Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 4 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
गेल्या
चार वर्षात राज्य भारनियमन मुक्त झालं असून, वीज पुरवठा खंडित झाला म्हणजे भारनियमन
नाही, असं महानिर्मितीचे संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. राज्यात सध्या कुठेही भारनियमन नाही, फक्त थकबाकी असेल त्या ठिकाणीच वीज
पुरवठा खंडित केला जातो, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ
घोषित झाला त्या तालुक्यांत ३३ टक्के वीज बिल माफ करून बिल वसुली थांबवली असून, सौभाग्य
योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व भागात वीज पोहोचली असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या
महानिर्मिती या वीजकंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये तीन हजार २८० मेगावॅट एवढी वाढ
झाली असून, राज्य भारनियमनमुक्त करण्यात सरकार यशस्वी ठरलं असल्याचं पाठक यांनी नमूद
केलं.
****
नॅशनल
हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि संयुक्त पुरोगामी
आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या २०११-१२ या आर्थिक वर्षाच्या कराचं मुल्यांकन
करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आयकर विभागाला दिले आहेत. मात्र त्यांच्याविरोधातलं
हे प्रकरण विचाराधीन असेपर्यंत आयकर विभागानं कारवाई आदेश लागू करु नये, असंही न्यायालयानं
सांगितलं आहे. याप्रकरणी पुढची सुानवणी आठ जानेवारीला होणार आहे.
****
राज्यातल्या
दुष्काळग्रस्त भागात मेंढी आणि शेळीसाठी देखील पाण्याची तसंच चाऱ्याची व्यवस्था करण्यात
येईल, असं आश्वासन पशू, दुग्ध आणि मत्स्यविकास मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलं आहे.
मुंबईत आज मेंढपाळ करणाऱ्या धनगर समाजातल्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं खोतकर यांची
भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्याची चौकशी व्हावी, मेंढ्यांवरील
रोगाचं निदान करण्यासाठी जनेरिक औषधं उपलब्ध करुन द्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात
आल्या.
****
लातूर
जिल्ह्याच्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार डॉ सुनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली
आज झाली. रस्ते अपघात असो की कोणताही अपघातातल्या जखमीवर पोलिस कारवाईसाठी न थांबता
रुग्णालयात तातडीनं उपचार सुरु करावेत असे आदेश गायकवाड यांनी यावेळी दिले. सर्वोच्च
न्यायालयाच्या आदेशानुसार, सलग तीन वेळा सिग्नल तोडला गेला तर कायमस्वरुपी वाहन चालवण्याचा
परवाना रद्द करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
****
लातूर
इथल्या माईर्स एमआयटी आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं पूर्ण ब्रम्हयोगिनी
त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजना सुरु करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या ५० हजार कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांना एक जानेवारीपासून
आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत. माईर्स एमआयटीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे
संचालक रमेश कराड यांनी आज लातूर इथं ही माहिती दिली.
****
परभणी
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती पाहता खाजगी शिकवणीदारांनी शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी
फी मध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर
आणि खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांच्या मुलांना फी भरणं
शक्य नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतील, त्यामुळे त्यांना फी मध्ये सवलत देण्याचं
आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं गोवर रुबेला लस दिल्यानंतर आरोग्याच्या समस्या उद्भवल्यानं
पाच विद्यार्थ्यांना, तर पालम इथं सहा विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं
आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. औरंगाबादच्या आरोग्य विभागाच्या
संचालकांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
****
धुळे
महापालिका निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र-ईव्हीएममध्ये फेरफार
करण्यात आल्याचा आरोप ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी ही मशीन्स
तातडीनं बदलण्यात यावी, अशी मागणी मुख्य निवडणुक आयुक्तांकडे केली आहे. मतदान यंत्र
ठेवलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यावरुन शिवसेनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं
आहे. या यंत्रांची तपासणी करून प्रभागात वाटप करण्याचं काम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या
देखरेखीखाली करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
प्रवासखर्च
झेपत नसल्यामुळे मुलांना एचआयव्ही तपासणीसाठी नेऊ न शकणाऱ्या एचआयव्ही मातांसाठी बुलडाणा
जिल्ह्यात ‘आई प्रोग्राम’ नावाचा अभिनव उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाअंतर्गत एचआयव्हीग्रस्त
मातांना मदत म्हणून या विभागातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून दर दिवशी एक रुपया गोळा
करुन साठलेली रक्कम त्या महिलांना देण्यात येते. या अभिनव योजनेतून आतापर्यंत ५० हजार
रुपयांपर्यंत मदत देण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment