Monday, 2 November 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

*पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, मतदान एक डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला

*देशात कोरोना विषाणू संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या ७५ लाखांहून अधिक

*औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ५९ शतांश टक्के

आणि

*मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर सरन्यायाधीश लवकरात लवकर निर्णय घेणार

****

राज्यातल्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघांची निवडणूक येत्या एक डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदार संघांची निवडणूक या अंतर्गत होणार आहे. निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १२ नोव्हेंबर पर्यंत असून तेरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागं घेता येणार आहेत. मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार असल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

****

देशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ६८ टक्के इतकं झालं आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा तेरा पटीनं जास्त आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५३ हजार रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ७५ लाख ४५ हजार रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशात या संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सध्या पाच लाख ६१ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जगभरात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण देशात सर्वात कमी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ टक्के आहे.

****

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी काल आठ लाख ५५ हजार ८०० नमुन्यांच्या चाचण्या केल्या. आतापर्यंत ११ कोटी सात लाख ४३ हजार १०३ नमुने तपासण्यात आले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधीत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.५९ शतांश टक्के झालं असून, या संसर्गाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्तकतेनं उपाययोजना राबवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. ते आज या संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करत होते. ‘माझं कुंटुंब माझी जबाबदारीमोहिमेतंर्गत या संसर्गाची लक्षणं असलेल्यांवर प्रामुख्यानं यंत्रणा लक्ष देत असून जिल्ह्यात पुरेशी  रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोरोना विषाणू संसर्गाची पार्श्वभूमी असलेल्यांच्या तब्येतीवर देखरेख ठेवण्यासाठी गृहभेटी देणं तसंच अशा लोकांसाठी तपासणी शिबीर, आरोग्य मार्गदर्शन शिबीरांचं आयोजन महापालिका करणार आहे.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. सात दिवसांच्या उपचारांनंतर आज त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. पुढचे काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. 

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या तीनही शाखांचे वर्ग आजपासून ऑनलाईन सुरु करण्यात आले.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवतील. ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल ते देखील नोंदणी करून या वर्गात बसू शकतील. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असं आवाहन सरकारनं केलं आहे.

****

मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचं सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील, ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या या संदर्भातल्या विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सूतोवाच केल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं गेल्या नऊ सप्टेंबरला दिलेल्या अंतरिम आदेशांमुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीनं सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी आज सरन्यायाधीशांना केली. घटनापीठाची तातडीनं स्थापना करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज याच मागणीचा लेखी अर्ज तिसऱ्यांदा सादर करण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यातले गड किल्ले आणि स्मारकं ही राज्याचं भूषण असून त्यांच्याद्वारे या  ऐतिहासिक आणि वैभवशाली वारशांची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी, अधिकाधिक लोकांनी या ठिकाणी भेट द्यावी यासाठी पुरातत्व संचालनालयानं संरक्षण आणि विकास योजना तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज केल्या. राज्यातल्या गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासंदर्भातली बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत. हा आराखडा कशा पद्धतीनं कार्यान्वित करण्यात येईल, या बाबतही अभ्यास करावा, असं देशमुख यांनी या बैठकीत सांगितलं.

****

औरंगाबादमध्ये महिन्याच्या पहिल्या दिवशी सायकलवर कामाच्या ठिकाणी जाण्याचं अभियान महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या संकल्पनेतून आज महापालिकेत सुरू झालं. ते तसंच महापालिकेचे अन्य प्रमुख अधिकारीही आज सायकलवर महापालिकेत आले. सायकल चालवण्याकडे केवळ क्रीडा म्हणून नव्हे तर दैनंदिन जीवनात सायकलचा उपयोग वाहन म्हणून करण्याची मानसिकता सर्वसामान्यांमध्ये विकसित होणं गरजेचं असल्याचं पांडेय यांनी यानिमित्त म्हटलं आहे. आरोग्याबरोबर प्रदूषण कमी करायला या सवयीमुळे फायदा होणार असल्यानं नागरिकांनी देखील या उपक्रमाला हातभार लावून दैनंदिन जीवनात सायकलचा उपयोग करावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या जनजागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहिमेत सहभागी होत, भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबाद अध्यक्ष नितीन काळे यांनी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

राज्यात पोलिस दलातल्या आणखी अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाल्यामुळे पोलिस दलात या संसर्गाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या सव्वीस हजार पाचशे एकोणनव्वद झाली आहे. यापैकी चोविस हजार नऊशे १९ कर्मचारी आतापर्यंत बरे झाले आहेत. तर दोनशे ८४ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

****

टाळेबंदी उठवण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र विवाह सोहळ्याला हवी तशी  परवानगी दिली नसल्यानं हिंगोली, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद सह विविध ठिकाणी आज आंदोलनं करण्यात आली. मंडप, सजावट संघटनांतर्फे ही आंदोलनं करण्यात आली. ५०० जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करण्यास परवानगी मिळावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...