Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 July 2019
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** कोकणात रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण
फुटलं; तिवरे भेंडेवाडीमधले २३ जण वाहून
गेल्याची भीती, दोन जणांचे मृतदेह सापडले
** राज्यात पावसाचे ४० बळी;
मुंबईत भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे
आदेश
** उस्मानाबाद
आणि परभणीसह राज्यात सात नवीन सरकारी वैद्यकीय
महाविद्यालयं सुरू करण्याला केंद्र सरकारची मंजूरी
** वैद्यकीय
प्रवेशासाठी प्रादेशिक आरक्षणाचं समीकरण रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात तोडगा
काढण्याचे विधान परिषदेच्या सभापतींचे राज्य सरकारला निर्देश
**
आणि
** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
बांग्लादेशवर २८ धावांनी विजय मिळवत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश
****
कोकणात गेल्या चार दिवसांपासून
सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण काल रात्री नऊ वाजता फुटलं. या पुरामध्ये तिवरे भेंडेवाडीमधले २३ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत
आहे. आतापर्यंत यापैकी दोन जणांचे
मृतदेह सापडले असून मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. काल रात्री ९
वाजेनंतर हे धरण पूर्ण भरून वाहू लागलं त्यानंतर पाणी वाढल्यामुळे या धरणानजीकचा दादर पूल पाण्याखाली आला. या भागातल्या ओवळी,
रिक्टोली, आकले, दादर,
नांदिवसे, कळकवणे ओवळी या गावांत पाणी शिरलं
असून त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला आहे.
दरम्यान, नदी
किनाऱ्यावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात
आला असल्याचे माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांनी सांगितलं.
****
राज्यात पावसाशी संबंधित
घटनांमध्ये एकूण ४० लोकांचा मृत्यू झाल्याचं अधिकृत सूत्रानं काल सांगितलं. मुंबईतल्या
मालाड या उपनगरामध्ये मुसळधार पावसानं भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची
संख्या २२ झाली आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साठल्यामुळे जनजीवन विस्कळित
झालं असून स्थानिक प्रशासनाला काल शाळा महाविद्यालयांना सुटी द्यावी लागली. मुंबईतली
उपनगरीय रेल्वे सेवा, बस सेवा तसंच विमान सेवेदेखील या पावसामुळे खंडीत झाली.
मुंबईत अंधेरी भुयारी
रस्त्यावरून जाताना मोटारीत पाणी घुसल्यामुळे दोन तरूणांचा त्यात गुदमरून मृत्यू झाला.
पुण्यातही भिंत
कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.
कल्याण इथंही एक
भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला, या भिंतीच्या ढिगाऱ्याखालून चौघांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश
आलं.
नाशिक शहरातल्या
सातपूर परिसरात एका बांधकाम प्रकल्पातला जलकुंभ कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुष कामगाराचा समावेश आहे. काल सकाळी ही दुर्घटना घडली.
बुलडाणा जिल्ह्यातल्या
जामोद तालुक्यात भेंडवड बुद्रुक वीज पडून एक महिलेचा मृत्यु झाला तर तीन महिला गंभीर
जखमी झाल्या.
दरम्यान, मुंबईतल्या दुर्घटनेचे
विधीमंडळाच्या अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले.
विधानसभेत स्थगन प्रस्तावावर बोलतांना राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी, मुंबई महापालिका बरखास्त करून,
प्रशासक नेमावा, अशी मागणी केली. नालेसफाई संदर्भात महापालिकेची चौकशी करून, दोषींवर कठोर
कारवाई करावी तसंच यासंदर्भात राज्य सरकारनं अध्यादेश काढून आवश्यक
ती कार्यवाही तातडीनं करावी, असं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे आरेफ नसीम खान यांनी, या चर्चेत सहभाग घेतला.
या चर्चेला
उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असं सांगितलं. मृतांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे पाच लाख आणि मुंबई
महापालिकेकडूनही पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, असं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत परवा रात्री सुमारे तीनशे पंचाहत्तर ते चारशे मिलीमीटर
पाऊस झाला, गेल्या पंचेचाळीस वर्षात दुसऱ्यांदा अत्याधिक
पावसाची नोंद झाली, या पावसामुळे पाणी निचरा करणाऱ्या
यंत्रणेवर ताण पडल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मराठवाड्याच्या काही भागात काल पाऊस झाला. जालना, बदनापूर आणि
भोकरदन तालुक्यातल्या झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. भोकरदन तालुक्यातल्या तांदुळवाडी, पारध, हिसोडा, दानापूर मुठाड,
जैनपूर, कठोरा, मनापूर,
मासनपूर वाडी, आलापूर परिसरात जोरदार पाऊस
झाला. या पावसामुळं दानापूर इथल्या जुई धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा
झाला आहे. भोकरदन तालुक्यातले पाणीपुरवठा करणारे ४० टँकरही बंद झाले आहेत. जाफराबाद तालुक्यातही जोरदार
पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर आणि किनवट तालुक्यातल्या मांडवी इथंही काल चांगला पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातही सर्वत्र काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड
आणि सिल्लोड तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाला. गेल्या चार पाच वर्षापासून कोरडी पडलेली शिवना नदी या जोरदार पावसामुळं भरून
वाहू लागली. औरंगाबाद शहरातही काल पावसाच्या रिमझिम सरी कोसळत
होत्या. दरम्यान, येत्या ४८ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वदूर
पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
राज्यात सात नवीन
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं उभारण्यास केंद्र सरकारनं मंजूरी दिली आहे. उस्मानाबाद, परभणी, रायगड,
सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यामंध्ये ही नवीन महाविद्यालयं उभारण्यात येणार
असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण आणि भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी
याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
****
वैद्यकीय
प्रवेशासाठी प्रादेशिक आरक्षणाचं ७०:३०
हे समीकरण रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात येत्या पंधरा दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत
बैठक घेऊन तोडगा काढावा असे निर्देश विधान परिषदेच्या सभापतींनी राज्य सरकारला दिले
आहेत. या आरक्षणामुळे मराठवाड्याला वैद्यकीय प्रवेशासाठी कमी
जागा मिळतात, परिणामी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं,
आमदार सतीश चव्हाण यांनी काल लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून
सदनाच्या निदर्शनास आणून दिलं. वैद्यकीय प्रवेशासाठी एनईईटी नीट ही एकच परीक्षा
असताना, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी आणि विद्यमान सरकारच्या कार्यकाळातल्या
शेवटच्या अधिवेशनाचा काल समारोप
झाला. अधिवेशनात एकूण २१ विधेयकं पारित झाली. यावेळी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात अनेक अडचणी आणि आव्हानं आल्याचं सांगून सर्वांना
सोबत घेवून प्रामाणिकपणे आणि सकारात्मक भावनेतून काम केलं असल्याचं सांगितलं.
विदर्भ आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करून दाखवला असं सांगून पुन्हा मुख्यमंत्रीपदी
आपण विराजमान होवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
****
डिजीटल इंडिया योजनेचा चौथा
वर्धापन दिन परभणी डाक विभागातर्फे काल साजरा करण्यात आला. यानिमित्तानं बचत बँक आणि
डाक जीवन विमा यांचे मेळावे घेण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी संदेश फेरी काढून नागरिकांना
डाक खात्याच्या विविध योजनांच्या माहिती पत्रकांचं वाटप केलं.
****
वैद्यकीय प्रवेशासाठीचं ७०:३०
प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी काल परभणी इथं, संभाजी सेनेनं जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढला. आरक्षण रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत
मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
वाशी तहसील कार्यालयातला कोतवाल लक्ष्मण शिंदे याला पन्नास रुपये लाच घेतल्या प्रकरणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराला जात प्रमाणपत्र
देण्यासाठी त्यानं लाच मागितली होती.
****
राज्यभरात १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान राबवल्या जाणाऱ्या वन महोत्सवाच्या
निमित्ताने लातूर शहरातल्या प्रभाग ५ इथं नगरसेवक
विक्रांत गोजमगुंडे घरोघरी वृक्ष वाटप करत असून वृक्ष लागवड आणि संगोपनात नागरिकांचा
सहभाग वाढवण्यावर भर देत आहेत. या महिनाभरात प्रभाग पाचमध्ये किमान पाच हजार वृक्षांची
लागवड केली जाणार असल्याचं गोजमगुंडे यांनी सांगितलं.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांग्लादेशवर २८ धावांनी विजय मिळवून उपांत्य
फेरीत प्रवेश मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं रोहीत शर्माचं
शतक आणि के. एल. राहूलच्या ७७ धावांच्या जोरावर बांग्लादेश समोर विजयासाठी ३१५ धावांच आव्हान ठेवलं, मात्र बांग्लादेशचा संघ ४८ षटकात
२८६ धावा करून सर्व बाद झाला.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे
निघालेली शेगाव इथले संत श्री गजानन महाराज यांची पालखी आज उस्मानाबादहून तुळजापूरकडे
प्रस्थान करत आहे. ही पालखी काल उस्मानाबाद इथं मुक्कामी होती. महाराष्ट्रात सर्वाधिक
पायी अंतर चालून पंढरपूरला जाणारी ही पालखी आहे.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरात काल सायंकाळी योगेश्वरी शिक्षण
संस्थेच्या मैदानवर चार पालख्यांचा अश्वरिंगण रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. हिंगोली
जिल्ह्यातील नरसीचे संत नामदेव यांची पालखी, गंगाखेड इथली संत जनाबाई, नाहद इथली संत मोहनानंद महाराज यांची पालखी, तर
नागपूर इथल्या चारोधाम हनुमान पायी पालखीचा यात समावेश होता.
****
No comments:
Post a Comment