Saturday, 2 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.03.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 March 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मार्च २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø विंग कमांडर अभिनंदन वर्तमान वाघा अटारी सीमेमार्गे भारतात दाखल

Ø सिमी या दहशतवादी संघटनेवरची बंदी आणखी पाच वर्षानं वाढवली

Ø वेणूगोपाल धूत आणि चंदा कोचर यांच्या घरांसह कार्यालयांची झडती

Ø राज्यात या वर्षी भारनियमन नाही - ऊर्जामंत्र्यांची ग्वाही

आणि

Ø नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्‌मय पुरस्कार जाहीर

****



 विंग कमांडर अभिनंदन वर्तमान काल रात्री पाकिस्तानातून भारतात परतले. पंजाबमध्ये वाघा अटारी सीमेवर, पाकिस्तानी सैन्यानं, अभिनंदन यांना भारतीय सैन्यदलाकडे सोपवलं. त्यानंतर जे वैद्यकीय तसंच इतर तपासणीसाठी अमृतसरमार्गे दिल्लीत पोहोचले, अभिनंदन यांचं देशभरातून स्वागत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी ट्वीट करून, अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे. चार दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना, अभिनंदन यांचं मिग विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं, त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं होतं.

****



 जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानातच असल्याचं, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांनी मान्य केलं आहे. भारतानं मसूद विरोधात ठोस पुरावे दिल्यास, पाकिस्तान सरकार, आजारी असलेल्या मसूदविरोधात कारवाई करेल, असं कुरैशी यांनी म्हटलं आहे.



 दरम्यान, पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मद संघटनेचा हात असल्याचे सविस्तर पुरावे, गेल्या बुधवारीच भारतानं पाकिस्तानला दिले आहेत. या संघटनेचे पाकिस्तानात अनेक दहशतवादी तळ असल्याच्या पुराव्यांचाही यात समावेश असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या बाटागुंड गावात काल मध्यरात्री सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या कारवाईत एका अधिकाऱ्यासह पाच सैनिकांनाही वीरमरण आलं.



 दरम्यान काल पाकिस्ताननं सीमेपलिकडून केलेला उखळी तोफांचा मारा आणि गोळीबारात तीन ग्रामस्थांचा मृत्यू झाला.

****



 केंद्र सरकारनं स्टूडंट इस्लालमिक मुव्हमेंट ऑफ इंडिया- सिमी या दहशतवादी संघटनेवरची बंदी आणखी पाच वर्षानं वाढवली आहे. या संघटनेनं समाज विघातक कारवाया सुरुच ठेवल्यानं, हा निर्णय घेतल्याचं, केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या अधिसूचनेत ५८ बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सीमीच्या सदस्यांचा उल्लेख आहे.

****



 पुलवामा हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने राजकीय वापर केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. ते काल धुळ्यात, कॉग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या जाहीर सभेत बोलत होते. राफेल खरेदी, शेतकरी कर्जमाफी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवरही त्यांनी टीका केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचीही यावेळी भाषणं झाली.

****



 व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या सर्व ठिकाणांवर सक्तवसूली संचालनालयानं काल छापे घालून झडती घेतली. धूत यांना बँकेकडून सुमारे एक हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपये कर्ज देताना झालेली, अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे. या दोघांची मुंबई आणि इतरत्र असलेली, पाच निवासस्थानं आणि कार्यालयांमध्ये एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली.

****



 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार क्रमांक बँक खात्यांशी संलंग्न असणं, बंधनकारक नसल्याचं, सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या योजनेचा दुसरा हप्ता येत्या एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

****



 राज्यात या वर्षी भारनियमन होणार नाही, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ऊर्जा निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असून, नवीकरणीय ऊर्जेमुळे ऊर्जा निर्मितीत राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा सुमारे सहा लाख कृषी पंपांना सौर ऊर्जेचा पुरवठा केला जाणार असून, पुढच्या पाच वर्षांत ४७ लाख कृषी पंपांना, सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचं उद्दीष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली.

****



 राज्यातल्या पोलीस पाटलांच्या मानधनात तसंच गृहरक्षक दल - होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय, मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. पोलीस पाटलांचं मानधन आता साडेसहा हजार रुपये, तर होमगार्डना पाचशे सत्तर रुपये कर्तव्यभत्ता मिळेल. या दोन्ही पदांच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा आणि अटल निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****



 धनगर समाजाच्या मागण्यांवर निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या या उपसमितीमध्ये चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सवरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील निलंगेकर या मंत्र्यांचा समावेश आहे. या उपसमितीची पहिली बैठक आज होणार आहे.

****



 अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काल शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात, जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचे भाजपचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

******



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्‌मय पुरस्कार काल जाहीर झाले. प्रसाद बन वाङ्‌मय पुरस्कार लेखक शिरीष कणेकर यांना, तर मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र, आणि सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

यंदाचा प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार 'काहिली' ह्या कादंबरीसाठी प्रा.डॉ. अनंत राऊत यांना आणि 'साहित्यकारण' ह्या समीक्षाग्रंथासाठी प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी पाच हजार रूपये रोख, सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १७ मार्चला नांदेड इथं, हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

****



 पालघर जिल्ह्यातल्या बोईसर आणि तारापूरच्या आसपासच्या परिसरात काल भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी तर दुसरा धक्का सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी जाणवला. या दोन्ही धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे तीन पूर्णांक दोन आणि चार पूर्णांक तीन एवढी नोंदवली गेली.

****



 हुतात्मा निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर काल नाशिक इथं, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चार दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात निनाद यांचा मृत्यू झाला. निनाद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, लोकप्रतिनिधी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****



 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच शाळेत दहावीचं परीक्षा केंद्र असावं, या निर्णयाची लातूरात अमंलबजावणी करण्यात आली. लातूर तालुक्यात हंरगुळ या गावी, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रातल्या तीन विद्यार्थ्यांनी, काल लेखनिकाच्या सहाय्याने दहावीचा पहिला पेपर सोडवला. राज्यातल्या अशा प्रकारच्या या पहिल्या केंद्रावर परीक्षार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 परभणी रेल्वे स्थानकावर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचं काल सकाळी खासदार संजय जाधव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यामध्ये उदवाहन, सरकता जिना, इलेक्ट्रॉनिक कोच संकेत प्रणाली, नवीन प्रवेश तथा बाहेर पडण्याचा मार्ग आणि वायफाय सुविधा यांचा समावेश आहे. मुंबई करता नवीन रेल्वे गाडीचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवला असून, अतिरिक्त पादचारी पुलासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

****



 स्वच्छता आणि एकता या विषयावर औरंगाबाद इथल्या प्रोझोन मॉलमध्ये, भरवण्यात आलेल्या बहुमाध्यम चित्र प्रदर्शनाचं उदघाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते काल झालं. माहिती प्रसारण मंत्रालयाच्या आऊटरिच ब्यूरो विभागाच्या पुणे शाखेनं आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित विषयांवर दृक श्राव्य पद्धतीनं माहिती दिली जात आहे. मुलांसाठी प्रश्नमंजुषा तसंच खेळही घेतले जाणार आहेत. हे प्रदर्शन उद्यापर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.

****





 हिंगोली इथल्या पत्रकार शांताबाई मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मोरे या हिंगोली इथून प्रसिद्ध होणाऱ्या 'साप्ताहिक हिंगोली समाचार' या वर्तमान पत्राच्या संपादक आहेत.

****



 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या राज्यभरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

****



क्रिकेट

भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हैद्राबाद इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजेपासून सामन्याला सुरूवात होईल.

*****

***

No comments:

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 10 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...