Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 December 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात
कॅव्हिएट; आरक्षण विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
Ø भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणातल्या आरोपींच्या विरोधातलं
आरोपपत्र आठ डिसेंबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे सरन्यायाधीशांचे आदेश
Ø अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनाच
देण्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश
Ø जागतिक दिव्यांग दिनी विविध कार्यक्रमानं जनजागृती
आणि
Ø पैनगंगा नदीत इसापूर धरणातून १२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे
आदेश
****
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात
कॅव्हिएट दाखल केलं आहे. यामुळे आता मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यास
राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय सुनावणार नाही.
सर्वोच्च न्यायालयातले राज्य सरकारचे वकील निशांत कात्नेश्वरकर यांनी ही याचिका दाखल
केली. राज्य सरकारनं विधिमंडळात विधेयक संमत करून, मराठा समाजाचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या
मागास - एस ई बी सी प्रवर्गात समावेश करत, शिक्षण आणि सरकारी नोकरीत १६ टक्के आरक्षण
दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालय तसंच या न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठातही
कॅव्हिएट दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, ५२ टक्क्यापेक्षा अधिक आरक्षणाची टक्केवारी
ही घटनाबाह्य असल्याचं सांगत , मुंबई उच्च न्यायालयात विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी
जयश्री पाटील यांच्या वतीनं याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात विधीज्ञ हरीश
साळवे राज्य सरकारची बाजू मांडणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.
****
भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींविरोधात
पुणे विशेष न्यायालयात दाखल आरोपपत्र येत्या आठ डिसेंबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयासमोर
सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. काल झालेल्या
सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी, राज्य सरकारचे वकील मुकूल रोहतगी यांना
हे आरोपपत्र सादर करण्यास सांगितलं. या प्रकरणी तपासाचा अहवाल दाखल करण्याची ९० दिवसांची
मुदत वाढवून देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला नकार दिल्यानंतर सरकारनं
सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, त्यावर ही सुनावणी होत आहे.
****
कर्करोगाशी
यशस्वी लढा देण्यासाठी, रिलायन्स समूह, सामाजिक बांधिलकीच्या
जाणिवेतून रुग्णालयांची साखळी उभारत असून, राज्यशासन
या कामात रिलायन्ससोबत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातल्या रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समुहाच्या
कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते.
दरम्यान,
वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं नियोजित बंजारा समाजाच्या संग्रहालयाचं भूमिपूजनही
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं.
****
अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजनांचा लाभ पात्र
लाभार्थ्यांनाच देण्याचे निर्देश, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख
यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिले. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधानांच्या नवीन पंधरा
कलमी कार्यक्रम आणि केंद्र तसचं राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेख यांच्या अध्यक्षतेखाली
झाली. सध्या सामाजिक संपर्क माध्यमाचा वापर जास्त प्रमाणात होत असून त्याद्वारे समाज
विघातक गोष्टींना आळा घालण्याचे निर्देश शेख यांनी पोलिस विभागाला दिले. वक्फ बोर्डच्या
कार्यवाहीबाबतही आयोग लवकरच सुधारणात्मक उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या नागरिकांना आता दर सोमवारी जिल्हा प्रशासन
तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयातल्या शासकीय दस्तावेजांची पाहणी करता
येणार आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत नागरिकांना हे दस्तावेज पाहण्याची परवानगी देण्यास
राज्य सरकारनं मंजूरी दिली आहे. दर सोमवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नागरिक
ही कागदपत्रं पाहू शकतील. शासकीय कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत अर्जांची संख्या
कमी करणं, हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
जागतिक दिव्यांग दिन काल सर्वत्र पाळण्यात आला. विविध
कार्यक्रमाच्या माध्यमातून काल याबाबत जनजागृती करण्यात आली.
प्रत्येकानं दिव्यांगाची वेदना ओळखून दिव्यांग
व्यक्तींचा सन्मान करावा, असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत
यांनी केलं आहे. काल लातूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी स्वंयसेवी संस्थांबरोबरच सर्वांनी पुढाकार घेण्याचं
आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल जनसंग्राम
दिव्यांग आघाडीच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन
सुरु करण्यात आलं. दिव्यांगांच्या हक्काच्या निधीचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप संघटनेचे
मराठवाडा अध्यक्ष सुनील मुलगीर यांनी यावेळी केला. दिव्यांगांना शिवशाही बसच्या प्रवास
भाड्यात ७५ टक्के सवलत देण्यात यावी, थेट रमाई घरकुल योजनेमधून लाभ देण्यात यावा, यासह
विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे.
****
उस्मानाबाद
इथं जिल्ह्यातल्या
दिव्यांग, मतिमंद, मूकबधीर, कर्णबधीर मुलांच्या शालेय क्रीडा स्पर्धांना काल सुरुवात झाली. आज या स्पर्धांचा समारोप असून त्यातून
राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धांसाठी
जिल्ह्याचे प्रतिनिधी निवडले जाणार आहेत.
****
उस्मानाबाद इथं, राज्य
दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आणि जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांच्या हस्ते दिव्यांग सेवा गौरव,
दिव्यांग भूषण, दिव्यांग सन्मित्र, दिव्यांग कर्मचारी रत्न पुरस्कार काल प्रदान करण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यात, पैनगंगा नदीत
ईसापूर धरणातून १२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश नांदेड आणि यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी
काढले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पैनगंगा
नदीत धरणं आंदोलनं सुरू केलं होतं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात सौर उर्जा निर्मिती व्यवसायासाठी ७४ हेक्टर ८९ गुंठे जमीन खरेदी प्रकरणात लोहारा
तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह ३४ जणांविरूद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी
यांच्या आदेशावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रं तयार
करून, एक
कोटी ३८ लाख ७३ हजार १५० रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांच्याविरूद्ध आहे.
****
परभणी इथं काल धनगर समाज संघर्ष
समिती आणि समाज बांधवांच्या वतीनं धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या वचननाम्याची होळी करुन आपला निषेध व्यक्त करण्यात
आला.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या बेलखेडा
तलावात सुरु असलेल्या अवैध विद्युत मोटारी बंद करण्यात याव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी
केली आहे. या तलावातून अनेक गावांना पाणी पुरवठा होतो, परंतु अवैध विद्युत मोटारींमुळे
पाणी टंचाई निर्माण होत असल्याचं निवेदन गावकऱ्यांनी काल तहसीलदारांना दिलं.
****
नांदेड जिल्ह्यात १४ महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित
करण्यात आला आहे. त्याठिकाणी विविध सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यांनी काल दिले आहेत. जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या
वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३ पूर्णांक पाच टक्के सुट, यासह अन्य
सवलतींचा यामध्ये समावेश आहे.
****
लातूर जिल्ह्यात चिकलठाणा इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या
पहिल्या शिवार साहित्य संमेलनाचा काल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या
उपस्थितीत समारोप झाला.
*****
***
No comments:
Post a Comment