Thursday, 15 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.11.2018....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 November 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूर इथं आशियाई देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. या देशांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ झाले असून, हे देश जगात शांतता आणि समृद्धी प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. पंतप्रधानांनी भारत - सिंगापूर हॅकेथॉन संघाच्या विजेत्यांची, तसंच राष्ट्रीय छात्र सेना `एनसीसी`च्या २० विद्यार्थ्यांची भेट घेतली. अन्य देशांशी आदान-प्रदान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे विद्यार्थी सिंगापूरला गेले आहेत.

****

येत्या तीन ते पाच वर्षात देशातून नक्षलवादाचं उच्चाटन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. छत्तीसगढमधल्या रायपूर इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. नक्षलवादाचा हा शेवटचा टप्पा असल्याचं ते म्हणाले. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करुन हिंसेचा मार्ग सोडावा आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे.

****

मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगानं आपला अहवाल आज राज्य सरकारकडे सुपुर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचा अहवाल आल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसांत त्यावरील वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्याची घोषणा काल केली होती.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या धनगाव इथं आज नाथ उद्योग सुमाहाच्या जागतिक दर्जाच्या अन्न प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रीया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते झालं. उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या कार्यक्रमात सहभागी झाले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करणारे शास्त्रद्य डॉ.भगवान कापसे, डॉ सतीश रैना, डॉ ईश कुमार, डॉ चंद्रा पाठक, डॉ.एस.यू बेग, धुळे जिल्ह्यातले आधुनिक शेतकरी सुनिल पाटील यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठं अन्न प्रक्रिया केंद्र असून १०० एकर क्षेत्रावर याची व्याप्ती आहे. शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, त्यामुळे शेतमालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची या प्रकल्पाची संकल्पना आहे.

****

देशात मोठ्या प्रमाणावर असलेल्या कुपोषणाच्या समस्येचं निर्मूलन करण्यास सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. बालकांमधल्या अपुऱ्या पोषणाच्या समस्येचं निवारण करण्यासाठी सरकारनं विविध कार्यक्रम आणि योजना राबवल्या आहेत, असं ते म्हणाले. नवी दिल्ली इथं आयोजित पोषण आव्हानांवरच्या राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत ते काल बोलत होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांच्या माध्यमातून बालक आणि किशोरांमधल्या पोषण अभावाचा शोध घेण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती नड्डा यांनी दिली.

****

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २८ तारखेला होणाऱ्या १४ हजार मतदान केंद्रांवरचं मतदानाचं कामकाज संकेतस्थळावरून प्रसारण अर्थात वेबकास्ट केलं जाईल, असं मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं आहे. मतदान तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि अशोक लवासा यांच्यासह त्यांनी राज्याचा दोन दिवस दौरा केला, त्यानंतर ते काल भोपाळमध्ये बातमीदारांशी बोलत होते. मुक्त आणि योग्य वातावरणात निवडणूक व्हावी, यादृष्टीनं वेबकास्टिंगचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. 

****

आशिया खेळांमध्ये सुवर्ण पदक विजेती धावपटू हीमा दास हीला युनिसेफची भारतातली सदिच्छादूत म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. हीमानं यावर्षी जकार्ता इथं झालेल्या आशियाई खेळांमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं होतं. युनिसेफच्या सदिच्छादुताच्या रुपात ती भारतात युनिसेफच्या विविध कार्यक्रमांना सहकार्य करेल. लहान मुलांचे अधिकार आणि गरजा याविषयी जागरुकता करणं, बालकांच्या समस्या मांडणं, तसंच मुलांच्या विकासात मार्गदर्शनाचं कामही ती करणार आहे. युनिसेफची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती होणं, हा गौरवाचा क्षण असल्याची भावना हिमानं व्यक्त केली आहे.

****

वेस्ट इंडिज इथं सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गयाना इथं भारताची तिसऱ्या साखळी सामन्यात आयर्लंडबरोबर लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. भारतीय महिलांनी पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. सलामीच्या सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडचा ३४ धावांनी पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला सात गडी राखून हरवलं आहे. आयर्लंडबरोबरचा सामना जिंकला तर भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होणार आहे.  

****

No comments: