Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
19
July 2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
कर्नाटक विधानसभेमधे जनता दल धर्मनिरपेक्ष - काँग्रेस
आघाडी सरकारच्या विश्र्वास दर्शक ठरावावरून निर्माण पेच अद्याप कायम आहे. राज्यपालांनी
सरकारला आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करायला सांगितलं होतं. मुख्यमंत्री
कुमारस्वामी यांनी काल विश्वास दर्शक ठराव विधान सभेत मांडला होता, परंतु चर्चेदरम्यान
गोंधळ झाल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं होतं. राज्यपाल वजुभाई वाला
यांनी आज प्रारंभी दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री कुमार स्वामी यांना बहुमत सिद्ध करायला
सांगितलं होतं. मात्र विधानसभेत झालेल्या गदारोळामुळं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब
करण्यात आलं होतं.
दरम्यान, कर्नाटकच्या या मुद्यावरून काँग्रेस पक्षाच्या
खासदारांनी आज लोकसभेत गदारोळ केला. अनेक सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात
उतरून, घोषणाबाजी करत फलक झळकावले.
****
‘मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगा’साठी ३५ प्रस्तावांना
शासनानं मंजूरी दिली आहे. तसंच शेती अवजारावरचा जीएसटी माफ करण्यासाठी केंद्र सरकारकडे
प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे. ते आज कोल्हापूरात
वार्ताहर परिषदेत बोलत होते. सध्या जमिनीचा पोत कायम टिकवण्याचं तसंच रासायनिक खतं,
किटकनाशकं आणि पिकांवर पडणारे रोग ही मोठी आव्हानं असून राज्यात ७१५ कोटी रूपये जलसंधारणाच्या
कामावर खर्च झाल्याची माहितीही बोंडे यांनी यावेळी दिली.
****
राज्यातील प्रत्येक गावात गृहनिर्माण संस्था उभारण्यात
येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. ते आज सोलापूर तालुक्यातल्या
सादेपुर इथं विविध विकास कामांचा शुभारंभ करतांना बोलत होते. येत्या तीन वर्षांत सर्वांना
घरं मिळाली पाहीजेत असा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी केला असून यासाठी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याच्या पार्श्र्वभूमीवर या गृहनिर्माण संस्था उभारण्यात
येणार असल्याचं सहकार मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सेवाग्राम आश्रमाचं नातं
अधोरेखित करणारं तसंच राज्यातील पन्नास कोटी वृक्ष लागवड आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
जन्मशताब्दीनिमित्त तीन स्वतंत्र टपाल तिकीटं प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती
वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर
सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकीटाचं प्रकाशन केलं जाणार असल्याचंही
त्यांनी नमूद केलं. त्यांनी या संदर्भात दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांना विनंती
केली होती. त्यानुसार ही तीन ही टपाल तिकिटं प्रकाशित करण्याबाबत विभागाला त्वरित आदेश
देण्यात येतील आणि लवकरच ही तीनही टपाल तिकिटं प्रकाशित होतील, असं दूरसंचार राज्यमंत्री
धोत्रे यांनी सांगितल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
****
शिवसेनेला शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करायची
आहे, असं शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज धुळ्यात पक्षाच्या
‘जनआशिर्वाद’ यात्रेच्या निमित्तानं आयोजित विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये
अद्यापही पेरण्या झाल्या नसून काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आलं आहे. काही ठिकाणी
पिकं धोक्यात आली आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यात आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत सुमारे
सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठी वाचन संस्कृती समृध्द होणं आवश्यक असल्याचं मत,
ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं सरस्वती भुवन महाविद्यालयात
‘प्रभाकरराव भालेराव ग्रंथ परिचय लेखन स्पर्धे’च्या निमित्तानं आयोजित ग्रंथ आणि भित्तीपत्रक
प्रदर्शनाचं उद्घाटन रसाळ यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात
विविध विषयांवरच्या तीस भित्तीपत्रकांचा समावेश आहे. हे प्रदर्शन येत्या २५ जुलैपर्यंत
खुलं आहे.
****
शाळा आणि अन्य ठिकाणी होत असलेल्या बालकांच्या हक्कांच्या
उल्लंघना विषयी तक्रारींची गंभीर दखल राष्ट्रीय बाल हक्क आणि संरक्षण आयोग घेणार असल्याची
माहिती राष्ट्रीय बाल हक्क आणि संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. आर. जी. आनंद यांनी आज गडचिरोली
इथं पत्रकार परिषदेत दिली. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील बाल हक्कांबाबत सुनावणी
नवी दिल्ली इथल्या आयोगाचे सदस्य डॉ. आनंद यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
****
अकोला इथल्या क्रीडा प्रबोधीनीच्या दोन मुष्टीयोद्ध्यांची
इंडोनेशियात होणाऱ्या तेविसाव्या राष्ट्रपती चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली
आहे. हरिवंश तिवारी आणि अनंता चोपडे या दोघांनी हे यश मिळवलं असल्याचं क्रीडा प्रबोधनीचे
प्रमुख सतीशचंद्र भट यांनी कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment