Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 March 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०२ मार्च २०१९ दुपारी १.०० वा.
****
या सरकारच्या काळात एक
कोटी तीस लाख नवी घरं बांधण्यात आली असून या घरांमध्ये पाणी, वीज आणि गॅस सुविधा पुरवण्यासाठी
खास लक्ष देण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी
दिल्लीत बांधकाम तंत्रज्ञान भारत- २०१९ प्रदर्शन आणि परिषदेचं उद्घाटन करताना बोलत
होते. सर्वांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी बांधकामावरील जी एस टी आठ टक्क्यांहून एक
टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला असल्याचं ते म्हणाले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत
तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक, नव उद्योजक, विकासक आणि या क्षेत्रातले तज्ञ आणि अभ्यासक
सहभागी होत आहेत. या परिषदेत बाजारातल्या नव-नवीन कल्पनांची देवाणघेवाण तसंच या क्षेत्रातल्या
भागधारकांना नवी भागिदारी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
****
सरकार शेतकरी आणि मच्छीमाऱ्याच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध
असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मच्छीमारांच्या कल्याणासाठी एक
स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येत असून यासाठी साडे सात हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
करून देण्यात आला असल्याचं ते म्हणाले. ते काल संध्याकाळी विशाखपट्टणम मध्ये आयोजित
सभेत बोलत होते. मच्छीमारांना मच्छीमारीसाठी आवश्यक असलेले साहित्य आणि पायाभूत सुविधांसाठी
अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या
सततच्या बॉम्बहल्यात पुंछ जिल्ह्यात सोलात्री गावातल्या एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा
मृत्यू झाला आहे. सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे या भागातल्या नागरिकांनी इतर ठिकाणी स्थलांतरास
सुरुवात केली आहे. तसंच राजौरी आणि पुंछ जिल्ह्यातल्या सीमेपासूनच्या पाच किलोमीटरपर्यंतच्या
परिसरातल्या शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पाकिस्तान
सतत युद्धबंदीचा भंग करत असून भारतीय चौक्या आणि नागरी भागांना लक्ष्य करत आहे. भारतीय
सैन्य दल देखील या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.
****
देशात आगामी सार्वत्रिक निवडणुका वेळेवर घेतल्या जातील,
असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं आहे. ते काल उत्तरप्रदेशमध्ये लखनौ
इथं निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. देशात मुक्त आणि निर्भय आणि शांततेच्या
वातावरणात निवडणुका घेण्यासाठी, निवडणूक आयोग वचनबद्ध आहे, असं ते म्हणाले. आयोगानं
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निवडणूक उमेदवाराला आता देशातल्या मालमत्तांसह त्यांच्या
परदेशातल्या मालमत्तेची माहिती देणं बंधनकारक आहे. तसंच मतदारांना निवडणुकीशी संबंधित
कोणतीही तक्रार सी-व्हिजिल ॲपवर दाखल करता येऊ शकेल, असं अरोरा यावेळी म्हणाले.
*****
राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी जम्मू-काश्मीर मधल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांसाठी १०टक्के आरक्षण
जाहीर केलं आहे. कोणत्याही जाती
आणि धर्माच्या तरुणांना नोकरीसाठी या
आरक्षणाचा फायदा होणार आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या
मन की बात-रेडिओवरील सामाजिक क्रांती या पुस्तकाचं आज नवी दिल्लीत प्रकाशन करण्यात
आलं. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील ५3 मालिकांद्वारे सहक्षेपित
करण्यात आलेल्या ’मन की बात’ या कार्यक्रमाचं या पुस्तकात संकलन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय राजधानी परिसरातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पाच हजार कोटी रुपये किंमतीच्या
रस्त्यांची कामं सुरू असल्याचं केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं
आहे. ते काल नवी दिल्लीत तीन हजार ५८० कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांच्या कोनशीलेचं
उद्घाटन करताना बोलत होते.
****
मुंबई मेट्रो रेल्वेचे दोन रेल्वेमार्ग कार्यान्वित
करण्यासाठी केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात 926 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतक्या
खर्चाच्या कर्जासाठी करार झाला आहे. या नियोजित प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
****
नैऋत्य अफगाणिस्तानमध्ये तालीबान्यांनी
अमेरिका-अफगाण सैनिक तळावर केल्लेया हल्ल्यात काल २३ जवान ठार, तर १५ जवान जखमी झाले
आहेत. त्याचबरोबर सैन्यानं २० घुसखोरांना कंठस्नान घातले आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाचे
प्रवक्ते गफूर अहमद जावेद यांनी ही माहिती दिली. सात आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याद्वारे
तालिबान्यांनी हे हल्ले घडवले असल्याचा दुजोरा हेल्मंड प्रांताच्या राज्यपालाचे प्रवक्ते
ओमर झॉक यांनी दिला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment