Monday, 10 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.12.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10  December 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.

****

     

v संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून; सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीसह आज विरोधकांचीही बैठक

v दुष्काळ निवारणाबाबत सरकार असंवेदनशील -माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची टीका

v अहमदनगर तसंच धुळे महानगरपालिकेसह नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, आणि वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठसाठीचं मतदान शांततेत पूर्ण

आणि

v ‘खेलो इंडिया युवक स्पर्धेचं’ येत्या नऊ ते २० जानेवारी दरम्यान पुण्यात आयोजन

*****



 संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात २० बैठका होणार आहेत. अधिवेशन काळात राज्यसभेत आठ, तर लोकसभेत १५ विधेयकं मांडण्यात येणार आहेत.



 दरम्यान, केंद्र सरकारनं आज एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सर्व पक्षांना दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालू द्यावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन या बैठकीत करण्यात येईल. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातली रणनीती ठरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एक बैठकही आज होणार आहे.

****



 दुष्काळ निवारणाबाबत सरकार असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली आहे. ते काल पुणे इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. सरकारचा दृष्टिकोन आस्थेचा नाही, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाची विचारधारा देशासाठी घातक असून त्यांना पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांची भक्कम आघाडी होणं त्यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचं बळ असेल त्याला तिथं महत्व देण्याचं सूत्र योग्य राहील, असं मत पवार यांनी म्हणाले. 

****



 भारतीय जनता पक्ष वगळून अन्य पक्षाच्या महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल बुलडाणा इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांची काल बुलडाण्यात राज्यव्यापी बैठक झाली. महाआघाडी झाल्यास राज्यातल्या बुलडाणा, वर्धा, लातूर, धुळे, कोल्हापूर, सांगली, माढा आणि हातकणंगले या आठ ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार देईल, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव हे शेतकऱ्यांचे प्रश्न महाआघाडीने स्वीकारावेत असा आपला आग्रह राहणार असल्याचं, शेट्टी यांनी सांगितलं.

****



 संभाजी ब्रिगेड येत्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या तीस आणि विधानसभेच्या शंभर जागा स्वबळावर लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष विधीज्ञ मनोज आखरे यांनी जाहीर केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं, पक्षाच्या स्वराज्य संकल्प अभियान समारोप कार्यक्रमात बोलत होते. राज्याचा आगामी मुख्यमंत्री ठरवण्याचं काम आपलाच पक्ष करणार असल्याचं आखरे म्हणाले. संघटनेचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी यावेळी बोलतांना युती आणि आघाडीनं जाती-जातीत भांडणं लावून राजकीय सत्ता मिळवली अशी टीका केली.  

****



 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ इथं झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल राज्याच्या विविध भागात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांनी रेल रोको करून, निषेध व्यक्त केला.

दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या लोकप्रियतेवर नाराज असलेल्यांनी हा हल्ला केला असावा, असं सांगितलं.

****



 सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता न आल्यानं निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका, विद्यार्थी नेता कन्हय्या कुमार यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते.बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, आदी मुद्यांवरुनही त्यांनी सरकारवर टीका केली.

****



 वैद्यकीय उपचारादरम्यान सामान्यतः वापरात येणारी रक्तदाब यंत्र, वाफ घेण्याचं यंत्र, डिजिटल तापमापक आणि शर्करामापक आदी उपकरणं, औषधी आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियमात औषधांच्या रुपात समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या बदलामुळे अधिनियमात औषधांच्या रुपात समाविष्ट उपकरणांची संख्या आता २७ झाली आहे.  

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 अहमदनगर तसंच धुळे महानगरपालिकेसह नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, तसंच वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. धुळे महापालिकेसाठी सुमारे ६० टक्के तर अहमदनगर महापालिकेसाठी ७० टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे.



 नांदेड जिल्ह्याच्या लोहा नगर परिषदेत १७ नगरसेवक पदांसाठी ५९, तर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इथं विक्रमी ९२ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रिसोड नगरपरिषदेत २० नगरसेवक पदांसाठी १०८ उमेदवार, तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याठिकाणी सुमारे ५५ टक्के मतदान झालं आहे.

****



 अहमदनगर इथं मतदान करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला पोलिसांकडून मारहाण झाल्याचं वृत्त आहे. याबाबत नगर प्रेस क्लबनं तोफखाना पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.



 दरम्यान, अहमदनगर इथं, मतदान केंद्रावर नियुक्त एका अधिकाऱ्याचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

****



 भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेत ‍अ‍ॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद १६२ धावा झाल्या आहेत. त्यापूर्वी भारतानं काल दुसऱ्या डावात ३०७ धावा केल्या. आज अखेरच्या दिवशी विजयासाठी ऑस्ट्रेलियाला १६६ धावांची गरज आहे, तर भारतानं ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज बाद करणं आवश्यक आहे.

****



 ‘खेलो इंडिया युवक स्पर्धा २०१९’ येत्या नऊ ते २० जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या स्पर्धेत नऊ हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले. खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत सरकार दीड हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 पंजाबमधल्या मोहाली इथं होणाऱ्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ऋतुजा जाधव, शुभांगी तोमर आणि हिरल मकवाना या तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे़. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे

****



 करुणेला प्रज्ञेची जोड मिळाली की ती कविता श्रेष्ठ ठरते, असं ज्येष्ठ कवी लक्ष्मिकांत तांबोळी यांनी म्हटलं आहे.  औरंगाबाद इथं काल ‘अंतर्नाद’ या प्राध्यापक डॉक्टर वृंदा देशपांडे-जोशी लिखीत कविता संग्रहाचं प्रकाशन त्याच्या हस्ते झालं.त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर मंगला वैष्णव कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होत्या. आतल्या आवाजाचा वेध घेऊन तो शब्दांत व्यक्त करणं, हाच अंतर्नाद असल्याचं मत वैष्णव यांनी बोलतांना व्यक्त केलं.

****



 जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं काल सीएम चषक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झालं. या महोत्सवासाठी परतूर विधानसभा मतदार संघातून ४४ हजार खेळाडूंनी नोंदणी केल्याचं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं. सीएम चषक क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यभरात ३० लाख खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, महिनाअखेर ५० लाख नागरिक या स्पर्धेशी जोडले जातील, असंही लोणीकर यावेळी म्हणाले.

****

*** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...