Saturday, 2 March 2019

Tex- AIR News Bulletin Aurangabad 02.03.2019 Evining Bulletin.


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 March 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मार्च २०१९ सायंकाळी ६.००

****

संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी पाकिस्तानातून परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची भेट घेतली. अभिनंदन यांच्यावर नवी दिल्लीत काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. काल रात्री अकरा वाजता विमानतळावर पोहचल्यानंतर अभिनंदन यांना सैन्य दलाच्या वैद्यकीय तपासणी केंद्रात नेण्यात आलं. २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी युद्धविमानाला पिटाळून लावत असताना त्यांचे मीग-२१ हे युद्धविमान कोसळल्यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन यांना बंदी बनवलं होतं.

****

पाकिस्तानानं भारताविरोधात एफ-१६ या अमेरिकनं युद्धविमानाचा दुरुपयोग केल्याच्या शक्यतेबाबत अमेरिकनं पाकिस्तानला जाब विचारला आहे. पाकिस्ताननं भारताविरोधात एफ-१६ या विमानाचा वापर केल्याच्या वृत्तानंतर अमेरिकेनं पाकिस्तानकडे ही विचारणा केली आहे. सदरचा संभाव्य वापर करताना पाकिस्ताननं अमेरिकेसोबत केलेल्या कराराचा भंग तर केला नाही, याची अमेरिका शहानिशा करत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल युद्धविमान खरेदीमध्ये घोटाळा करून भारतीय हवाई दलाच्या ३० हजार कोटी रुपयांवर डल्ला मारला असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे. ते आज झारखंडची राजधानी रांचीमध्ये पक्षाच्या परिवर्तन सभेत बोलत होते. राफेल युद्धविमान खरेदीत अनिल अंबानी यांना चुकीच्या पद्धतीनं ३० हजार कोटी रुपये देण्यात आला असल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला.

****

व्हिडिओकॉन कंपनीचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत आणि आय सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आज सक्तवसुली संचालनालयात हजर झाले.  काल तपास पथकानं या दोघांची मुंबई आणि औरंगाबाद इथं असलेली निवासस्थानं आणि कार्यालयांची तपासणी केली. आय सी आय सी आय बँकेनं व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत यांना सुमारे एक हजार 875 कोटी रुपये कर्ज देताना झालेली, अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे. सक्तवसुली संचालनालयानं चंदा कोचर , दीपक कोचर, धुत यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

*****

दिल्ली न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी रॉबर्ट वॉड्रा यांचा अंतरिम जामिनाची मुदत १९ मार्चपर्यंत वाढवली आहे. सक्तवसुली संचालनालयानं वॉड्रा यांच्याविरुध्द बेहिशोबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.

****

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनबलगन आणि चीनस्थित ‘नाईन ड्रॅगन पेपर्स’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिंग छोंग ड्यू यांच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कराराअंतर्गत नाईन ड्रॅगन पेपर्स ही कंपनी राज्यात पेपर निर्मितीचा उद्योग उभारणार असून त्यामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस मदत होणार आहे.

****

अरवली पर्वतामध्ये बांधकामास परवानगी देण्यासाठी केलेल्या सुधारणा कायदावरून सर्वोच्च न्यायालयानं हरियाणा सरकारची खरडपट्टी काढली आहे. सदरची कृती ही धक्कादायक असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही हरियाणा सरकारनं ही कृती केली असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. हरियाणा सरकारनं बुधवारी विधानसभेत जंगल आणि पर्वत भागांमध्ये बांधकामास बंदी असलेल्या कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक पारित केलं होतं.

****

कारगिलच्या युद्धात विशेष कामगिरी करणारे एअर मार्शल रघुनाथ नांबियार यांनी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नांबियार हे राष्ट्रीय संरक्षण संस्थेचे विद्यार्थी असून जून १९८१ मध्ये युद्ध वैमानिक म्हणून ते हवाई दलात रुजू झाले होते.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना, आज हैदराबाद इथं राजीव गांधी मैदानावर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २३७ धावाचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतातर्फे शमी, बुमराह आणि यादवनं प्रत्येकी दोन बळी घेतले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या षटकांत एक बाद चार धावा झाल्या होत्या.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने नांदेडच्या कवयित्री लीला धनपलवार यांच्या नावाने देण्यात येणारा विशेष काव्यपुरस्कार नांदेडचे कवी गोविंद कुळकर्णी यांना जाहीर झाला आहे. कुळकर्णी यांना १७ मार्च रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ११ हजार रुपये रोख, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

*****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...