Wednesday, 28 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28  November 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८  नोव्हेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



§  मराठा आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं शिवसेनेचं आश्वासन - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील; आरक्षणावरून जाती- जातीत भांडणं लावण्याचं राजकारण विरोधक करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत आरोप

§  ज्येष्ठ बासरी वादक पंडित केशव गिंडे  यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर

§  राज्यात गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेस प्रारंभ

आणि

§  उदगीर इथं २३ ते २५ डिसेंबरदरम्यान चाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन

****



 मराठा आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. पाटील यांनी काल या विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. आरक्षण विधेयकाला समर्थन मिळवण्यासाठी आपण सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची भेट घेत असून यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये तसंच इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं आरक्षण मराठा समाजाला देणारं विधेयक विधी मंडळात मांडण्याची सूचना ठाकरे यांनी केल्याचं पाटील यांनी सांगितलं.



 आरक्षणाशी संबंधित मंत्रीमंडळ उपसमितीची काल बैठक झाली. या बैठकीत आरक्षणाची टक्केवारी अद्याप निश्चित झाली नसल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं.



 दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगानं दाखल केलेला अहवाल विधीमंडळात मांडण्यात येणार नाही, तर या अहवालावर कायद्यातल्या तरतुदीनुसार कृती अहवाल सभागृहात मांडला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. आरक्षणाच्या मुद्यावरुन कालही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. मुख्यमंत्री बोलत असतानाही सभागृहात गोंधळ सुरूच होता. विरोधकांना आरक्षणाचं राजकारण करायचं आहे, जाती-जातीत भांडणं लावायची आहेत.  फक्त मतांचं राजकारण करायचं असून त्यांच्या मनातं खोट आणि काहीतरी काळबेरं असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र त्यानंतरही गदारोळ चालूच राहिल्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं. या गदारोळातच २०१८-१९ च्या २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर झाल्या.

****



 राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ बासरी वादक पंडित केशव गिंडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही घोषणा केली. शास्त्रीय गायन आणि वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास राज्य शासनातर्फे हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****



 गोवर- रुबेला सारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत काल गोवर-रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.



 औरंगाबाद इथं जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.



 बीड इथं जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत, नांदेड इथंही जिल्हाधिकारी अरूण डोंगरे,  लातूर इथं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. तर जालना इथं जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आपली कन्या ओवी हिला लस टोचून घेत मोहिमेचा शुभारंभ केला.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 चाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या २३, २४ आणि २५ डिसेंबर रोजी उदगीर इथं होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी दिली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या साहित्य संमेलनात कविसंमेलन, कथाकथन, प्रकट मुलाखत, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं तिरूके म्हणाले. संमेलनाध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांची एकमतानं निवड झाली आहे.

****



 बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या  ३४ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल ज्येष्ठ साहित्यीक आणि इतिहास संशोधक डॉ. आनंद पाटील यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यशवंतराव चव्हाणांनी देशातल्या राजकारणाची संस्कृती बदलण्याचं काम केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण कृषी, साहित्य आणि संगीर पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांचे समायोजन खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलं आहे. या शिक्षकांना खाजगी अनुदानित शाळांमध्ये रुजू करून न घेतल्यास संबंधित शाळेतलं शिक्षकाचं पद रद्द करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांनी दिली.

****



 ग्रामीण भागातली विकास कामं तत्परतेनं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि इतर योजनांतर्गत गावातल्या रस्त्यांची दुरूस्ती, डांबरीकरण, खडीकरण यासह रस्ते देखभाल, दुरूस्ती सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****



 शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर दंडुका मोर्चा काढला. प्रातिनिधीक स्वरूपात दंडुके आणि उसाचे टिपरू घेवून तसंच काळे कपडे घालून मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांनी राज्य सरकार, आणि मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विभागाय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.

****



 प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आल्यास आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचे अमरावती जिल्ह्यातल्या टीमताला या गावचे  लाभार्थी आकाश सहारे यांनी झालेल्या लाभाविषयी माहिती दिली. ते म्हणाले..



माझ्याकडे ४ एक्कर शेती आहे. मी माझे पीक विमा हप्ता म्हणून  १५शे रूपये रक्कम जमा केली आहे.  यावर्षी मला सोयाबीन आणि कापूस या पीकांवर रोग पडून पाऊसामूळे नूकसान झाले होते. परंतू ,मी पीक विमा काढल्यामूळे , मला नूकसान भरपाई म्हणून ३० हजार रूपये रक्कम हि कृषी विभागामार्फत  माझ्या बँक खात्यात जमा झाली आहे. त्यामूळे मी या पीक विमा योजनेंचा आभारी आहे. धन्यवाद.

****



 परभणी जिल्ह्यातले रोहित्र सात डिसेंबरपर्यंत दुरुस्त करुन वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीज कंपनीच्या मुंबई इथल्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा, खासदार संजय जाधव यांनी दिला. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतांमध्ये पाणी मुबलक असून विजेअभावी सध्या असलेल्या पिकांना पाणी देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

****



दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं काल दुपारपासून परभणी इथल्या जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी काल कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे.

*****

***

No comments: