Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
*****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांना
नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सरत्या वर्षात भारतानं केलेल्या प्रगतीचा आढावा घेताना
त्यांनी, जगातल्या सर्वात मोठ्या, आयुष्मान भारत, या आरोग्य विमा योजनेच्या प्रारंभाचा
गौरवपूर्ण उल्लेख केला. गत वर्षात देशातल्या प्रत्येक गावात वीज पोचल्याचं नमूद करत,
जगातल्या प्रतिष्ठित संस्थांनी, भारत विक्रमी गतीनं गरिबीवर मात करत असल्याचं मान्य
केल्याचं त्यांनी सांगितलं. देशवासियांच्या निर्धारामुळे देशात स्वच्छतेच्या बाबतीत
फार मोठी सुधारणा झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. देशाची संरक्षण व्यवस्था बलवान झाली
असून, भूदल, नौदल आणि वायुदलही अण्वस्त्रसंपन्न झाल्याचं त्यांनी सांगितलं. वाराणसीत
सुरू झालेल्या, देशाच्या पहिल्या जलमार्गाचा तसंच बोगीबिल या देशातल्या सर्वात लांब
दुहेरी पुलाचाही गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारतीय खेळाडूंनी विविध जागतिक
स्पर्धांमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. कोरियामध्ये
कराटे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या काश्मीरच्या हानिया निसारचं तसंच कनिष्ठ महिला
मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या रजनीचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. सर्वात अधिक
गतीनं सायकलवरून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली आशियायी व्यक्ती ठरल्याबद्दल पुण्याच्या
वेदांगी कुलकर्णीची प्रशंसा करून, तिची जिद्द ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक असल्याचं
पंतप्रधानांनी म्हटलं. भारतात होणारे कुंभ मेळे हे विराट आणि जगाचं लक्ष वेधून घेणारे
असल्याचं सांगत त्यांनी पंधरा जानेवारीपासून प्रयागराज इथे सुरु होणार असलेल्या महाकुंभ
मेळ्यात भाविक यावर्षीपासून अक्षयवटाचं दर्शन घेऊ शकतील, असं नमूद केलं. नव्या वर्षात
सर्व देशवासियांनी प्रगतीपथावर रहात स्वत: बदलावं आणि देशालाही बदलावं, अशा शुभेच्छा
पंतप्रधानांनी दिल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते आज अंदमान आणि निकोबार बेटांवर विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं
उद्घाटन होत आहे. पंतप्रधानांनी आज सकाळी निकोबार इथे, २००४ च्या त्सुनामीत बळी पडलेल्या
लोकांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐतिहासिक अंदमान
भेटीला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ पंतप्रधान आज पोर्ट ब्लेअर इथल्या
कारागृहाला भेट देणार असून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहणार आहेत.
****
भारतानं
मेलबोर्न इथं ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात एकशे सदोतीस धावांनी पराभूत
करून चार सामन्यांच्या या मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली. सामन्याच्या पाचव्या दिवशी
आज ऑस्ट्रेलियानं कालच्या आठ बाद दोनशे अट्ठावन्न या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात
केली आणि अवघ्या तीन धावांची भर घालून त्यांचे शिल्लक दोन फलंदाज बाद झाले. जसप्रीत
बुमरा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि इशांत शर्मानं प्रत्येकी
दोन गडी बाद केले. बुमरा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला अखेरचा सामना
तीन जानेवारीपासून सिडनीत खेळला जाईल.
****
एका वेळी तीन तलाक
देण्याच्या पद्धतीला गुन्हा ठरवणारं तिहेरी तलाक विधेयक उद्या राज्यसभेत सादर होण्याची
शक्यता आहे. हे विधेयक आता आहे त्या स्वरूपात मंजूर होऊ देणार नसल्याचं काँग्रेसनं
जाहीर केलं आहे. हे विधेयक गेल्या गुरुवारी लोकसभेत मंजूर झालं आहे.
****
जादूटोणा विरोधी
कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणार असून, या कायद्याची परिणामकारक
अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती स्थापन करणार असल्याची माहिती
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. अंधश्रद्धांच्या
माध्यमातून समाजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरेल, असं बडोले यांनी
म्हटलं आहे.
****
उत्तर भारतात होणाऱ्या
बर्फवृष्टीमुळे देशात पसरलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम पूर्ण मराठवाड्यात जाणवत आहे.
परभणी जिल्ह्यात काल गेल्या अनेक दशकातल्या सगळ्यात कमी म्हणजे तीन अंश सेल्शियस तापमानाची
नोंद झाली. आज देखील परभणीचं तापमान ३पूर्णांक
३ अंश सेल्सिअस असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment