या निवड समितीनं वर्ष २०१४, २०१५ आणि २०१६ च्या टागौर सांस्कृतिक
सौहार्द पुरस्कारासाठी दोन मान्यवर आणि एका संस्थेची निवड केली. वर्ष २०१६ च्या पुरस्कारासाठी
राम सुतार यांची, २०१४ च्या पुरस्कारासाठी प्रसिध्द मणिपुरी नर्तक राजकुमार सिंघजीत
सिंह आणि २०१५ साठी बांग्लादेशातल्या छायानट या सांस्कृतिक केंद्राची निवड करण्यात
आली. एक कोटी रूपये, मानपत्र आणि पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
हंगेरीमधल्या
बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पूजा धानदानं
कांस्य पदक पटकावलं. महिला फ्रीस्टाईल ५७ किलो वजनीगटात काल रात्री झालेल्या सामन्यात
पूजानं नॉर्वेच्या ग्रेस बुलेन हिला १० - सात या फरकानं हरवलं. यंदाच्या अजिंक्यपद
स्पर्धेतलं भारताचं हे दुसरं पदक आहे. यापूर्वी अलका तोमर, गीता आणि बबिता फोगट या
महिला कुस्तीपटूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे.
****
इंग्लंड
मधल्या लीड्स इथं सुरु असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सौरभ
कोठारीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने इंग्लंडच्याच मार्टिन गुडविल वर मात
करत उपांत्य फेरी गाठली.
****
No comments:
Post a Comment