Wednesday, 5 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.12.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05  December 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५  डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.

****



Ø दुष्काळ सदृश भागाच्या पाहणीसाठी केंद्राचं शिष्टमंडळ राज्यात दाखल

Ø राज्यात अन्नधान्याचं उत्पन्न वाढवण्याची गरज राज्यपालांकडून व्यक्त

Ø गेल्या चार वर्षांत राज्य वीज भारनियमन मुक्त - वीज महानिर्मिती संचालक विश्वास पाठक

Ø जायकवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तत्परतेनं सोडवण्याचे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

आणि

Ø भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त

****



 राज्यातल्या दुष्काळ सदृश भागाची पाहणी करण्यासाठी तसंच पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा सदस्यांचं शिष्टमंडळ आजपासून राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. पथकातल्या सदस्यांचे तीन गट करण्यात आले असून  आज आणि उद्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळ सदृश भागांना हे सदस्य भेट देणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात टेंभापूरी धरण, मुर्मी आणि सुलतानपूर या गावांसह  जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या जवसगाव आणि बेथलम या गावांना हे पथक आज भेटी देणार आहे. उद्या हे पथक परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून जिल्ह्यातल्या सेलू, पेडगाव आणि रूडी या गावांना भेट देऊन, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे.



 दरम्यान, परवा सात तारखेला या पथकाची राज्य सरकारचं मंत्रिमंडळ तसंच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असून आठ तारखेला हे शिष्टमंडळ अहवालासह दिल्लीला जाणार आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातल्या २६ जिल्ह्यांमधे दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे.

****



 राज्यातली जनता तसंच आदिवासी भागातल्या लोकांना पौष्टिक आहार आणि तृणधान्य अधिकाधिक उपलब्ध व्हावं, या दृष्टीनं या अन्नधान्याचं उत्पन्न वाढवण्याची गरज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत पौष्टिक तृण धान्याबाबतची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकाचं क्षेत्र, विस्तार, उत्पादन, वृद्धी, तसंच, नवीन वाणांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, याकरता प्रचार आणि प्रसार करुन, तृणधान्य लागवड क्षेत्र वाढवणं आवश्यक असल्याचं राज्यपाल म्हणाले.

****



 गेल्या चार वर्षात राज्य भारनियमन मुक्त झालं असून, वीज पुरवठा खंडित झाला म्हणजे भारनियमन नाही, असं महानिर्मितीचे संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात सध्या कुठेही भारनियमन नाही, फक्त थकबाकी असेल त्या ठिकाणीच वीज पुरवठा खंडित केला जातो, असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला आहे, त्या तालुक्यांत ३३ टक्के वीज देयक माफ केलं असून देयक वसुली थांबवल्याची माहिती त्यांनी दिली, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व भागात वीज पोहोचली असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या महानिर्मिती या वीज कंपनीच्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये तीन हजार २८० मेगावॅट एवढी वाढ झाली असून, राज्य भार नियमनमुक्त करण्यात यशस्वी ठरल्याचं पाठक यांनी नमूद केलं. 

****



 राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात मेंढी आणि शेळीसाठी देखील पाण्याची तसंच चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल, असं आश्वासन पशू, दुग्ध आणि मत्स्यविकास मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलं आहे. मुंबईत काल मेंढीपाळन करणाऱ्या धनगर समाजातल्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं खोतकर यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्याची चौकशी व्हावी, मेंढ्यांवरील रोगाचं निदान करण्यासाठी जनेरिक औषधं उपलब्ध करुन द्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

****



 नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या २०११-१२ या आर्थिक वर्षाच्या कराचं मूल्यांकन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आयकर विभागाला दिले आहेत. मात्र त्यांच्याविरोधातलं हे प्रकरण विचाराधीन असेपर्यंत आयकर विभागानं कारवाई आदेश लागू करु नये, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी आठ जानेवारीला होणार आहे. 

****



 भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं जी सॅट अकरा या संचार उपग्रहाचं आज फ्रेंच गयाना इथून यशस्वी प्रक्षेपण केलं. देशभरात इंटरनेट सुविधेचं जाळ विस्तारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा उपग्रह पंधरा वर्ष कार्यरत असेल. 

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती -जमाती कायदा प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी विधानसभेचे आमदार डॉ. संतोष टारफे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, हा गुन्हा दाखल करण्यात आला असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 जायकवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तत्परतेनं सोडवाव्यात, असे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत. काल औरंगाबाद इथं या धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावर्षीची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनानं गाळ पेरा क्षेत्रात चारा पिक घेण्यासाठी विनाशुल्क जमीन, पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे, त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त संख्येनं गाळ पेरासाठी अर्ज करण्याचं आवाहन चौधरी यांनी यावेळी केलं.

****



 भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर यानं काल सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ट्विटरवरून निवृत्ती जाहीर करताना, गंभीरनं, इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेतही यापुढे खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. १५ वर्षांच्या कारकिर्दीत गौतम गंभीरनं ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय तर ३७ टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

****



 मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग अंतर्गत वेळेत आणि विनाव्यत्यय जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी लातूर शहर आणि तालुकास्तरांवर स्वतंत्र कक्ष सुरू करावेत, अशी मागणी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल करण्यात आली. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून नियमाप्रमाणं सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं.

****



 उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलातल्या १५ पोलिस कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी निलंबित केलं आहे. हे कर्मचारी आजारी नसताना आजारी रजेवर गेले होते. या कर्मचाऱ्यांची चौकशी चालू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी मुंबईत चैत्यभूमी इथं जाणाऱ्या अनुयायांसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं आदिलाबाद ते मुंबई ही विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आज सकाळी आदिलाबादहून सुटून, नांदेड औरंगाबाद मार्गे उद्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुंबईत दादरला पोहोचेल. उद्या मध्यरात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी दादरहून परतीच्या प्रवासाला परत निघणार आहे.

****



 औरंगाबादच्या सह विक्रीकर आयुक्त दीपा मुधोळ- मुंडे यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंडे यांना काल या संदर्भातलं पत्र प्राप्त झालं आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

****



 परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं गोवर रुबेला लस दिल्यानंतर आरोग्याच्या समस्या उद्भवल्यानं पाच विद्यार्थ्यांना, तर पालम इथं सहा विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. औरंगाबादच्या आरोग्य विभागाच्या संचालकांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

****



 मराठी पत्रकार परिषदेला ८० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं, नांदेड इथं काल ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी यावेळी बोलताना, सत्य बातमी लोकांसमोर आणण्यासाठी स्पर्धा निर्माण व्हावी, असं आवाहन केलं.

****



 अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी काल बीड इथं संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंधरा योजना अत्यंत प्रभावी पणाने राबवण्यात येणार असल्याचं, त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

*****

***

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...