Sunday, 2 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.12.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02  December 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ डिसेंबर २०१  दुपारी १.०० वा.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यानंतर आज मायदेशी रवाना झाले. जी - ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते गेले होते.



 दरम्यान, ब्यूनर्स आयर्स इथं जी-ट्वेंटी शिखर परिषदेमधे झालेल्या बैठकीत अमेरिका वगळता सर्व राष्ट्रांनी, हवामान बदलाविषयीच्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करण्यावर सहमती दर्शवली. ब्राझिलच्या शेती आधारित उद्योगांना हानीकारक ठरणाऱ्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी करणार नाही, असं ब्राझीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांनीही यावेळी जाहीर केलं. 

****



 यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्राध्यक्ष सीरील रामाफोसा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून दिली आहे. भारत यंदा महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वागत करणं हा भारताचा सन्मानच असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. रामाफोसा यांच्या भेटीनं दोन्ही देशातले व्यापार आणि जनतेमधले संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****



 कृषी बाजारपेठांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं सरकार काम करत असून त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाअधिक ग्राहक उपलब्ध होऊन योग्य मोबदला मिळू शकेल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते काल चंदीगढ इथं सीआयआय ॲग्रो टेक इंडीया-२०१८ या व्यापार मेळ्याच्या उद्घाटप्रसंगी ते बोलत होते. शेतमालाची कमीत कमी नासाडी होईल, यादृष्टीनं कृषी आणि उद्योगांमधले संबंध अधिक मजबूत करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कार्यक्रमात १९५ प्रदर्शनकर्त्यांनी  भाग घेतला असून, त्यापैकी ३७ प्रदर्शनकर्ते हे विदेशी आहेत. 'शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी तंत्रज्ञान' ही यंदाच्या या प्रदर्शनाची संकल्पना आहे.

****



 हवाई वाहतूक मंत्रालयानं देशात ड्रोन सेवा देणाऱ्यांची नोंदणी सुरु केली आहे. डिजिटल स्काय या पोर्टलच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यात येत आहे. सरकारनं यंदाच्या ऑगस्टमध्ये ड्रोनच्या सुरक्षित उड्डाणाशी संबंधित हवाई वाहतूक नियमांची घोषणा केली होती.

****



 राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातला प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक सभा घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी काल राजस्थानाविविध ठिकाणी सभा घेतल्या. तेलंगणातल्या प्रचार सभांमध्ये भाजपा, काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती आणि इतर राजकीय पक्ष मतदारांनी सहकार्य करण्याचं आवाहन करत आहेत.

****



 देशाची सांस्कृतिक प्रक्रिया साहित्यातून प्रतिबिंबित करणं आवश्यक असल्याचं मत त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वि. ल. धारुरकर यांनी व्यक्त केलं आहे. आगरताळा इथं आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय लेखक परिषदेत ते काल बोलत होते. अनेक समस्यांचं आणि वादविवादांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला देशाची सांस्कृतिक प्रक्रिया समजून घ्यावी लागेल, असं ते म्हणाले.

****



 सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात सहा नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या खून खटल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं चार महिलांसह नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मौजे हनुमान कुरबावी इथले अशोक रुपनवर यांनी ११ गुंठे जागा विकण्यास नकार दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. 

****



 नवी मुंबईतलं केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संशोधन केंद्र, मत्स्य विद्यापीठात विलीन करु नये अशी मागणी राज्यातल्या मच्छिमार आणि मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. हे केंद्र विलीन केल्यास राज्यातल्या मत्स्य व्यवसायावर दुष्परिणाम होऊन, नुकसान होईल, अशी तक्रार करणारं निवेदन त्यांनी काल गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना दिलं.

****



 ओडिशातल्या भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या पुरूषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत सीविभागात भारताचा सामना आज बेल्जियम विरुद्ध होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर आज दुसरा सामना संध्याकाळी पाच वाजता कॅनडा आणि दक्षिण आफ्रीकेदरम्यान होणार आहे.

****



 तिरुवनंतपूरम इथं सुरु असलेल्या ६२व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर रॅपीड फायर फेरीत हरियाणाच्या आदर्श सिंग यानं सुवर्ण पदक पटकावलं. त्यानं राष्ट्रकुल स्पर्धेचा विजेता अनिश भानवाला याला ३०-२९ अशा गुण फरकानं हरवलं.

****



 मुंबईत सुरु असलेल्या ११व्या टाटा आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकल गटाचा अंतिम सामना युवा खेळाडू लक्ष्य सेन यानं जिंकला आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...