Friday, 24 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24.04.2020 TIME 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 २४ एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद शहरात आजपासून तीन मे पर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं दररोज दुपारी एक ते रात्री अकरा पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. वैद्यकीय सेवा, शेतकरी, दुग्ध उत्पादक आणि परवानगी देण्यात आलेल्या औद्योगिक आस्थापना, राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस वाटप केंद्र यांना यामधून वगळण्यात आलं आहे. दरम्यान, रमजान सणानिमित्त महानगर पालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी फळ विक्रेत्यांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी दुपारी तीन ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत फळ विक्रेत्यांना सूट दिली आहे.
****
हिंगोली इथं मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या २३ जणांना पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. यामध्ये काही अधिकारी - कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाहेर पडू नका अशी सूचना वेळोवेळी देऊनही या नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, याबद्दल त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं, मात्र यानंतर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यास कारवाईचा इशारा पोलिस उप अधीक्षक रामेश्वर वैजने यांनी दिला.
****
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव शहरात सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाला हरताळ फासला जात आहे. लोक बेजबाबदारपणे रस्त्यावर गर्दी करत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेची खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल पाहणी केली. भारतीय वैद्यकीय आणि संशोधन परिषदेनं या प्रयोगशाळेला नुकतीच मान्यता दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या सर्व  ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहेत. एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचाही पंतप्रधान यावेळी प्रारंभ करतील. स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सुरुवात करण्यात येणार आहे.
****


No comments: