Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 March 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०३ मार्च २०१९ दुपारी १.०० वा.
****
जागतिक नवकल्पना निर्देशांकात गेल्या चार वर्षांत भारत २४व्या
स्थानावर आला आहे. जगातील सर्वोत्तम २५ देशांच्या यादीतलं स्थान पक्कं करणं, हेच ध्येय
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१९ स्पर्धेच्या
अंतिम फेरीच्या सोहळ्यात काल ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. स्मार्ट इंडिया
हॅकॅथॉन हा देशातील आव्हानांना सोडविण्यासाठीचा नवीन उपक्रम असल्याचं पंतप्रधान यावेळी
म्हणाले. सलग ३६ तास चालणाऱ्या
या स्पर्धेत देशभरातल्या ४८ विविध केंद्रावरून
दोन लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
****
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात
शुक्रवारपासून सलग ५६ तास सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मात्र यात केंद्रीय
राखीव पोलिस दलाचे तीन, तर राज्य पोलिस दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. शुक्रवारी सकाळी
सुरू झालेली ही चकमक आज सकाळपर्यंत सुरू होती. यात नऊ जवान जखमी झाल्याचं संरक्षण दलाच्या
प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
****
हिमाचल प्रदेशच्या किनौर
जिल्ह्यात हिमस्खलन झाल्यामुळे दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सैन्यदलाच्या पाच
जवानांपैकी एकाचा मृतदेह शोधपथकाला सापडला आहे. २० फेब्रुवारीला भारत-चीन सीमेजवळ झालेल्या
हिमस्खलनात हे जवान सापडले होते.
****
घरकामासाठी बालकामगार ठेवल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं
एका दाम्पत्याला शंभर रोपं लावण्याची, तसंच त्या मुलाला दीड लाख रुपयांची मदत करण्याची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती नजमी वजीरी यांनी
या आरोपींसह अन्य दोघांनाही ती रोपे लावण्यास मदत करण्याची शिक्षा सुनावली आहे.
****
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा
यांना दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयानं १९ मार्चपर्यंत अटक करण्यास मनाई केली आहे.
लंडनमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेची माहिती विवरण पत्रात न दिल्याप्रकरणी अंमलबजावणी
संचालनालयानं वाड्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावर वाड्रा यांनी दाखल
केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून तात्पुरता अटकपूर्व दिलासा मिळाला आहे.
****
नेपाळचे माजी उपपंतप्रधान आणि सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट
पक्षाचे ज्येष्ठ नेते भारत मोहन अधिकारी यांचं आज निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते.
त्यांच्या निधनावर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल
दहल यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक मेधा नार्वेकर यांना
पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या उपाध्यक्ष आणि
सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे. व्हार्टन स्कूलमधून एमबीए पदवी मिळवलेल्या नार्वेकर
एक जुलैपासून पदभार सांभाळतील, असं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सध्या
त्या पेन्सिल्वानिया विकास आणि माजी विद्यार्थी संपर्क विभागाच्या वरिष्ठ सहयोगी उपाध्यक्ष
म्हणून कार्यरत आहेत.
****
कोकण आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रास
जोडणारा महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग असलेल्या कोल्हापूर - वैभववाडी या १०७ किलोमीटरच्या
लोहमार्गाला कोकण रेल्वे बोर्डानं शनिवारी मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे कोकणातली बंदरे थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडली
जाणार असून, जागतिक व्यापारामध्ये गतिमानता आणण्यासाठी या मार्गाचा मोठा उपयोग होईल.
पश्चिम महाराष्ट्र हा साखर उत्पादित करणारा मोठा प्रदेश असून, सध्या विजयदुर्ग बंदरातून
मोठ्या प्रमाणावर साखरेची मळी परदेशात पाठवली जात आहे. परदेशी व्यापार जगताला या प्रकल्पाचा
आणखी फायदा होऊ शकणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दुबई टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या रॉजर
फेडरर यानं एकेरीतील शंभरावं अजिंक्यपद पटकावलं आहे. वीस वेळा ग्रॅँड स्लॅम विजेत्या
फेडररनं यावेळी ग्रीसच्या स्टेफानो सितसिपाचा ६-४, ६-४ असा पराभव केला.
//***********//
No comments:
Post a Comment