Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 12
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v छत्तीसगढमध्ये काँग्रेस, तेलंगणात, तेलंगणा राष्ट्र समिती आणि
मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत; राजस्थान आणि मध्यप्रदेशात कॉग्रेस
सत्तेच्या समीप
v प्रधानमंत्री
कृषी सिंचन योजनेंतर्गत ४८ प्रकल्पांसाठी, नाबार्डकडून सहा हजार ९८५ कोटी
रुपये कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची
मान्यता
v पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर
नोकरी देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय
v शेतकऱ्यांच्या खावटी कर्जाचाही राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत समावेश
v भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदी अर्थ खात्याचे माजी सचिव
शक्तीकांत दास यांची नियुक्ती
आणि
v पैठणच्या संतपीठाचं, केंद्रीय विद्यापीठात रुपांतर करण्याचा
प्रस्ताव
****
पाच राज्यापैकी छत्तीसगढमध्ये काँग्रेस, तेलंगणात
तेलंगणा राष्ट्र समिती आणि मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी पडली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस
आणि भारतीय जनता पक्षामध्ये बरोबरीची लढत झाली असून काँग्रेसनं, सर्वाधिक जागा जिंकल्या
आहेत.
छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी काँग्रेसनं
सर्वाधिक ६७ जागा जिंकल्या असून, त्यांचा एक उमेदवार आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षाला
अवघ्या पंधरा, तर माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या जनता काँग्रेसला पाच जागांवर
विजय मिळाला.
राजस्थानात काँग्रेसनं १९९ जागांपैकी ९९ जागा जिंकल्या
असून, भारतीय जनता पक्षाला ७३ जागा, बहुजन समाज पार्टीला सहा जागा तर मार्क्सवादी कम्युनिस्ट
पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.
मध्यप्रदेशात २३० पैकी काँग्रेसनं ११२ जागा जिंकल्या
असून दोन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षानं १०८ जागा जिंकल्या
असून, त्यांचा एक उमेदवार आघाडीवर आहे. बसपाला दोन तर समाजवादी पक्षानं एक जागा जिंकली
आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा कौल मान्य असल्याचं
सांगत मतदारांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसचं
विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. काँग्रेसनं विजयाबद्दल आनंद व्यक्त केला असून जनतेच्या
इच्छेनुरूप काम करणार असल्याचं सांगितलं.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला.
दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात
आलं. लोकसभेत दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी अध्यक्ष
सोमनाथ चटर्जी, माजी मंत्री अनंतकुमार यांच्यासह सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव अध्यक्ष
सुमित्रा महाजन यांनी तर राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी मांडला. उत्तराखंडचे
माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर, यांच्यासह दिवंगत
सदस्यांना राज्यसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
****
प्रधानमंत्री
कृषी सिंचन योजनेंतर्गत बांधकाम सुरु
असलेल्या एकूण २६
आणि लाभक्षेत्र प्रकल्पांतर्गंतच्या २२ अशा एकूण ४८ प्रकल्पांसाठी, भारतीय राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण
विकास बँक- नाबार्डकडून सहा हजार ९८५ कोटी
रुपये कर्ज सवलतीच्या दरानं घेण्यास काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. याचबरोबर
राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र
शासनाची महिला शक्ती केंद्र ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णयही राज्य
मंत्रिमंडळानं घेतला आहे.
राज्यातल्या बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना बेबी
केअर कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णयासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थीला पहिल्या
प्रसूतीसाठीच मिळणार आहे.
राज्यातल्या पदवीधर
अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून
देण्याचा धोरणात्मक निर्णयही काल
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पदवीधर किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना
थेट नियुक्तीच्या वेळी १० टक्के समांतर आरक्षण दिलं आहे.
या निर्णयानुसार उमेदवारांच्या बाबतीत वयाची अट ४६ वरून ५५ करून या आरक्षणाची काटेकोरपणे
अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
राज्य आंतरराष्ट्रीय
शिक्षण मंडळाशी संलग्नित होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भारतरत्न अटलबिहारी
वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असं संबोधण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यातल्या पेयजल टंचाई निवारणासाठी अल्प मुदतीची
निविदा प्रक्रिया राबवण्याच्या मंत्रिमंडळ
उपसमितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं
काल मान्यता दिली. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता टंचाई काळातच कामं पूर्ण होण्यासाठी
हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार निविदांचा कालावधी आता २५ दिवसांवरुन १० दिवसांपर्यंत
कमी केला आहे.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा काल मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आढावा घेण्यात
आला. महामंडळाने मराठा समाजासाठी नव्या योजना सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात
आले.
राज्यातल्या शेतकऱ्यांनी
ज्या बँकेतून खावटीसाठी कर्ज काढली आहेत. त्या शेतकऱ्यांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेत करुन हे कर्ज माफ करण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदी अर्थ खात्याचे
माजी सचिव शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
निवड समितीनं तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केली आहे. दास हे सध्या अर्थ आयोगाचे
सदस्य आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात वारकरी संप्रदायाची
भूमिका महत्वाची असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. स्वच्छ
भारत अभियानांतर्गत काल मुंबईत आयोजित, ‘स्वच्छतेचा महाजागर’ या कार्यक्रमात ते बोलत
होते.
दरम्यान, यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या
संतपीठाला, केंद्रीय विद्यापीठाचा देण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे
यांना सुपुर्द करण्यात आला. संतपीठ समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्रा. अशोक तेजनकर, उच्च शिक्षण खात्याचे सहसचिव सिद्धार्थ
खरात आणि माजी उपमहापौर संजय जोशी यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे. नागपूरच्या अधिवेशनात
ही समिती स्थापन करण्यात आली होती.
****
महाराष्ट्रासह
देशभरात बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं
पॉक्सो कायद्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा करून बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासाठी
आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद केली असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण अधिनियम २०१२
- पोक्सो आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या सुधारणांबाबत, राज्य महिला
आयोगानं औरंगाबाद इथं काल एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आायोजित केली होती, त्यावेळी त्या
बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीवरून दिलेल्या संदेशानं या
परिषदेचं उदघाटन झालं.
****
येत्या चार ते सहा जानेवारी दरम्यान तिसऱ्या नॅशनल
टीचर्स काँग्रेसचं पुणे इथं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक
डॉ. सुधीर गव्हाणे यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. एमआयटी
वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या या परिषदेचा ‘भविष्यदर्शी उच्च शिक्षणाकडे
झेपावताना’ हा मुख्य विषय असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
ग्रंथ हेच खऱ्या अर्थानं ज्ञानार्जनाचे शाश्वत माध्यम
असल्याचं, लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद तिरुके यांनी म्हटलं आहे. ते काल
लातूर इथं आयोजित लातूर ग्रंथोत्सव २०१८ च्या उद्घाटनानंतर बोलत होते. सध्या समाज माध्यमांमुळे
ग्रंथ वाचनावर काहीसा परिणाम झाला असला तरी ग्रंथ हेच समाजाच्या आणि व्यक्तीच्या जीवनास
दिशा देणारे साधन आहे असं ते म्हणाले.
*****
***
No comments:
Post a Comment