Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात कोविड-19
आजाराचे रुग्ण बरे होण्याचा दर ६३ पूर्णांक १३ शतांश टक्क्यांवर पोहोचला असल्याचं आरोग्य
मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या कोविड-19 च्या रुग्णांची एकूण संख्या ११ लाख ९२
हजार ९१५ वर पोहाचली आहे. देशात आतापर्यंत ७ लाख ५३ हजार ४९ रुग्ण या आजारातून बरे
झाले आहेत. तर सध्या ४ लाख ११ हजार १३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात
२८ हजार ४७२ रुग्ण बरे झाले. देशभरातला मृत्यू दरही कमी झाला असून तो आता दोन पूर्णांक
४ दशांश झाला आहे. काल देशभरात ६४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या
२८ हजार ७३२ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
झडप असणारे
N95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
स्पष्ट केलं आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ.राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य
सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. राज्यांनी श्वसनासाठी झडप असणारे N95 मास्क वापरण्यावर
आपापल्या राज्यात बंदी घालावी, तोंड आणि नाक पूर्णपणे झाकण्याच्या नियमांचं पालन करावं,
असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोविड बाधितांच्या संख्येत आज ९९ ने वाढ झाली. यामध्ये महापालिका क्षेत्रातल्या
५६ तर ग्रामीण भागातल्या ३६ रुग्णांचा समावेश आहे. या रुग्ण वाढीमुळे जिल्ह्यातली कोरोना
विषाणू बाधितांची एकूण संख्या आता ११ हजार ७६५ झाली आहे, त्यापैकी ६ हजार ४९७ रुग्ण
बरे झाले आहेत, तर आतापर्यंत ४०८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातल्या विविध
रुग्णालयांमधून ४ हजार ८६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईचा
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून ५९ दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी
दरही कमी होऊन आता सरासरी १ पूर्णांक १८ शतांश टक्के झाला आहे, अशी माहिती काल पालिका
प्रशासनाने दिली. कोरोनाच्या चाचण्या अधिक जलदगतीने करता याव्यात यासाठी डॉक्टरांच्या
चिठ्ठीची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रोज होणाऱ्या चाचण्यांमध्ये भर पडली असून
आता दर रोज सुमारे ६ हजार ८०० चाचण्या करण्यात येत आहेत.
****
पुण्यात
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुन्हा एकदा
“मिशन झिरो” हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. नाशिकमध्येही मिशन झीरो उपक्रमाला काल
सुरुवात झाली. नाशिक शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून पाच हजाराहून अधिक रूग्ण
आढळले आहेत. त्यामुळे शहरात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि भारतीय जैन
संघटनेच्या वतीने मिशन झिरो ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या तुळजापूरमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं आजपासून
२६ जुलैपर्यंत पाच दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी
नागरिकांनी प्रशासनाला आणि नगरपालिकेला या संचारबंदी दरम्यान सहकार्य करण्याचं आवाहन
केलं आहे.
****
राज्यात
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल झाले
आहेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून
म्हणजे २२ मार्च ते २० जुलै या कालावधीत ३१ हजार ३३२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख १९ हजार ७९४ पास पोलीस विभागामार्फत वितरित करण्यात
आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
राज्यातील
५२ हजार ४३६ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असुन १ जुलै ते २०
जुलैपर्यंत राज्यातील १ कोटी १३ लाख ७३ हजार ३३१ शिधापत्रिका धारकांना २५ लाख ७२ हजार
१०९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक
संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यात
१ जुलै ते २० जुलै पर्यंत ८७० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे १९
लाख ४८ हजार ४३० शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी
दिली.
****
राज्यसभेच्या
नवनिर्वाचित खासदारांना आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ दिली जात आहे. राज्यसभेत सभापती
व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना शपथ दिली. शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय
मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे राजीव सातव, मल्लिकार्जुन
खरगे, भाजपचे डॉ भागवत कराड, उदयनराजे भोसले, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा
समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment