Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20
November 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या
दिवशी आज विधानसभेत दुष्काळ आणि आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजी
आणि त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे
अजित पवार यांनी फळबाग, ऊस तसंच केळीला एक लाख रुपये तसंच इतर पिकांना हेक्टरी सरसकट
५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली. आरक्षणाच्या मुद्यावरुनही विधानसभेत विरोधकांनी
गदारोळ केला. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगानं सादर केलेला अहवाल सभागृहात
सादर करावा, अशी मागणी विरोधकांनी लाऊन धरली. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता, मराठा-धनगर
तसंच मुस्लीम आरक्षण जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. तर महसूल मंत्री
चंद्रकांत पाटील यांनी धर्माच्या आधारे आरक्षण
दिलं जाणार नसल्याचं सांगितलं. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना या दरम्यान दोन वेळा सदनाचं
कामकाज स्थगित करावं लागलं.
विधान परिषदेचं कामकाजही याच मुद्यांवरुन झालेल्या
गदारोळामुळे अर्ध्यातासासाठी तहकूब झालं होतं. त्यापूर्वी कामकाज सुरु होण्यापूर्वीही
विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारविरोधात घोषणाबाजी
केली.
दरम्यान, सर्वपक्षीय विरोधकांची विधानभवनात बैठक
झाली. अवनी वाघीण, मराठा आरक्षण, दुष्काळ या विषयावर विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याच्या
तयारीत आहेत. संसदीय कामकाज सल्लागार समितीची तत्काळ बैठक घेऊन, अधिवेशन एक आठवडा वाढवण्याची
मागणी विरोधकांनी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वर्धा जिल्ह्यात पूलगाव इथल्या लष्करी तळावर झालेल्या
दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी केली जाईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी विधानभवनाच्या परिसरात दिली. जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
या घटनेवर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री
निर्मला सीतारामन यांच्याशी मदतीसंदर्भात दूरध्वनी झाला असून, मृतांच्या नातेवाईकांना
सरकार मदतीची घोषणा करेल असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. दरम्यान, या स्फोटात मृत्यू
झालेल्यांची संख्या सहा झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जम्मू-कश्मीरमध्ये
शोपियान जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी
ठार झाले आणि निमलष्करी दलाच्या एक जवानाला वीरमरण आलं. नादिगाम परिसरात ही चकमक
झाली.
****
रिजर्व्ह
बँकेकडे असलेल्या नऊ लाख ६९ हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाशी संबंधित प्रश्नांचा
विचार करण्यासाठी, एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय रिजर्व्ह
बँक मंडळानं घेतला आहे. मध्यम लघू आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रातल्या थकित कर्जांचं
पुनर्गठन करण्याच्या योजनेचा विचार या समितीनं करावा, असं
मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ठरवण्यात आलं. बँकांची स्थिती कशी आहे, याबाबतच्या
मुद्दयांचं परीक्षण, तत्काळ सुधार कृती आराखडा आणि रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक
वित्तीय आराखड्यानुसार, रिझर्व्ह बँकेचं वित्तीय पर्यवेक्षण मंडळ करेल, असंही
या बैठकीत ठरलं.
****
गोव्यात
पणजी इथं आजपासून ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - ‘ईफ्फी’
सुरु होत आहे. बांबोलीम इथल्या श्यामा प्रसाद मुखर्जी क्रीडांगणावर आज होत असलेल्या उद्घाटन सोहळ्याचा केंद्रबिंदू नवा भारत आणि चित्रपटाच्या विविध
शैली हा असेल, असं ईफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी सांगितलं. नऊ दिवस चालणाऱ्या या
महोत्सवात ६८ देशांमधले २१२ चित्रपट प्रदर्शित केले जातील. ‘अॅस्पर्न पेपर्स’ या
चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात, तर ‘सिल्ड लिप्स’ चित्रपटानं महोत्सवाची सांगता होईल.
****
राज्यात येत्या सत्तावीस तारखेपासून गोवर-रुबेला
लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळाबाह्य मुलांवर विशेषत्वानं
लक्ष केंद्रीत करावं, तसंच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व यंत्रणा सज्ज
ठेवावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी
दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे काल राज्यभरातले डॉक्टर्स, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा
आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेत, एका आठवड्यात
सुमारे दहा लाख बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद शहर आणि परिसरात आज पहाटे पाऊस झाला.
हा पाऊस रब्बी हंगामातल्या ज्वारी, गहू हरभरा या पिकांच्या वाढीसाठी आणि जनावरांच्या
चाऱ्यासाठी पोषक असून, या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीवर काही अंशी मात होऊन विंधन
विहिरींचं पाणी टिकण्यास मदत होणार आहे.
****
दिल्लीत
सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत आज पाच वेळची विश्वविजेती
एम सी मेरीकोमसह आठ भारतीय मुष्टीयोद्धा उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहेत. ४८ किलो
वजनी गटात मेरीकोमची लढत चीनच्या वू यू बरोबर होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment