Tuesday, 30 March 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.03.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 March 2021

Time 7.10am to 7.25am

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक३० मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

·      औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदी आदेशात बदल; आता उद्यापासून ९ एप्रिलपर्यंत संचारबंदी.

·      नांदेड जिल्ह्यात बाधित रुग्णाच्या कुटुंबात वाढता संसर्ग पाहता गृह विलगीकरण सुविधा बंद.

·      बीड जिल्ह्यात आजपासून सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत टाळेबंदी शिथिल केली जाणार.

·      लातूर इथं सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ‘कोविड समर्पित रुग्णालय’ सुरू करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.

·      धुळवडीचा सण काल कोविडचे निर्बंध पाळत मर्यादित रुपात साजरा.

आणि

·      एलिमेंटरी तसंच इंटरमीडिएट चित्रकला परीक्षा यंदा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

****

औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीच्या आदेशात बदल करण्यात आला असून, जिल्हाभरात उद्यापासून येत्या ९ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू असेल. पूर्वीच्या आदेशानुसार आजपासून आठ तारखेपर्यंत संचारबंदी लावली जाणार होती, मात्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसंच पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी याबाबत सुधारित आदेश काल जारी केले. आज रात्री बारावाजेपासून नऊ एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. त्यामुळे आज सर्व आस्थापना तसंच कार्यालयं रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. पूर्वनियोजित परीक्षांसाठी परीक्षार्थींना प्रवासाची सूट देण्यात आली आहे. जिल्ह्यातले सर्व पेट्रोलपंप सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत सर्वांसाठी खुले असतील. त्यानंतर मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांनाच इंधन पुरवठा होईल. सर्व उपाहारगृहांना रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच पार्सल सेवा देण्यास परवानगी आहे. संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारचे उद्योग, रुग्णालयं, औषध विक्री आणि वितरण, ई कॉमर्स सेवा, वर्तमानपत्रं, आरक्षित प्रवासी वाहतुक, सर्व बँका तसंच शासकीय कार्यालयं, सुरू राहणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या गृह विलगीकरणाची सुविधा बंद करण्यात येत असून, बाधित रूग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी ही माहिती दिली. बाधित रुग्णांना गृहविलगीकरणात उपचार घेण्यास परवानगी दिल्यामुळे, संबंधित कुटुंबातल्या अन्य व्यक्ती कोविड बाधित होण्याचं प्रमाण वाढलं आहे, यामुळे हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यासाठी महापालिकेनं नांदेड शहरात चार ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरु केली आहेत. याशिवाय शहरातली हॉटेल्स आणि लॉज मालकांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी दर्शवली, तर त्यांना तत्काळ परवानगी देण्यात येईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात आजपासून सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत टाळेबंदी शिथिल केली जाणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. २६ मार्चपासून चार एप्रिलपर्यंतच्या या टाळेबंदीत दररोज काही काळ शिथिलता देण्याची मागणी विविध व्यापारी संघटनांनी मुंडे यांच्याकडे केली होती, त्यानंतर मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही सूचना केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात संपूर्ण टाळेबंदी टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. नागरिकांनी सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप, जीभेची चव जाणे, वास न येणे, अशी सौम्य लक्षणं दिसली तरीही तत्काळ चाचणी करून घ्यावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

कोणतंही लक्षण हे अंगावर काढू नका. जरी हे उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असले तरीसुध्दा मौजमजा टाळून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं सगळ्यांना मी कळकळीचं आवाहन करतो. मास्क, सॅनिटायझर या दोन गोष्टी कोविड साठीच्या प्रादुर्भावाला अटकाव करतात. सर्वांनी मास्क वापरला तरीसुध्दा आपल्याला रोगाच्या संसर्गावर नियंत्रण घेता येतं.

****

लातूर इथं लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सुसज्ज इमारतीत पुन्हा ‘कोविड समर्पित रुग्णालय’ सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. या ठिकाणी द्रवरुप प्राणवायू प्रकल्पासह अनेक अद्ययावत सुविधा असल्याने, गेल्या वर्षी अनेक रुग्णांना लाभ झाला होता. हे रुग्णालय तातडीनं सुरू करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी.यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात एका कोविड रुग्णाचा शौचालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुलाबराव ढवळे असं रुग्णाचं नाव असून, ते बराच वेळ शौचालयातून बाहेर न आल्यानं इतर रुग्णांनी त्याबाबत तक्रार केली, त्यानंतर शौचालयाचा दरवाजा तोडून ढवळे यांना बाहेर काढलं, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

****

राज्यात काल ३१ हजार ६४३ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २७ लाख ४५ हजार ५१८ झाली आहे. काल १०२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार २८३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. काल २० हजार ८५४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २३ लाख ५३ हजार ३०७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक ७१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ३६ हजार ५८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये काल नव्या तीन हजार ४९१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, नांदेड जिल्ह्यातल्या १९, परभणी सहा, लातूर तीन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार २७२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ९८, लातूर ३९३, परभणी ३९२, उस्मानाबाद २३९, तर हिंगोली जिल्ह्यात ९७ नवे रुग्ण आढळून आले.

****

धुलिवंदन - धुळवडीचा सण काल कोविडचे निर्बंध पाळत मर्यादित रुपात साजरा झाला. परभणी इथं अनेक भागातील नागरिक, महिला तसंच लहानग्यांनीही आपल्या कुटूंबातच रंग खेळून धुळवडीचा सण साजरा केला. औरंगाबाद शहरातही नागरिकांनी एकत्र येण्याऐवजी आपापल्या कुटुंबातच धुळवड साजरी केल्याचं दिसून आलं.

****

अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी परवा एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री अमरनाथजी श्राईन डॉट कॉम या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ५६ दिवस चालणारी ही यात्रा २८ जूनला सुरु होणार असून, २२ ऑगस्टला संपणार आहे.

****

वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या चित्रकला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात या परीक्षांचे अतिरिक्त गुण मिळणार नाहीत. तसंच विविध सामायिक प्रवेश परीक्षा- सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मिळणारे अतिरिक्त गुण दिले जाणार नाहीत. पुढच्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट ठेवू नये असं सरकारनं सूचित केलं आहे.

दरम्यान, राज्यातल्या एक हजार २४ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचं निर्धारित शुल्क पाहता येईल.

****

कोविडच्या वाढत्या संख्येवर टाळेबंदी हे उत्तर नाही, मात्र कोविडवर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य सरकार टाळेबंदी लागू करणार असेल, तर त्याला कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास, मातोश्रीवर बसून कसा कळणार? अशी टीकाही पाटील यांनी केली. कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. मात्र, पूर्णतः टाळेबंदी करून काहीही साध्य होणार नाही, असं पाटील यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटात वेदनेच्या तक्रारीनंतर मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. उद्या ३१ मार्चला त्यांच्यावर एण्डोस्कोपी आणि नंतर शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती मलिक यांनी दिली.

****

गडचिरोली जिल्ह्यात काल सकाळी नक्षलविरोधी अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी मारले गेले. कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा-हेटळकसा जंगलात ही कारवाई झाली, मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

****

सोयाबीनच्या दर्जेदार बियाणांचा मुबलक पुरवठा व्हावा आणि शेतकरीच बियाणे उत्पादक व्हावा, यासाठी लातूर जिल्ह्यात कृषी विभागाने प्रथमच उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केलं आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत, उन्हाळी सोयाबीनची लागवड केली. निलंगा तालुक्यात सर्वाधिक ६४ एकरवर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली आहे. निलंग्याचे कृषी सहायक सुनील घारुळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.

जिल्हा कृषी अधिकारी लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामधे मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबिनची लागवड करण्यात आलेली आहे. यासाठी शासन स्तरावर प्रोत्साहनपर अनुदान म्हणून एकरी दीड हजार रूपये मदत देण्यात येत आहे.

****

नांदेड शहराच्या वजीराबाद भागात काल जमावबंदी आणि संचारबंदी आदेश मोडीत काढून एका जमावाने मिरवणूक काढली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर यावेळी समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्याच्या पाथरी शहरात सुमारे पाच लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेत, एकाला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल पहाटे सेलू कॉर्नर परिसरातल्या एका गोदामातून गुटख्याची पोती जप्त केली. बाजारभावानुसार या गुटख्याची किंमत चार लाख ८० हजार २४० रुपये असल्याचं समजतं. पोलिसांनी या प्रकरणी अवेस खान नावाच्या इसमाला अटक केली असून, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

****

सर्वसामान्य नागरिकांकडून सक्तीने वीज देयकं वसुलीच्या निषेधात उस्मानाबाद जिल्ह्यात आज वीज बील होळी आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यात महावितरणची कार्यालयं, तसंच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर वीज बिलाची प्रतिकात्मक होळी करून निषेध करणार असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, लातूर जिल्ह्यात होळी पौर्णिमेलाच वीज बील होळी आंदोलन करण्यात आलं. १५ दिवसांत वीज देयकं कमी केली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

****

No comments: