Thursday, 8 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ० एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      निर्बंध कोणाच्याही विरोधात नाही, कोरोना विषाणू संसर्गाची लाट थोपवण्यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन.

·      ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दुकानं, व्यापारी संकुलं बंद ठेवण्याच्या निर्णयाचा राज्यात ठिकठिकाणी विरोध.

·      महाराष्ट्रात राज्य सरकारच्या सुस्त आणि ढिसाळ कारभारामुळे, कोविड प्रतिबंध रोखण्याचे संपूर्ण देशाचे प्रयत्न विफल होत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची टीका.

·      २० ते ४० वयोगटात कोविड संसर्गाचं प्रमाण जास्त असल्यानं, १८ वर्षापुढील सर्वांचं लसीकरण करण्यास परवानगी देण्याची राज्याची केंद्राकडे मागणी.

·      राज्यात ५९ हजार ९०७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ९१ जणांचा मृत्यू तर सहा हजार १७९ बाधित.

·      विचार आणि भावना सृजनात्मकरित्या व्यक्त करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विद्यार्थ्यांना आवाहन.

·      नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परिक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय.

आणि

·      बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती.

****

टाळेबंदी किंवा निर्बंधाचा निर्णय कोणाच्याही विरोधात नसून, कोरोना विषाणू संसर्गाची लाट थोपवण्यासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यातल्या विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना, मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं. व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये अशीच सरकारची भूमिका असून, व्यापाऱ्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्यानं विचार करून उपाययोजना केल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी बोलताना, सध्या लागू निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी, व्यापार चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीच्या नियमांचंही काटेकोर पालन होईल, अशी उपाय योजना करण्याची मागणी करतानाच, ब्रेक द चेनला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींशी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोविड प्रतिबंधाबाबत राज्य शासनानं केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतानाच, माध्यमांनी जनजागृती करावी, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

दरम्यान, ब्रेक द चेन अंतर्गत दुकानं, व्यापारी संकुले बंद ठेवण्याच्या निर्णयाचा राज्यात काल ठिकठिकाणी विरोध करण्यात आला. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगनाथ काळे यांच्यासह सदस्यांच्या एका शिष्टमंडळानं काल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना याबाबत एक निवेदन सादर केलं. जिल्ह्यात सर्व दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, व्यापाऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्यावं, अन्यथा व्यापाऱ्यांना सामुहिक आत्मदहनाची परवानगी देण्याची मागणी, या निवेदनातून करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातल्या सिडको भागात व्यापाऱ्यांनी रस्त्यावर मानवी साखळी करून, कडक निर्बंधाच्या निषेधाचे फलक झळकावले, तसंच टाळेबंदीच्या विरोधात घोषणाबाजी केली.

 

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ नियम आणि अटी लावून, तसंच कडक निर्बंध करून उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसंदर्भात तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसंच पदाधिकाऱ्यांनी, काल आमदार मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं. सर्वच दुकानं उघडण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा नऊ एप्रिल रोजी लोकशाही मार्गानं आंदोलनाचा इशाराही, निवेदनात देण्यात आला आहे.

 

उस्मानाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेऊन, निर्बंधांचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे. कोरोना विषयक सर्व नियम पाळून व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी तहसीलदारांकडे केली आहे, तर कळंब इथं भाजपनं तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात, कष्टकरी तसंच व्यापाऱ्यांना सरकारनं दरमहा पाच हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी निर्बंध आदेशाची होळी करण्यात आली.

 

मुंबई, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर आदी शहरातही व्यावसायिकांनी आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

राज्यातली केशकर्तनालयं ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नाभिक महामंडळानं तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबतच्या शासन निर्णयाची औरंगाबाद इथं होळी केल्यानंतर, आता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय नाभिक महामंडळानं घेतला आहे. महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी ही माहिती दिली. इतर व्यावसायिकांप्रमाणे केशकर्तनालयं सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत उघडण्यास परवानगी द्यावी, या मुख्य मागणीसाठी हे राज्यभरात प्रत्येक केशकर्तनालयासमोर विविध स्वरुपात आंदोलन करण्यात येणार आहे.

****

महाराष्ट्रातल्या वाढत्या कोविड संसर्गाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सुस्त आणि ढिसाळ कारभारामुळे, कोविड प्रतिबंध रोखण्याचे संपूर्ण देशाचे प्रयत्न विफल होत असल्याची टीका, हर्षवर्धन यांनी केली. बाधितांची संख्या तसंच मृत्यू दरात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. जगात संसर्ग दर सर्वाधिक असलेल्या ठिकाणांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचं, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं. कोविड लसींचा पुरवठा होत नसल्याचे आरोप निराधार असून, लस पुरवठ्यावर पूर्ण लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. जोपर्यंत लस उत्पादनाला मर्यादा आहेत, तोपर्यंत लसीकरण हे प्राधान्यक्रमानुसारच केलं जाईल, असं हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं. १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याच्या मागणीवर ते बोलत होते. काही राज्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालेलं असताना, महाराष्ट्रात ८६ टक्के, दिल्लीत ७२ टक्के तर पंजाबात ६४ टक्केच लसीकरण झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

****

कामकाजाच्या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले आहेत. येत्या रविवारी ११ एप्रिलपासून ही केंद्र सुरू करता येतील. यासाठी कार्यालयात ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे शंभर कर्मचारी असणं आवश्यक असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

२० ते ४० या वयोगटात कोविड संसर्गाचं प्रमाण जास्त असल्यानं, १८ वर्षापुढील सर्वांच्या लसीकरणाची लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, केंद्रीय आरोग्य मंत्र्याकडे केली होती. राज्यात सध्या दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे. लसीचा पुरवठा लवकर आणि गतीनं केल्यास, लसीकरण अधिक वेगानं करणं शक्य होईल, असं टोपे यांनी म्हटलं होतं.

****

कोविड महामारीशी लढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित असलेल्या आयुष उपचार पद्धतींचाही वापर करावा, असं आवाहन, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयातल्या सोयी-सुविधा, रुग्णांकरता उपलब्ध करुन देण्यासंदर्भात, काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यभरातले पाचशेहून अधिक डॉक्टर्स या बैठकीत दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. आयुष उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी तसंच युनानी उपचार पद्धतीचा समावेश होतो.

****

राज्यात काल ५९ हजार ९०७ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३१ लाख ७३ हजार २६१ झाली आहे. काल ३२२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५६ हजार ६५२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के झाला आहे. काल ३० हजार २९६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २६ लाख १३ हजार ६२७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८२ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख एक हजार ५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सहा हजार १७९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९१ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३१, नांदेड जिल्ह्यातल्या २६, परभणी १२, बीड दहा, जालना सहा, उस्मानाबाद पाच तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४०७ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार २५५, लातूर ९६९, परभणी ६८४, जालना ६१४, बीड ५९०, उस्मानाबाद ४६८, तर हिंगोली जिल्ह्यात १९५ नवे रुग्ण आढळून आले.

****

आपले विचार आणि भावना सृजनात्मकरित्या व्यक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधानांनी, ज्ञानाच्या परीघाला मर्यादा असू शकतात, मात्र सृजनशीलतेचा परीघ अमर्याद असू शकतो, असं नमूद केलं. ते म्हणाले–

अपने थॉटस् को, इमोशन्स को, एक्सप्रेस करने का एक क्रियेटीव्ह तरीका दीजिये। नॉलेज का दायरा कई बार वही तक सिमित होता है, जो आपको उपलब्ध है, जो आपके आसपास है। लेकिन क्रिएटीव्हीटी का दायरा नॉलेज से भी बहोत दूर तक आपको ले जाता है। बहोत विस्तार के फलक को ले जाता है। क्रिएटीव्हीटी आपको उस क्षेत्र मे ले जा सकती है जहां पहले कभी कोई नही पहूंचा।

शिक्षक तसंच पालकांनाही पंतप्रधानांनी अनेक मुद्यांवर मार्गदर्शन केलं. मुलांमध्ये कोणत्याही विषयाच्या परिणामांबाबत भीती निर्माण करू नका, असं त्यांनी सांगितलं. मुलांना सकारात्मक पद्धतीनंच प्रोत्साहित करा, असं सांगताना पंतप्रधान म्हणाले –

बच्चों को कभी भी भय पैदा करके ये होग तो ये होगा, ऐसा होगा तो ऐसा होगा, कृपा करके ऐसी कोशिश मत किजिये। एक प्रकार से वो तरीका लगता तो बहोत आसान है, लेकिन इससे एक तरह से निगेटीव्ह मोटीवेशन की संभावना बढ जाती है। जैसे ही आपने जो हवा खडा किया होता है वो खत्म हो जाता है, बच्चे का मोटीवेशन भी खत्म हो जाता है। और इसलिये पॉजिटीव्ह, मोटीवेशन साथ साथ, बार बार पॉजिटीव, रीइनफोर्समेंट पर बल देते रहना चाहिये।

मुलांना थेट शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, साध्या सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून त्या विषयावर मुलांशी चर्चा करावी, मुलांचं लक्ष योग्य रितीनं अपेक्षित मुद्यांकडे वळवावं, मुलांनी स्वयंप्रकाशित होण्यासाठी प्रयत्न करावेत, असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना आपल्या सगळ्या चिंता परीक्षा कक्षाबाहेरच सोडून देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला.

****

इयत्ता नववी तसंच इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना यंदा परिक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं, गायकवाड यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या –

इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना जे आहे, ते पुढील वर्गासाठी वर्गोन्नती देण्यासंदर्भातला निर्णय आम्ही घेत आहोत. परंतू हा निर्णय घेत असतांना मी हे ही सांगू इच्छिते इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीसाठी नववी आणि अकरावी हा त्याचा मजबूत पाया आहे. आणि म्हणून मागील वर्षामधे आपल्याला जी परिस्थिती होती ते लक्षात घेता जरी आम्ही आपल्याला वर्गोन्नती देत असलो, तरी भविष्यामधे आपल्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपलं शैक्षणिक जे नुकसान झालं होतं ते सुध्दा भरून निघेल आणि दहावी आणि बारावीसाठी आपण सक्षमपणे उभे राहू शकाल.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ११ जागा रिक्त राहिल्या असून, उर्वरित आठ पैकी पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनल, एक जागा अपक्ष, तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार सुरेश धस समर्थकांना प्रत्येकी एक जागा मिळाली. मात्र गणसंख्या पूर्ण होत नसल्यानं, संचालक मंडळ स्थापन करता येत नसल्याचं, सहकार विभागानं राज्य सरकारला कळवलं होतं. त्यानुसार बँकेवर पाच सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे.

****

कोविड उपचारासाठी वापरात येणारे रेमडीसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या चौघांना काल नांदेड जिल्हा गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. यात नांदेड शहरातल्या तिघांचा, तर अहमदपूर तालुक्यातल्या एकाचा समावेश आहे. नांदेड शहरातल्या शिवाजी नगर भागात पाच हजार ४०० रुपयांना असणारं हे इंजेक्शन हे आरोपी आठ हजार रुपयांना विकताना आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.  

****

परभणी जिल्ह्यात सध्या सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांच्या जवळपास आहे, मात्र शेतकऱ्यांनी आपल्या घरचे राखीव असलेले गुणवत्तापूर्ण सोयाबीन बियाणे बाजारामध्ये विक्री करु नये, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये ते बियाणे पेरणीसाठी वापरण्याचं आवाहन परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सं.बा.आळसे यांनी केलं आहे. येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांचे दर ८० ते ९० रुपये प्रति किलो किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

****

मराठवाड्यातल्या नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, जालना आणि बीड जिल्ह्यात नऊ, १० आणि ११ या तारखेला सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी तयार पिकांची काढणी करून घ्यावी, तसंच मळणी केलेल्या पिकाची आणि पशुधनाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयात शनिवार १० एप्रिल रोजी होणारी राष्ट्रीय लोकअदालत कोविड विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 July 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...