Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 9 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
नांदेड
जिल्ह्यातल्या लोहा, तसंच वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगरपरिषदेच्या आणि धुळे तसंच अहमदनगर
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. लोहा नगर परिषदेत १७ नगरसेवक पदांसाठी
५९, तर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुपारी दीड वाजेपर्यंत
४१ पूर्णांक ७७ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
रिसोड
नगरपरिषदेत २० नगरसेवक पदांसाठी १०८ उमेदवार, तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार निवडणूक
रिंगणात आहेत. याठिकाणी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५४ पूर्णांक १९ टक्के मतदान झालं.
धुळे
महापालिकेतल्या एकूण एकोणवीस प्रभागांत ७३ जागांसाठी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ३७
पूर्णांक २८ टक्के, तर अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ४९ टक्के
मतदान झाल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान,
अहमदनगर महापालिकेसाठी आज मतदान सुरू असताना पोलिसांकडून मतदान करण्यासाठी गेलेल्या
एका पत्रकाराला मारहाण झाल्याचं वृत्त आहे. याबाबत नगर प्रेस क्लबनं तोफखाना पोलिस
ठाण्यात ठिय्या मांडून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिस
अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चौकशी समिती नेमण्याचं आश्वासन दिलं.
****
संसदेचं
हिवाळी अधिवेशन येत्या मंगळवारी ११ तारखेपासून सुरु होत आहे. जवळजवळ महिनाभर चालणाऱ्या
या अधिवेशनात २० बैठका होणार आहेत. अधिवेशन काळात राज्यसभेत आठ, तर लोकसभेत १५ विधेयकं
मांडण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या आधी होणारं हे बहुधा शेवटचं पूर्ण अधिवेशन
असेल.
दरम्यान,
केंद्र सरकारनं उद्या एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सर्व पक्षांना दोन्ही सभागृहांचं
कामकाज सुरळीत चालू द्यावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन या बैठकीत करण्यात येईल.
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही एक
सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातली रणनीती ठरवण्यासाठी सर्व
विरोधी पक्षांची एक बैठकही उद्या होणार आहे.
****
खेलो
इंडिया युवक स्पर्धा २०१९ येत्या नऊ ते २० जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. क्रीडा
मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. या स्पर्धेत
नऊ हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले. खेलो इंडिया कार्यक्रमात सरकार
एक हजार ५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असल्याचं ते म्हणाले.
****
सामान्यतः
वापरात येणाऱ्या नेब्यूलायझर, रक्तदाब मोजण्याचं यंत्र, डिजिटल थर्मामीटर आणि ग्लूकोमीटर
अशा वैद्यकीय उपकरणांचा औषधी आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियमात औषधांच्या रुपात समावेश
करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या बदलामुळे अधिनियमात औषधीच्या रुपात समाविष्ट
उपकरणांची संख्या २७ झाली आहे.
****
सातत्यपूर्ण
अवर्षणसदृश स्थिती, वाढत्या रासायनिक खतांचा वापर आणि अन्य तत्सम कारणांमुळे बुलडाणा
जिल्ह्यात शेती उपयुक्त जमिनीचा पोत खराब झाला आहे. त्यामुळे प्रमुख पिकांचं जिल्ह्यातलं
एकरी उत्पादन निम्म्यावर आलं आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानात जिल्ह्यात मृदा नमुने
तपासून शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका दिल्या जातात. जिल्ह्यात जमीन आरोग्य आणि सुपिकता
व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा
मृदा सर्वेक्षण, चाचणी अधिकारी गायकवाड यांनी दिली आहे.
****
जालना
जिल्ह्यातल्या परतूर इथं आज सीएम चषक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन पाणीपुरवठा आणि स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झालं. या महोत्सवासाठी परतूर विधानसभा मतदार संघातून
४४ हजार खेळाडूंनी नोंदणी केल्याचं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं. सीएम चषक क्रीडा
स्पर्धांमध्ये राज्यभरात ३० लाख खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, महिनाअखेर ५० लाख नागरिक
या स्पर्धेशी जोडले जातील, असंही लोणीकर यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद
इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेच्या ३६व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी हेरिटेज
रन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील काही प्रमुख ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातून
खेळाडू धावले. एमजीएमच्या क्रीडांगणावर विजेत्यांचा आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी
कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात
आजच्या चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या चार बाद १०४ धावा झाल्या. रविचंद्रन अश्विन
आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. उद्या अखेरच्या दिवशी विजयासाठी ऑस्ट्रेलियाला
२१९ धावांची गरज आहे, तर भारताला सहा फलंदाज बाद करण्याची आवश्यकता आहे.
****
भुवनेश्वर
इथं सुरु असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज मलेशिया विरुद्ध जर्मनी हा सामना सध्या
सुरु आहे, तर संध्याकाळी सात वाजता नेदरलँड्स विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे.
****
No comments:
Post a Comment