Sunday, 9 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.12.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09  December 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ डिसेंबर २०१८  दुपारी १.०० वा.

****

 नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तसंच वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगरपरिषदेच्या, आणि धुळे तसंच अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. लोहा नगर परिषदेत १७ नगरसेवक पदांसाठी ५९, तर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी १० वाजेपर्यंत नऊ पूर्णांक ५२ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

रिसोड नगरपरिषदेत २० नगरसेवक पदासाठी १०८ उमेदवार, तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे महापालिकेतल्या एकूण एकोणावीस प्रभागात ७३ जागांसाठी मतदान सुरु आहे.

****



 जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगरनजिक मुजगुंड परिसरात सुरक्षा दलांच्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. या चकमकीत तीन पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरुन सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली होती. काल रात्रीपासून सलग १८ तास ही चकमक सुरु होती. हे दहशतवादी श्रीनगर इथल्या लष्कराच्या शिबिरावर हल्ला करण्याची योजना आखत होते, असं संरक्षण सूत्रांनी सांगितलं.

****



 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या पाकिस्तानच्या सहभागाबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती असून, त्यासाठी कुणाच्या दाखल्याची आवश्यकता नाही, असं मत लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २००८ साली मुंबईवर झालेला हल्ला दहशतवाद्यांनी केला असून, या प्रकरणाचा तपास पाकिस्तानच्या हिताचा आहे, असं विधान केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता रावत यांनी हे मत व्यक्त केलं.

****



 भारत जल परिषदेची काल नवी दिल्लीत सांगता झाली. वनीकरण, जैव विविधता, नागरी नदी व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि व्यवस्थापन अशा प्रश्नांवर या परिषदेत चर्चा झाली. समारोपाच्या भाषणात जलसंपदा मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग यांनी, तंत्रज्ञानाचा व्यवहारात वापर करण्यासाठी कृती गट उभारण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. या परिषदेत देश विदेशातल्या अर्थतज्ञांचा समावेश असलेल्या गंगा आर्थिक मंचाची स्थापना झाली.

****



 सुदृढ भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आरोग्यदायी आहार आणि जीवनशैली सुधारण्याची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. पुणे इथं काल स्वस्थ भारत यात्रेचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या वतीनं देशात विविध ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 येत्या २३ डिसेंबर रोजी गोंदिया इथं आठवं राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय नाट्यशाळेचे संचालक, नाटककार वामन केंद्रे यांची निवड झाली आहे. यानिमित्तानं ग्रंथ दिंडी, मुलाखत, नाटक आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या दोन अपघातांत चार जण ठार, तर पंधरा जण जखमी झाले. काल सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर वडिवरे इथं नाशिकहून मुंबईकडे जाणारी बस दुभाजकावर आदळून फरफटत गेल्यानं दोन जण ठार, तर पंधरा जण जखमी झाले. तर नाशिक शहरातल्या पंचवटी भागात काल रात्रीच्या सुमारास दुचाकी कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

****



 भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ॲडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या चौथ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या चार बाद ९६ धावा झाल्या होत्या. रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. तत्पूर्वी भारताचा दुसरा डाव आज सकाळी ३०७ धावांवर आटोपला. भारताला सामना जिंकण्यासाठी सहा गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी २२७ धावांची आवश्यकता आहे.

****



 पंजाबमधल्या मोहाली इथं होणाऱ्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ऋतुजा जाधव, शुभांगी तोमर आणि हिरल मकवाना या तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे़. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय गटात ऋतुजा जाधव हिची ५२ ते ५४ किलो वजनी गटात, शुभांगी तोमरची ५७ ते ६० किलो वजनी गटात, तर हिरल मकवाना हिची ६६ ते ७० किलो वजनी गटात निवड झाली.

****



 भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज मलेशिया विरुद्ध जर्मनी आणि नेदरलँड्स विरुद्ध पाकिस्तान असे दोन सामने होणार आहेत. दरम्यान, काल क गटाच्या शेवटच्या साखळी सामन्यात कॅनडाला पाच - एक असं हरवून भारतानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...