Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 July 2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
मुंबईत मालाड
इथं संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत या संदर्भात
स्थगन प्रस्तावामार्फत झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. या दुर्घटनेत अठरा जणांचा
मृत्यू झाला असून ७५ लोक जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबाला राज्य शासन आणि
मुंबई महापालिकेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, असं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत कालच्या रात्री सुमारे तीनशे पंचाहत्तर ते चारशे मिलीमीटर पाऊस झाला, गेल्या पंचेचाळीस वर्षात दुसऱ्या क्रमांकाचा अत्यधिक पाऊस झाल्याने, पाणी निचरा करणाऱ्या
यंत्रणेवर ताण पडल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, पुण्यातही काल भिंत
कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, या दुर्घटनेची चौकशी करण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत.
****
वैद्यकीय
प्रवेशासाठी प्रादेशिक आरक्षणाचं ७०:३०
हे समीकरण रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात येत्या पंधरा दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत
बैठक घेऊन तोडगा काढावा असे निर्देश सभापतींनी राज्यसरकारला दिले आहेत. या आरक्षणामुळे
मराठवाड्याला वैद्यकीय प्रवेशासाठी कमी जागा मिळतात, परिणामी
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं, आमदार सतीश
चव्हाण यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सदनाच्या निदर्शनास आणून दिलं.
वैद्यकीय प्रवेशासाठी एनईईटी नीट ही एकच परीक्षा असताना, सर्वांना समान संधी
मिळाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. उस्मानाबाद इथं शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय कधी सुरू करणार, असा प्रश्नही चव्हाण यांनी केला. वैद्यकीय
शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी, ७०:३० समीकरणामुळे
मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं मान्य केलं, मात्र हा विषय
न्याय प्रविष्ट असल्याचं सांगितलं. या उत्तरानं समाधान न झाल्याने विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, विक्रम काळे
यांनी सदनात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी झालेल्या गदारोळामुळे सभापतींनी सदनाचं
कामकाज तहकूब केलं. कामकाज परत सुरू झाल्यानंतर यासंदर्भात
मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेवून तोडगा काढण्याचे निर्देश
सभापतींनी सरकारला दिले.
****
दरम्यान, वैद्यकीय प्रवेशासाठीचं हे प्रादेशिक आरक्षण
रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणी इथं, संभाजी सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
काढला. आरक्षण रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत
मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलं.
****
अलिबाग इथल्या रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने
जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील सावित्री, गांधारी, कुंडलिका, आदी सर्वच
प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. येत्या २४ तासात रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्यानं दिला आहे.
****
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं आज दुपारी नीरा
नदी स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पाडेगाव इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं
पालखीचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पालखी लोणंद इथं मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.
****
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री माणिकराव
गावित यांचे पुत्र भरत गावित हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भरत गावित हे
नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून विद्यमान सदस्य देखील आहेत.
****
डिजीटल इंडिया योजनेचा चौथा वर्धापन दिन परभणी डाक विभागातर्फे
उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं बचत बँक आणि डाक जीवन विमा यांचे मेळावे
घेण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी संदेश फेरी काढून नागरिकांना डाक खात्याच्या विविध
योजनांच्या माहिती पत्रकांचं वाटप केलं.
****
औरंगाबाद इथल्या विश्व संवाद केंद्राचा १५वा ‘देवर्षी
नारद पत्रकारिता पुरस्कार’ बीड इथले पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांना आज प्रदान करण्यात
आला. शाल, श्रीफळ, पाच हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत, भारत आणि बांग्लादेश दरम्यान आज बर्मिंगहॅम इथं सामना सुरु आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तोपर्यंत भारतानं चाळीसाव्या षटकांत चार बाद दोनशे सदतीस धावा केल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment