Wednesday, 27 March 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.03.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 March 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मार्च २०१९ - २०.००

****

काँग्रेस पक्ष गरीबी हटवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज पक्षाच्या इतर मागसवर्गीय विभागानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. बेरोजगारी वाढल्यामुळे बेरोजगार त्रस्त असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर पक्षानं दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील. त्याचबरोबर जे युवक उद्योग सुरू करू इच्छितात, त्यांना सरकारची परवानगी घेण्यासाठी तीन वर्षापर्यंत सवलत दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. 

****

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली. मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, या सहा मतदार संघांसह राज्यातल्या अमरावती, अकोला, बुलडाणा आणि सोलापूर अशा एकूण दहा मतदार संघात कालपर्यंत एकूण २९५ अर्ज दाखल झाले आहेत.

अमरावती मतदार संघात एकूण ३६ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी दोन अर्ज अपात्र ठरले आहेत.

परभणी लोकसभा मतदार संघात सहा जणांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये नामंजूर करण्यात आले. नामंजूर झालेल्या अर्जांमध्ये पंढरीनाथ वाघमारे, बालासाहेब हरकळ, उद्धव पवार, राजेंद्र पगारे, सिद्धेश्वर पवार आणि संजय परळीकर यांचा समावेश आहे. आता या मतदारसंघात २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

लातूर लोकसभा मतदारसंघात आज १५ उमेदवारांपैकी सुधाकर श्रृंगारे, सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, मच्छिंद्र कामंत, रामराव गारकर, यांच्यासह ११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या पैकी तीन उमेदवारांची उमेदवारीही अवैध ठरवण्यात आली आहे. यामध्ये संजय दोरवे, विकास कांबळे आणि भगवान कुमठेकर, यांचा समावेश आहे

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले, तर २० जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.



बीड लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी सुनावणी अखेर वैध ठरवला. अपक्ष उमेदवार कालिदास आपेट मुंडे यांच्या अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळून लावण्यात आला. डॉ प्रीतम मुंडे यांनी आपल्या संपती विवरणात काही बाबी लपवल्याची तक्रार, एका मतदारानं केली होती, ही तक्रार देखील फेटाळण्यात आली.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज स्वीकारण्याबाबतचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज रात्री साडेनऊपर्यंत राखून ठेवला. एका अपक्ष उमेदवारानं चव्हाण यांच्या मालकीच्या गॅस एजन्सीच्या संबंधात काही कागदपत्रं सादर करुन त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात २६ उमेदवारांपैकी दोघांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे उमदेवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांच्या अर्जावर घेण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांचे अर्ज वैध ठरवले. अन्य उमेदवार स्वामीनाथ हरवाळकर यांनी शपथ पत्र सादर न केल्यामुळे तसंच उत्तम खंदारे यांचा अर्ज अपूर्ण असल्यामुळे अवैध ठरवण्यात आला.

दरम्यान, निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात २९ मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

****

भंडारा - गोंदिया लोकसभा निवडणुकीत आज तारका देविदास नेपाले या अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. उद्या २८ मार्च अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

****

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. अंतुले यांच्या समवेत शिवसंग्रामचे रायगड जिल्हा अध्यक्ष उदय आबोणकर यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.



अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला, आपण निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने पक्षात प्रवेश केलेला नसून, कॉंग्रेस पक्षाच्या विचारसरणीकडे आकर्षित होऊन, पक्षात आल्याचं मातोंडकर यांनी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला पक्ष प्रवेशाची ऑफर आलेली नाही, असं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज लातूर पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्र’ निर्माण करण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रांमध्ये, सुरक्षेपासून ते मतदान केंद्राधिकारी पर्यंत सर्व जबाबदारी महिला सांभाळतील. ही मतदान केंद्रं “सखी मतदान केंद्र” म्हणून ओळखली जाणार आहेत.

****

No comments: