Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 10 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर
परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या
लढतीत भाजप उमेदवार गजानन सूर्यवंशी विजयी झाले असून, नगर परिषदेच्या एकूण १७ जागांपैकी
१३ जागांवर भाजप उमेदवारांनी विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार चार जागांवर निवडून आले.
****
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर
पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरिता नंदकुमार मोरे विजयी झाल्या आहेत. भाजप ताराराणी
आघाडीच्या जयश्री जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांच्यात थेट लढत झाली,
जयश्री जाधव यांना ३३ मतं तर सरिता मोरे यांना ४१ मतं मिळाली. तीन नगरसेवकांची जात
प्रमाणपत्रं रद्द झाल्यानं, त्यांना मतदान करता आलं नाही, तर शिवसेनेचे चार नगरसेवक
मतदानावेळी गैरहजर राहिले. काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे उपमहापौर पदी विजयी झाले.
****
अहमदनगर महापालिकेच्या एकूण ६८ जागांपैकी,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सर्वाधिक २१ जागांवर आघाडीवर आहेत.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार १८ जागांवर,
तर शिवसेनेचे उमेदवार १७ जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस तसंच बहुजन समाज पार्टीचे
उमेदवार प्रत्येकी चार जागांवर आघाडीवर आहेत.
तीन जागांवर अपक्ष उमेदवार तर एका जागेवर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.
****
धुळे महापालिकेच्या ७४ पैकी ६२ जागांचे
कल हाती आले आहेत. आठव्या फेरीअंती ३८ जागांवर
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
काँग्रेस पक्षाला सहा जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सात जागांवर, एमआयएम सहा
जागांवर तर आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर
आहेत. तीन जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा
आणि मिझोराम विधानसभा निवडणूकीच्या
उद्या होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. छत्तीसगढमध्ये सर्व २७ जिल्ह्यांमधे
मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत. मध्य प्रदेशातल्या मतमोजणीचं चित्रिकरण करण्यात
येणार आहे. इथे ७५ टक्के मतदान नोंदवलं गेलं. तेलंगणामध्येही प्रामुख्याने जिल्हा मुख्यालयाच्या
ठिकाणी एकूण ४३ मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत.
****
केंद्रीय गृहराज्य मंत्री
हंसराज अहीर यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा
दल - सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांची
बैठक घेऊन दहशतवाद आणि घुसखोरी संदर्भातल्या
नवीन आव्हानांचा सामना करण्याबाबत चर्चा केली. अहीर यांनी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमीच्या दीक्षांत समारंभालाही संबोधित केलं. सह कमांडटच्या ३२व्या आणि उपनिरिक्षकांच्या
४४व्या तुकडीनं त्यात भाग घेतला. १५१ महिलांसह एकूण ७५७ जणांनी प्राथमिक प्रशिक्षण
पूर्ण केलं आहे.
****
त्रिमीती छपाई तंत्रज्ञानाविषयी महाराष्ट्र सरकार लवकरच स्वतंत्र धोरण तयार करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल एका जागतिक परिषदेत ही
माहिती दिली. या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करुन गुंतागुंतीचे अनेक प्रश्न सोडवता येतील, तसंच
मानवी चुका
टाळता येतील असं ते म्हणाले. आरोग्य, विशेषतः दंत आरोग्य, वाहनं, दागदागिने, बांधकाम
क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर क्रांतिकारक बदल घडवू शकतो, असं
त्यांनी सांगितलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ॲडलेड इथं झालेला पहिला
कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३१ धावांनी जिंकला आहे. भारताचा दुसरा डाव ३०७ धावांवर
संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया समोर सामना जिंकण्यासाठी ३२२ धावांचं लक्ष्य होतं.
मात्र ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आज २९१ धावांवर संपुष्टात आला. जसप्रित बुमराह, रविचंद्रन
अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन, तर इशांत शर्मानं एक गडी बाद केला. या
विजया बरोबरच भारताचं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडी मिळवली आहे.
****
भुवनेश्वर इथं होत असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत
उपांत्यपूर्व फेरीसाठी आठ पैकी चार संघ निश्चित झाले आहेत. यजमान भारतासह, दोन
वेळा विजेता ठरलेला ऑस्ट्रेलिया तसंच अर्जेंटिना आणि जर्मनीचे संघ आपापल्या गटात प्रथम
आल्यामुळे थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. आज फ्रांस विरुद्ध चीन, आणि
इंग्लंड विरुद्ध न्यूझिलंड असे दोन सामने होणार आहेत.
****
अयोध्येतल्या राम मंदिराचा संबंध कोणीही निवडणुकीशी
लावू नये असं मत विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभाग प्रमुख प्रशांत हरताळकर यांनी व्यक्त
केलं आहे. लातूर इथं काल झालेल्या हुंकार सभेत ते बोलत होते. सरकारनं संसदेत तातडीनं
कायदा करुन मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा करावा असं आवाहन या सभेतून करण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment