Saturday, 17 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** कोविड उपचारांसाठी उद्योग क्षेत्रांनी सहकार्य करावं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

** रेल्वे प्रवासात तसंच स्थानकावर मास्क न वापरल्यास प्रवाशांना ५०० रुपये दंड

** मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ४५ टक्क्यांवर मतदान

आणि

** बीड जिल्ह्यात नवे एक हजार २११ कोविड बाधित; औरंगाबाद इथं १२ कोविड बाधितांचा मृत्यू

****

 

कोविड उपचारांसाठी उद्योग क्षेत्रांनी सहकार्य करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे फिकी, सीआयआय तसंच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला. सध्याच्या परिस्थितीत प्राणवायूची नितांत गरज आहे, याशिवाय औषधं, रुग्णखाटा चाचणी केंद्र, लसीकरणाला वेग देणं अशी लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असं मुख्यमंत्री म्हणाले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग - व्यवसायांचं नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचं नियोजन करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. उद्योगांनी त्यांच्या आवारात नवीन तंत्रज्ञानावर आधारित हवेतील प्राणवायू शोषून उत्पादन करणारे छोटे प्रकल्प सुरु करावेत तसंच उत्पादित प्राणवायू पूर्णपणे वैद्यकीय वापरासाठी द्यावा, आणि गृहनिर्माण क्षेत्रातील उद्योगांनी त्यांचे पूर्ण झालेले गृहनिर्माण प्रकल्प विलगीकरण केंद्रांसाठी द्यावेत असं आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केलं.

कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे असा विश्वास राज्यातील प्रमुख उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना दिला. कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयानं पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांसाठी एक कृती दल तातडीने निर्माण करावं, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले.

****

रेमडेसिव्हीर आणि प्राणवायूच्या मुद्यावरून ठाकरे सरकारनं राजकारण थांबवावं, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर औषध आणि प्राणवायूचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला केला असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी एका ट्विट संदेशात आकडेवारीसह दिली आहे, त्यामुळे महाराष्ट्राची दिशाभूल केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, असंही दरेकर यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्रातली प्राणवायूची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे प्राणवायू वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज देशातल्या सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माद्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थिती विषयी माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे यांनी, प्राणवायूच्या मागणीसह  तसंच राज्यातल्या औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या केल्या. हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या यंत्रांचं वाटप केंद्र शासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. देशभरात असे १३२ प्रकल्प उभारण्यात येणार असून महाराष्ट्रातील स्थिती लक्षता घेता त्यातील जास्तीत जास्त प्लांट महाराष्ट्राला मिळावेत, अशी मागणीही टोपे यांनी केली.

रेमडेसीवीरच्या तुटवड्यामुळे राज्यातील स्थानिक औषध उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य आणि परवानगी देण्यासाठी विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक प्राणवायूच्या पुरेशा उपलब्धतेसाठी अहमदनगर जिल्ह्यात शिरडी इथल्या साई संस्थानच्या साईबाबा सुपरस्पेशालीटी रुग्णालयात हवेतून प्राणवायू मिळवण्यासाठीचा प्रकल्प तातडीनं उभारण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले. या रुग्णालयातल्या ५५० पैकी ४०० खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबरोबरच व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्याचे तसेच यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीने कारवाई सुरु करण्याचे निर्देशही अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

****

राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभाग तसंच वैद्यकीय शिक्षण विभागातले वर्ग 1 ते वर्ग 4 मधले रिक्त पदं तातडीने भरण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन आमदार चव्हाण यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे सादर केलं आहे.

****

वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनानं नाशिक महापालिकेच्या ६३५ पदांच्या नियमित भरतीला मान्यता दिली आहे. चार ते पाच वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे, सध्या किमान वैद्यकीय, अग्निशमन दल, आदी विभागातली पदं भरण्यास मान्यता मिळावी यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीनं पाठपुरावा सुरू होता.

****

रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासादरम्यान तसंच रेल्वेस्थानकांवर मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. देशभरात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागानं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार असून, पुढच्या ६ महिन्यांपर्यंत हा नियम लागू असेल.

****

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली.  दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ४५ पूर्णांक ५३ टक्के मतदान झालं. या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यात मुख्य लढत आहे.

****

बीड जिल्ह्यात आज एक हजार २११ नवे कोविड बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये सर्वाधिक ३३७ रुग्ण अंबाजोगाई इथले, बीड १४३, परळी १३८, आष्टी ११९, केज ११२, पाटोदा ९९, माजलगाव ६५, शिरुर ५३ आणि वडवणी  इथल्या ५९ रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज १२ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये १० रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातले तर बुलडाणा आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता दोन हजार ११२ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख सहा हजार ६३ झाली आहे.

****

औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी आज शहरात संचार बंदीचा आढावा घेत नाकाबंदी लावलेल्या स्थळांना भेट दिली. पोलिस आयुक्तांनी वाहनांची तपासणी करत ज्यांनी नाकाला रुमाल बांधला आहे त्यांना मास्कचं वाटपही केलं. कोविड विषाणूची श्रृखंला तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनला सहकार्य करावं आणि विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहनही पोलिस आयुक्त गुप्ता यांनी यावेळी केलं.

****

परभणी जिल्ह्यात, कोविड रुग्णांचं विलगीकरण करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातली दोन वसतीगृहं पुढील आदेशापर्यंत ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. या इमारतीत आता कोविड केंद्र, अलगीकरण आणि विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

****

नांदेड शहरातल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोविडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरवण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तसंच जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या उपक्रमाद्वारे शहरातल्या सर्व शासकीय आणि खाजगी रूग्णालयात दररोज एक हजार रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरवण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे महानगर अध्यक्ष प्रविण साले यांनी दिली.

****

परभणी जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातल्या रुग्णांना, त्यांची प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी दररोज आवश्यक तो पोषण आहार दिला जात आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल कोविड रुग्णांनी समाधान व्यक्त केलं असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली.

// ***************//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...