Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात
येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा
अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि
तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
राज्यात अत्यावश्यक वस्तूंची दुकानं आता सकाळी सात ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार
**
रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंतीसाठी शासनाच्या मार्गदर्शक
सूचना जारी
**
सैन्यदलाच्या रुग्णालयात आलेल्या
कोणत्याही रुग्णाला उपचार देण्याची सरकारची सूचना
आणि
**
औरंगाबाद इथं ३० तर जालन्यात आज १० कोविडग्रस्तांचा मृत्यू
****
राज्यात अत्यावश्यक वस्तूंची
दुकानं आता सकाळी सात ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहतील. याबाबतचा सुधारित आदेश राज्यशासनानं जारी
केला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
किराणा, भाजीपाला, फळ, दूध, बेकरी, मिठाई, मांस तसंच अंडी, यासह कृषी अवजारे, कृषी
उत्पादनं, पशूखाद्याची दुकाने, तसंच मान्सूनपूर्व कामांच्या साहित्याच्या दुकानांनाही
हा नियम लागू असणार आहे. मात्र, या सर्व दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी ७
वाजेपासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. आवश्यक वाटल्यास स्थानिक
प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या
१ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत.
****
राज्यातल्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, उद्या रामनवमी,
येत्या २५ एप्रिलला महावीर जयंती आणि २७
एप्रिलच्या हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी राज्य शासनानं मार्गदर्शक सूचना आणि
नियमावली जारी केली आहे. यासंदर्भातला शासननिर्णयही आज जारी
केला गेला. यानुसार भाविकांना पूजा किंवा
दर्शनासाठी मंदिरांमध्ये जायला बंदी असेल. याशिवाय मंदिरांमधे कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक
कार्यक्रमाचं आयोजन करता येणार नाही. नागरिकांना रामनवमीच्या उत्सवानिमीत्त प्रभात फेरी किंवा मिरवणुका काढायला मनाई आहे.
मंदीर व्यवस्थापकांनी शक्य असल्यास भाविकांसाठी ऑनलाईन
दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी असंही या आदेशात म्हटलं
आहे. राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घरच्या घरीच साधेपणानं
हे उत्सव साजरे करावेत असं आवाहनही राज्य शासनानं केलं आहे.
****
नंदुरबार जिल्हा प्रशासनानं महिला कोरोना विलगीकरण कक्षाची निर्मिती केली आहे. नंदुरबार शहरालगत असणाऱ्या होळ शिवारातील आदिवासी विकास
विभागाच्या मुलींच्या तापी वसतीगृहात महिला विलगीकरण कक्ष सुरु केला जाणार आहे. या
ठिकाणी दिडशे रुग्णखाटांची सुविधा करण्यात आली असून, साफसफाईची जबाबदरी नंदुरबार नगर परिषदेवर सोपवण्यात आली आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वैद्यकिय अधिकारी आणि
महिला कर्मचारी कोविड बाधितांच्या
आरोग्याची काळजी घेणार आहेत.
****
सोलापूर जिल्ह्यातील अकलुजच्या उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिले मोफत बाल कोविड रुग्णालय सुरू
करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या कौलारू इमारतीत
अद्ययावत सोयीसुविधांयुक्त १२ खाटांचे मोफत बाल कोविड रुग्णालय या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. हे रुग्णालय
लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिली. अकलुज
येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील डॉक्टरांची प्रांताधिकारी
पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात
सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं नवीन ५०० रुग्णखाटाचं कोविड सुश्रुषा केंद्र सुरू
केलं जाणार आहे. थोरात यांनी आज संगमनेर शहर आणि तालुक्यातल्या प्रशासकीय तसंच आरोग्य
अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यानुसार नगर
रस्त्यावर विघ्नहर्ता पॅलेस या ठिकाणी पुरुषांसाठी स्वतंत्र ३०० खाटा आणि महिलांसाठी
स्वतंत्र २०० खाटा असं एकूण ५०० रुग्ण खाटांचं कोविड सुश्रुषा केंद्र सुरू होणार आहे.
****
देशात सैन्यदलाच्या
६७ परिमंडळांनी त्यांच्या क्षेत्रातल्या रुग्णालयात आलेल्या
कोणत्याही रुग्णाला उपचार द्यावे अशा सूचना संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत. कोविड उद्रेकाच्या
पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सेनाप्रमुख जनरल एम एम नरवणे, संरक्षण सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास
संस्था - डीआरडीओच्या प्रमुखांशी चर्चा केली. या संकटकाळात
नागरिकांना सोयी सुविधा आणि तज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करुन द्यावं असं सिंग
यांनी सांगितलं. सेनेच्या प्रांतिक मुख्यालयांनी त्यांच्याइथल्या मुख्यमंत्र्यांशी
संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्य करावं असं ते म्हणाले. संरक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या
बैठकीनंतर सगळ्या परिमंडळांना रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना
वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश देण्यात आले.
****
रामायण
संस्कृती जतन करत असलेली देशातली तसंच देशाबाहेरची स्थळं, पर्यटनाच्या दृष्टीने जोडून
रामायण सर्किट तयार केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल असा विश्वास राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ केंद्रीय अधिकारी डॉ. अनंत दुबे लिखीत 'राम-रामायण
तीर्थाटन के आयाम' या हिंदी पुस्तकाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईत राजभवनातून
ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. रामायण संस्कृती विश्वव्यापक
असून नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, कंबोडिया यासह अनेक देशात या संस्कृतीची पदचिन्हं आढळतात,
याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं.
****
महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीनं
आजपासून बँक खासगीकरणाविरोधात अभियान सुरु करण्यात आलं आहे. संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार
चव्हाण आणि सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी ही माहिती दिली. बँकांचे खासगीकरण झालं तर
सामान्य माणसांनी बँकेत जमा केलेली बचत असुरक्षित होईल, ग्रामीण भागातून बँका काढता
पाय घेतील, यासह बँक खासगीकरणाविरोधात संघटनेची भूमिका या अभियानाअंतर्गत नागरिकांना
समजावून सांगण्यात येणार आहे. बँकेचे ३० हजार कर्मचारी सुमारे २५ लाख लोकांच्या भेटी
घेणार आहेत.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज ३० कोविड बाधितांचा
मृत्यू झाला. यामध्ये २४ रुग्ण हे औरंगाबाद जिल्हयातील आहेत. तर जालना आणि अहमदनगर
इथल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या ही
एक हजार २०४ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख दहा हजार ४९३ झाली
आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात दहा कोविड बाधितांचा मृत्यू झाला.
त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ६३० झाली आहे. दरम्यान,
जिल्ह्यात आज ५२९ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ३८ हजार ८५४
झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ८५४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली.
आजपर्यंत जिल्ह्यातले ३१ हजार ३२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या
सात हजार १९२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज एक हजार २४ नवे कोविड बाधित रुग्ण आढळून आले.
यामध्ये अंबाजोगाई इथल्या २३१, बीड २०६, केज १२२, आष्टी १११, परळी १०१, माजलगाव ५०,
पाटोदा ४७, शिरुर ४६, गेवराई ४५ आणि वडवणी इथल्या १५ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
****
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं आज ठाणे इथं कोविड संसर्गानं
निधन झालं. नांदलस्कर यांनी ४० नाटके, ३० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच २०
हून अधिक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केलं होतं.
****
हिंगोली जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या गैरसोयीकडे शासनाचं लक्ष
वेधण्यासाठी भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी
आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. जिल्ह्यात रुग्ण
संख्येच्या तुलनेत आरोग्य विषयक सोयी सुविधा कमी पडत आहेत. शासकीय रुग्णालयात प्राणवायू
सुविधेसह रुग्णखाटा उपलब्ध होत नाहीत. प्राणवायूचा तुटवडा भासतो आहे. रेमडेसिवीर औषधही वेळेवर उपलब्ध होत नसून,
या औषधाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला आहे.
//*************//
No comments:
Post a Comment